महाडिक, सुनील श्रीकृष्ण
सौंदर्यात्मकता (अॅस्थेटिक्स) आणि उद्योजकता यांचा योग्य मेळ घालून दृक्कलासंवाद क्षेत्रात आपल्या प्रतिभेने स्वतंत्र स्थान निर्माण करणारे सुनील श्रीकृष्ण महाडिक यांचा जन्म आंजर्ल्याजवळच्या भोंबडी या गावी झाला. वयाच्या पाचव्या वर्षी ते मुंबईला आले. त्यांचे वडील एका गिरणीमध्ये नोकरीला होते. नंतर ते भांडुप येथे एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागले व फोरमन झाले. त्यामुळे सुनील महाडिक यांचे शालेय शिक्षण प्रथम लालबाग, चिंचपोकळी येथे व नंतर भांडुपला महापालिका शाळेत झाले. त्यांचे आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मो.ह.विद्यालय, ठाणे येथे झाले. १९७६ मध्ये चांगल्या गुणांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये प्रवेश घेतला.
साइन बोडर्स, पोट्रेट्स , स्क्रीन प्रिन्टिंग अशी मिळतील ती कामे करून त्यांनी या काळात पैसे मिळवले व शिक्षणाचा खर्च भागवला. सुनील महाडिक यांनी १९८१ मध्ये प्रथम श्रेणी मिळवून उपयोजित कलेतील पदविका प्राप्त केली. त्याआधीच्या प्रत्येक वार्षिक परीक्षेत ते प्रथम श्रेणीत, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही कलाशाखेमध्ये परावर्तित करता येईल अशी दृश्यकलेविषयीची सर्जनशील शोधकवृत्ती जागृत करणे हा जे.जे. मध्ये नव्याने सुरू झालेल्या फाउण्डेशन या पायाभूत अभ्यासक्रमाचा उद्देश होता. विद्यार्थिदशेत महाडिक जे.जे.तील अध्यापकांची आणि जाहिरात क्षेत्रातील प्रथितयश संकल्पनकारांची कामे डोळसपणे पाहत होते आणि त्याच वेळेस आपला वेगळेपणा कसा जपता येईल, त्याकडेही लक्ष देत होते.
उपयोजित कलेतील पदविका प्राप्त केल्यानंतर १९८१ मध्ये ‘त्रिकाया’ या जाहिरातसंस्थेत महाडिक यांनी दीड-दोन महिने काम केले. त्यानंतर ते ‘एव्हरेस्ट’मध्ये लागले व तिथल्या अडीच-तीन वर्षांच्या काळात त्यांनी केलेल्या जाहिरातींना ‘कॅग’ अवॉडर्स मिळाली. त्यांनी १९८४ मध्ये ‘चैत्रा’ या जाहिरातसंस्थेत प्रवेश केला. ब्रँडन परेरा हे तिथे प्रमुख होते. त्यांचा‘चैत्रा’मध्ये अरुण कोलटकर आणि किरण नगरकर यांच्याशी परिचय झाला. त्यामुळे त्यांना कोलटकरांसारख्या प्रतिभावंत संकल्पनकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
महाडिक या काळात इलस्ट्रेशन्स अधिक प्रमाणात करीत असत. दृक्संवादकलेत ‘इलस्ट्रेशन’ या माध्यमाला मर्यादा आहेत याची त्यांना जाणीव झाली आणि ते छायाचित्रणाकडे वळले. छायाचित्रणतंत्राचा अभ्यास करून त्यांनी या माध्यमाचाही प्रभावीपणे वापर केला.
सुनील महाडिक १९८७ मध्ये मोहंमद खान यांच्या ‘एंटरप्राइझ’ या जाहिरातसंस्थेत रुजू झाले. तिथल्या कामाची पद्धत पाहून दोन महिन्यांतच ते बाहेर पडले. कॉपिराइटर किरण नगरकर यांच्याबरोबर त्यांनी विविध जाहिरातसंस्थांसाठी कामे करायला सुरुवात केली. ‘क्लॅरियन’, ‘सिस्टास’, ‘दत्ताराम’, ‘स्फीअर’, ‘अॅम्बियन्स’ अशा जाहिरातसंस्थांची कामे करीत असताना त्यांची एक वेेगळी मानसिकता घडत गेली. संकल्पनांच्या मांडणीमध्ये वैचारिक स्पष्टता येत गेली. मनातला विचार प्रथम शब्दरूपात कागदावर अथवा क्लाएंटशी बोलताना मांडता आल्यामुळे संकल्पनेच्या पातळीवरच ती मंजूर करून घेणे शक्य होऊ लागले.
