Skip to main content
x

मेहेर, कांतीलाल लालचंद

            कांतीलाल लालचंद मेहेर यांचा जन्म बीड जिल्ह्यातील आष्टी येथे झाला. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण अहमदनगर येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. त्यांनी १९५०मध्ये पुण्यातील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी सौमैया या १२०० एकराच्या फार्मवर सलग ४ वर्षे पर्यवेक्षक पदावर काम केले. या ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी ऊस पीक, चारापिके, कडधान्य, आंतरपिके अशा वैविध्यपूर्ण लागवडींचे निरनिराळ्या हंगामात यशस्वी प्रयोग केले. या चार वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांना अहमदनगर येथील श्री पांजरपोळ गोरक्षण संस्था येथे १९५४मध्ये सेवेसाठी आमंत्रित करण्यात आले. या संस्थेमध्ये दाखल झाल्यावर एकंदर परिस्थितीचा अभ्यासपूर्ण अंदाज आल्यावर कमी पावसाच्या प्रदेशामधील उपेक्षित गोधनामधून आदर्श गोधन कसे निर्माण करता येईल हे एकच लक्ष डोळ्यांसमोर ठेवून ते काम करत राहिले. त्यांनी कमी पावसामध्ये व उपलब्ध क्षेत्रामध्ये उत्तम जातीच्या, कमी कालावधीमध्ये होणाऱ्या चारापिकांची निवड व लागवड कशी करायची याचा अभ्यास करून यश संपादन केले. त्यांनी पिकाची साठवण करताना त्याचा गुणात्मक दर्जा कसा राखता येईल याचेदेखील संशोधन करून पद्धती निश्‍चित केल्या. या अभ्यासपूर्ण व सिद्ध प्रयोगांची माहिती संपूर्ण अहमदनगर जिह्यामधील शेतकऱ्यांना अत्यंत मोलाची ठरत आहे. अहमदनगर जिल्हा हा मूलत:च अल्पपावसाचा जिल्हा आहे, त्यामुळे गोधनाची व्यथादेखील दुष्काळीच होती. शेतकरी व गोधन हे एका दुष्टचक्रात सापडलेले होते. या समस्येवर मात करून त्याच निकृष्ट गोधनापासून भारतीय गोवंशामधील सिद्ध वळूंपासून संकर करून, सतत सात वर्षे झटून नवीन सुधारित पिढी निर्माण करण्यात यश मिळवले. या नवीन पिढीच्या कालवडींनी त्यांच्या आईपेक्षा ४ पट जास्त दूध दिले, तर दोन वेतांमधील कालावधी कमी झाला व पूर्णत: भाकड काळदेखील कमी होता. या कालवडींचे सरासरी प्रथम वेत देण्याचे वय हे ३० ते ३६ महिन्यांमधील होते. या महत्त्वपूर्ण संशोधनात्मक कार्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व मणिभाई देसाई अशा थोर व्यक्तींनी घेतली.

            उत्तम गोवंशाची निपज हेसुद्धा मेहेर यांचे एक ध्येय होते. आदर्श वळू कोणत्या निकषांवर ठरवला पाहिजे, तो कसा तयार केला पाहिजे व असा वळू योग्य पद्धतीनेच वापरला पाहिजे, आदर्श गोशाळा कशी असावी, गोधन कशा पद्धतीने सांभाळले पाहिजे, याबाबत त्यांनी सखोल अभ्यासपूर्वक कार्यप्रणाली निश्‍चित केली. वैरण उत्पादन व साठवणूक या संदर्भात मार्गदर्शन शिबिरे दरवर्षी भरवण्यात येतात, त्यामुळे अनेक खासगी गोशाळा उभारल्या गेल्या व त्या उत्तम रीतीने काम करत आहेत.

            गोधनाप्रमाणेच शेळीपालनामध्ये सुद्धा सुधारणा कशा प्रकारे करता येईल, नवीन तंत्रज्ञान कशा प्रकारे वाडी वस्तीवर पोहोचेल या दृष्टीने त्यांनी कार्यप्रणाली निश्‍चित केली. या नवीन उपाययोजनांद्वारे शेतमजूर, सालकरी गडी, दारिद्रयरेषेखालील शेळीपालक यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. त्यांनी आदर्श शेळीपालनासाठी इस्राएलमध्ये जाऊन अभ्यास केला.त्या अभ्यासाचा फायदा इतरांना करून देण्यासाठी ते झटत आहेत. त्यांनी १९७२च्या भीषण दुष्काळामध्ये गवताची प्रत्येक काडी योग्य पद्धतीने वाचवून व वापरून गोधन कसे जगवायचे याचा एक आदर्श निर्माण केला. त्यांनी गुरांच्या छावण्या अनेक ठिकाणी काढल्या व यशस्वी केल्या. त्यांनी दुष्काळ परमेश्‍वराने किंवा निसर्गाने घेतलेला स्वाध्याय समजून शेतकर्‍यांसाठी व शेतीसाठी शाश्‍वत  कार्य करण्याच्या भावनेमधून रुरल अ‍ॅग्रीकल्चर इन्स्टिट्यूट, नारायणगाव ही संस्था स्थापन करण्यामध्ये श्रीकांत सबनीस यांना मोलाची मदत केली.

            मेहेर यांच्या गाठीला १९५० ते १९८४ या तब्बल चौतीस वर्षांच्या काळात जो समृद्ध अनुभव जमा झाला व त्यातून जे ज्ञान मिळाले त्याचा उपयोग कायमस्वरूपी शेतकऱ्यांना व्हावा या दृष्टीने त्यांनी ‘शेळ्यांसाठी गोठे’, ‘चारा व खाद्य उत्पादने’, ‘शेळ्यांचे रोग’ ही पुस्तके लिहिली आणि ‘दुधासाठी शेळी’ या पुस्तकात संपादकीय मदत केली. निवृत्तीनंतरदेखील ते अनेक गोशाळांना व गोपालकांना विनामूल्य सेवा देत आहेत.

- मानसी मिलिंद देवल

मेहेर, कांतीलाल लालचंद