मेहर, प्राणहंस नानाजी
प्राणहंस नानाजी मेहर यांचा जन्म मोहाडी तालुक्यातील भंडारा जिल्ह्यातील कुशारी खेड्यात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुशारी गावातच झाले व माध्यमिक शिक्षण मोहाडी येथे झाले. त्यांनी १९८० साली भंडारा येथून बी.ए.चे प्रथम वर्ष उत्तीर्ण केले. त्यानंतर आयआयटीत इलेक्ट्रीशियनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी शेती उद्योगाला सुरुवात केली. त्यांच्याकडे ५.१३ हेक्टर जमीन आहे. त्यापैकी ३ हेक्टर जमीन पडीक आहे. त्यांनी बँकेच्या सहकार्याने व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पडीक जमीन वहितीखाली आणली. त्यांनी त्या भागात वनशेती केली. त्यांनी १९८२मध्ये सागवान, शिवण व बांबू यांची लागवड केली व चांगल्या जमिनीवर आंबा, पेरू, डाळींब व बोर ही फळझाडे लावली. तसेच त्यांनी आंतरपीक म्हणून भाजीपाला लावून उत्पन्न काढले. त्यांनी काळाची गरज लक्षात घेऊन १९८४ सालापासून गांडूळखत, कंपोस्ट खत व निळे हिरवे शेवाळे खत वापरून शेती केली. त्यांनी अझोटो बॅक्टर व रायझोबियम कल्चरचा बीज प्रक्रियेसाठी वापर केला.
मेहर यांच्या उन्नत शेतीतील अथक प्रयत्नामुळे सेंद्रिय व वनशेती याचा अवलंब केल्यामुळे त्यांना २००३मध्ये वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार दिला. त्यांना २००७मध्ये कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच नागपूर आकाशवाणी नभोवाणी शेतकी शाळा, नागपूरतर्फे भाजीपाला लागवड वनविभाग योजना, मत्स्यव्यवसाय, कृषी अवजारे या विषयावर त्यांनी माहितीपर भाषण देऊन शेतकर्यांशी संवाद साधला. त्यांनी गावात दूध डेअरी स्थापन करण्यात पुढाकार घेतला व कृषी विकास संघाची स्थापना केली.
मेहर नागपूर आकाशवाणीवर भाजीपाला लागवड, मत्स्यव्यवसाय, वन विभागाच्या योजना आणि ग्राम समृद्धी योजनेबद्दलचे भाषण प्रसारित करतात. त्यांना या कार्याबद्दल प्रशस्तिपत्र मिळाली आहेत. त्यांची नागपूर आकाशवाणीने मुलाखतही प्रसारित केली आहे. याचे सर्व श्रेय ते डॉ. पंजाबराव देशमुख यांना देतात कारण विदर्भाची कृषी उन्नती करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.