महाडिक यांनी १९९० पर्यंत अशा प्रकारे भरपूर आणि विविध प्रकारची कामे केली. दरम्यानच्या काळात, त्यांनी १९८९ मध्ये ‘इक्विटी’ नावाची जाहिरातसंस्था दोन भागीदारांसह सुरू केली. पण व्यवसाय वाढवणे, पैसे वसूल करणे हे कठीण होत चालले, तेव्हा ते पुन्हा स्वतंत्रपणे काम करू लागले. त्यांनी १९९१ मध्ये ‘फोरफ्रंट’ या जाहिरातसंस्थेत चार महिने काम केले आणि अनेक पुरस्कार मिळवले. त्यांचा हा दहा वर्षांचा कालखंड जाहिरातव्यवसायातील त्यांच्या जडणघडणीचा काळ होता.
सुनील महाडिक यांनी १९९२ मध्ये ‘एफ एक्स डिझाइन्स’ ही स्वत:ची संस्था सुरू केली. सर्वसाधारण जाहिरातसंस्थेपेक्षा याचे स्वरूप थोडे वेगळे होते. दृक्संवादकलेचा व्यापक पातळीवर विचार केला तर जाहिरात हा त्याचा एक छोटा भाग ठरतो. जाहिरात माध्यमांचा सुटासुटा विचार करण्याऐवजी दृश्यभाषेतून ग्राहकाशी संवाद साधण्याचा धोरणात्मक विचार डिझाइन स्टुडीओच्या संकल्पनेत आहे. मुद्रण हे जाहिरातींचे प्रमुख माध्यम होते त्या काळात वृत्तपत्रांतील जाहिराती केंद्रस्थानी होत्या. नंतर नभोवाणी, चित्रपट, दूरचित्रवाणी अशी दृक्श्राव्य माध्यमे आली तसे जाहिरातींच्या धोरणात्मक विचारात आमूलाग्र बदल झाले. कॉर्पोरेट डिझाइन, लोगो, बोधचिन्हे, ब्रॅण्ड्स यांचा अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार होऊ लागला. असे असले तरी क्लाएंट्सची अथवा उद्योेजकांची मानसिकता बदललेली नव्हती. जाहिरातींसाठी लोक पैसे द्यायला तयार असत; पण त्यापूर्वी, त्यासाठी एक संकल्पनात्मक विचार लागतो, संवादकुशल सौंदर्यदृष्टी लागते, डिझाइनची एक प्रक्रिया असते आणि तिला एक स्वतंत्र मूल्य असते, त्यासाठीही पैसे मोजावे लागतात याची जाण विकसित झालेली नव्हती. सुनील महाडिक यांनी ‘एफ एक्स डिझाइन्स’मधून उपयोजित कलेतील प्रत्येक कृती ही सुनियोजित पद्धतीने रचनाबद्ध केलेली संवादरूपी कलाकृती असते हे दाखवून दिले.
‘एफ एक्स डिझाइन्स’चे १९९५ मध्ये ‘फ्लॅगशिप अॅडव्हर्टायझिंग प्रा.लि.’मध्ये रूपांतर करण्यात आले. एक जाहिरातसंस्था असेच तिचे स्वरूप होते. सुनील महाडिक यांनी केलेल्या कामांमुळे ‘ए अॅण्ड एम’तर्फे देण्यात येणारा ‘इमर्जिंग एजन्सी ऑफ द इयर’ हा पुरस्कार ‘फ्लॅगशिप’ला मिळाला. पुढे १९९६, १९९७ अशी सलग दोन वर्षे ‘ए अॅण्ड एम’तर्फे देण्यात येणारा ‘आर्ट डायरेक्टर ऑफ द इयर’ हा पुरस्कार सुनील महाडिक यांना देण्यात आला. याआधी १९९२ मध्ये ‘कॅग’तर्फे देण्यात येणारा ‘आर्ट डायरेक्टर ऑफ द इयर’ हा पुरस्कारही महाडिक यांना मिळाला होता.
