Skip to main content
x

मांडवकर, भाऊ मारोती

     भाऊराव मारोती मांडवकर यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे झाला. कळंब येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. लहानपणापासूनच लाभलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सहवासातून १९५२ साली राष्ट्रसंतांचे चरित्र लिहून त्यांनी साहित्यनिर्मितीस सुरुवात केली. ही साहित्यनिर्मितीची सरिता त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत सातत्याने वाहतच राहिली आणि वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतली अशी जवळपास शंभरावर पुस्तके भाऊंनी लिहिली.

     प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात करणार्‍या भाऊंनी अधिव्याख्याता, अमरावती विद्यापीठ; संस्थापक प्राचार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती; पहिले संस्थापक प्राचार्य, कळंब अशा पदांवर कार्य केले आहे.

     १९५७ साली नागपूर विद्यापीठातून एम.ए.ची पदवी भाऊंनी सुवर्णपदकासह प्राप्त केली. आदिवासीच्या अभ्यासातून आकारास आलेल्या ‘कोलाम’ या ग्रंथाने त्यांना पीएच.डी.ची पदवी मिळवून दिली. त्यांच्या या कार्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘आदिवासी सेवक’ या पदवीने गौरवान्वित केले. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित असली तरी त्यांचे ‘पानोळ्या’, ‘दुनन’, ‘रासुंडा’ हे काव्यसंग्रह; ‘रानबोरे’, ‘करवंदे’, ‘राणीचा निवाडा’ इत्यादी बालसाहित्य तसेच लेखसंग्रहांत ‘गळती’, ‘कुचंबना’, ‘तुकारामाची रांडापोरे’, ‘गजरा’, ‘चिंतनी’, ‘आदिम’ हे लेख; त्याचप्रमाणे ‘चाळीस भावंडे’ ही कादंबरी हे साहित्य विशेष प्रसिद्ध आहे. या कादंबरीच्या चार आवृत्त्या निघाल्या असून तिचा हिंदीतही अनुवाद झाला आहे.

     भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जवळपास वीस विद्यार्थ्यांना पीएच.डी.ची पदवी प्राप्त झाली आहे. नागपूर, अमरावती विद्यापीठात अनेक महत्त्वाची पदे भूषविणार्‍या भाऊंनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व मराठी मंडळाचे सदस्य म्हणून कार्य पाहिले आहे.

     भाऊसाहेब कवी, कादंबरीकार म्हणून परिचित असले तरी संशोधक म्हणूनही ते विशेषत्वाने ओळखले जातात. त्यांचे आदिवासी व कोलाम जातीवरील संशोधन तसेच महानुभाव पंथावरील ‘आऊसा’, ‘चिंतनी’ आणि ‘चिंतनिका’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘मुक्तागिरी’ या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

     १९९१ मध्ये लाखनी येथे भरलेल्या त्रेचाळिसाव्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ग्रामीण वर्‍हाडी भाषेला त्यांनी त्यांच्या साहित्यातून मानाचे स्थान दिले. साहित्य, कला, शिक्षण आणि समाजसेवा हे त्यांच्या जीवनाधिष्ठानाचे चार खांब होते. त्यांची साहित्यविषयक कामगिरी लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने त्यांची ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव समिती’, ‘लोक साहित्य समिती’, ‘पुरस्कार समिती’ इत्यादी समित्यांवर निवड केली होती. त्यांनी आयुष्यभर साहित्याची व समाजाची सेवा करणारा उत्साहाने केली.

- डॉ. संध्या पवार

मांडवकर, भाऊ मारोती