Skip to main content
x

मांजरेकर, महेश वामन

     भिनेता, लेखक, निर्माता, दिग्दर्शक... अशी चौफेर कामगिरी करणारे महेश वामन मांजरेकर हे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी महेश मांजरेकर मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ आणि ‘ऑल दि बेस्ट’ ही मांजरेकर यांची गाजलेली नाटके. याच सुमारास त्यांनी ‘एक शून्य शून्य’ या मालिकेतदेखील काम केले होते. ‘आई’ (१९९५) या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण केले. दरम्यानच्या काळात ‘काँटे’, ‘मुसाफिर’, ‘जिंदा’, ‘वाँटेड’, ‘दबंग’ या हिंदी चित्रपटांमध्ये महेश मांजरेकर यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा उल्लेखनीय ठरल्या.

     महेश मांजरेकर यांनी २००६ साली चित्रपटनिर्मितीला सुरुवात केली. त्यांनी निर्माण केलेला ‘मातीच्या चुली’ या कौटुंबिक नाट्य असलेल्या चित्रपटाला लोकप्रियता मिळाली. २००८ साली त्यांनी निर्मिती केलेला ‘दे धक्का’ हा चित्रपटही त्यातील भावुकतेमुळे व विनोदामुळे विलक्षण चालला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लालबाग परळ’ (२०१०), ‘शिक्षणाच्या आयचा घो’ (२०१०), ‘काकस्पर्श’ (२०१२), ‘कोकणस्थ’ (२०१३) या चित्रपटातून व्यक्त होणारी भावना देशप्रेम व्यक्त करणारी होती. देशभक्ती, राष्ट्रप्रेम, सामाजिक व कौटुंबिक वास्तव या सूत्राभोवती त्यांच्या चित्रपटांची कथानके फिरत राहतात. त्यातील भावाशय प्रेक्षकांना अस्वस्थ करणारा तर असतोच, तसेच विचार करायला प्रवृत्त करणाराही असतो. म्हणूनच मांजरेकर यांच्या चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग सर्व थरांमध्ये असलेला दिसतो.

     निर्मिती व दिग्दर्शन यासोबतच महेश मांजरेकर यांनी अनेक चित्रपटांमधून अभिनयही केलेला आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय...’ (२००९) या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा प्रेक्षकप्रिय होती. ‘फक्त लढ म्हणा’ (२०११)मधील बाबा भाई, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ (२०१२)मधील दिलीप रेगे, ‘आजचा दिवस माझा’ (२०१३)मधील आएएस अधिकारी या त्यांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

     १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वास्तव’ चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांच्यातील उत्कृष्ट दिग्दर्शकाची प्रचिती आली. ‘वास्तव’पाठोपाठ मांजरेकर यांनी ‘अस्तित्व’, ‘कुरुक्षेत्र’, ‘पिता’, ‘जिस देश में गंगा रहता है’ यासारखे काही व्यावसायिक चित्रपट बनवले. हिंदी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर ते पुन्हा एकदा मराठी चित्रपट निर्मितीकडे वळले. मांजरेकरांची निर्मिती असलेल्या ‘दे धक्का’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या काही उत्कृष्ट कलाकृती. २०१२ मधील ‘काकस्पर्श’ चित्रपटाने मांजरेकर यांच्यामधील दिग्दर्शक श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करीत असल्याची खातरी पटली. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ करण्यात आला. लेखनाबरोबरीनेच पार्श्‍वगायन करण्यासाठी महेश मांजरेकर तितकेच तत्पर असतात, हे त्यांच्या ‘दे धक्का’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’ या चित्रपटातील त्यांच्या आवाजातली गाणी ऐकली की आपसूकच कळते. मराठी कलावंतांना प्रसिद्धीचे वलय मिळवून देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या ‘मिफ्ता’ पुरस्कार सोहळ्यानेही आता आपले बस्तान बसवले आहे.

     ‘जय हो’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘रेगे’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘दबंग 3’, ‘केसरी’, ‘66 सदाशिव’, ‘मुळशी पॅटर्न’ अशा हिंदी मराठी चित्रपटात त्यांनी आगळ्या भूमिका केल्या आहेत.

- मंदार जोशी

मांजरेकर, महेश वामन