‘फ्लॅगशिप’मुळे सुनील महाडिक दृक्कलासंवाद क्षेत्रात एक यशस्वी उद्योजक म्हणून स्थिरावले. कलावंताची प्रतिभा आणि व्यवसायातील नैपुण्य यांचा दुर्मीळ संगम महाडिक यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला असल्यामुळे आजच्या स्पर्धात्मक आणि बहुसांस्कृतिक युगात ते संवादक म्हणून यशस्वी ठरले आहेत. जाहिरातीच्या प्रयोजनाला एक बाजारमूल्य असले तरी तिचे आवाहन नेणिवेतल्या संवेदनांना असेल तर ती जाहिरात अधिक शाश्वत स्वरूपाची आणि जीवनशैलीवर प्रभाव टाकणारी होेऊ शकते. ‘श्याम अहुजा’ आणि ‘इंडियाबुल्स’ यांच्या महाडिक यांनी केलेल्या जाहिराती या प्रकारात मोडतात.
‘फ्लॅगशिप’ला पूरक अशी ‘सॉक्स’ ऊर्फ ‘एस.ओ.एक्स डिझाइन’ची स्थापना महाडिक यांनी २००८ मध्ये केली. ग्राफिक डिझाइन, वेब डिझाइन अशा दृक्संवादकलेच्या वाढत्या विस्ताराला न्याय देतील अशी, प्रत्येक क्लाएंटच्या गरजेनुसार डिझाइन सोल्युशन्स देणे हा या डिझाइन संस्थेचा उद्देश होता. हे सर्व करत असताना महाडिक यांच्या लक्षात आले, की डिझाइन सोल्युशन्स द्यायची तर संवादकलेचा मूलभूत विचार होणे गरजेचे आहे.
प्रत्येक उत्पादित वस्तू अथवा सेवा आणि तिचे स्वरूप हे मानवी समाज आलेल्या अनुभवांना कसा प्रतिसाद देतो, यावर अवलंबून असते. ही उपजत समज नेमकेपणाने समजून घेतली तर त्याचा उपयोग संवादप्रक्रियेत आणि अधिक चांगल्या वस्तू उत्पादित करण्यासाठी करून घेता येईल का?, असा प्रश्न महाडिक यांना पडला. त्यासाठी त्यांनी मानववंशशास्त्राची (अॅन्थ्रापॉलॉजी) मदत घ्यायचे ठरवले. सब-कल्चर म्हणजे सर्वसमावेशक संस्कृतीच्या पोटात दडलेल्या, वेगळेपण जपणाऱ्या उपसंस्कृती. भारतीय संस्कृतीत अशा अनेक उपसंस्कृती नांदताहेत, तसेच आजच्या जागतिकीकरणामुळे वैश्विक संस्कृती आणि स्थानिक संस्कृती एकत्र आल्यामुळे या दोन्हींचे भान ठेवणे गरजेचे झाले आहे. कारण वस्तू खरेदी करताना ग्राहक या सांस्कृतिक प्रभावाखाली निर्णय घेत असतो. याचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘सब-कल्चर’ नावाचा एक स्वतंत्र विभाग महाडिक यांनी चालू केला व मानववंशशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तींची त्यासाठी नेमणूक केली. शॉपिंग मॉल, गृहनिर्माण यांसारख्या क्षेत्रांतल्या उद्योजकांसाठी जाहिराती करताना महाडिक यांनी या माहितीचा कल्पकपणे उपयोग करून घेतला, आणि हे धोरण व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरले. मानववंशशास्त्राचा उपयोग दृश्यकलेच्या क्षेत्रात दृश्यभाषा विकसित करण्यासाठी महाडिक यांनी केला आणि दृश्यमाध्यमाच्या संवादकलेला एक वेगळी दिशा दिली.
सुनील महाडिक व्यवसाय आणि सर्जनशीलता या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानतात. त्यामुळे दृक्संवादकलेच्या व्यवसायाला त्यांनी अभिजात वळण दिले आहे. छायाचित्रणकला एक विशुद्ध कला म्हणून त्यांनी जोपासली आहे आणि अशा छायाचित्रांचे प्रदर्शनही त्यांनी भरवले होते. तर्कातीत हा ‘फ्लॅगशिप’चा परवलीचा शब्द आहे. तर्कनिष्ठतेमुळे आलेली तर्कदुष्टता आणि चाकोरीबद्ध विचार ओलांडून जायचे असेल, पृष्ठभागाखाली दडलेले वास्तव जाणून घ्यायचे असेल, तर तर्कातीत विचाराचा अवलंब केला पाहिजे. सुनील महाडिक यांनी दृक्संवादकला अधिक सुजाण करण्यासाठी त्याचा वापर केला, यातच त्यांचे यश दडलेले आहे.
- दीपक घारे / रंजन जोशी