Skip to main content
x

महांबरे, गंगाधर मनमोहन

     चटकदार गाण्यांचे रचनाकार आणि चतुरस्र लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या गंगाधर मनमोहन महांबरे यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथे झाले. १९४८साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पुढे १९५६मध्ये पुणे विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळवली. त्यांनी प्रारंभी मुंबईला शिक्षण विभागामध्ये नोकरी केली. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये विविध पदांवर नोकरी करून ग्रंथालय शास्त्रातील पदविका मिळवली. पुढे त्यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये, किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या ग्रंथालयात तसेच पुण्याच्या ऑटोमोटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ग्रंथपाल म्हणून काम केले. नोकरी करीत असतानाच (१९४८) त्यांनी मुक्त पत्रकारिता आणि लेखन सुरू केले होते. १९५४पासून केलेल्या गीतांमधील ध्वनिमुद्रित झालेली त्यांची अनेक भावगीते आजही लोकप्रिय आहेत. वृत्तपत्रे, मासिके, नभोवाणी, दूरदर्शन, चित्रपट, रंगभूमी कॅसेट्स इत्यादींसाठी त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांचे साहित्य नाटिका, बालसाहित्य, चरित्रे, गाण्यांचे संपादन आणि गीतसंग्रह अशा विविध प्रकारांत आहे.

     ‘दिलजमाई’ (१९५२), ‘रंगपंचमी’ (१९५३), ‘सिंधुदुर्ग’ (१९५५), ‘कोल्हा आणि द्राक्षे’ (१९६०) अशा अनेक नाटिका; ‘देवदूत’ (१९५२), ‘संतांची कृपा’ (१९५५), ‘नजराणा’ (१९५५) ही नाटके; ‘गौतमबुद्ध’ (१९५६), ‘जादूचा वेल’ (१९६१), ‘जादूची नगरी’ (१९६२), ‘बेनहर’ (१९७२), ‘शुभम् करोती’ (१९७४), ‘किशोरनामा’ (२००३), ‘मॉरिशसच्या लोककथा’ (२००४) इत्यादी बालसाहित्याची पुस्तके; ‘वॉल्ट डिस्ने’ (१९७६), ‘चार्ली चॅप्लिन’ (२००२), ‘भावगीतकार ज्ञानेश्वर’ (२००२), ‘फिल्मउद्योगी फाळके’ (२००४), ‘सैगल’ (२००६), ‘कविश्रेष्ठ राजा बढे’ (२००७) यांची चरित्रे त्याचबरोबर ‘स्कूटर्स: देखभाल, दुरुस्ती’, ‘आदिवासींसाठी लघुउद्योग’, ‘अपंगांसाठी लघुउद्योग’, ‘महिलांसाठी उद्योग व्यवसाय’, ‘इलेक्ट्रॉनिक्स उद्योग व्यवसाय’ अशी उपयुक्त पुस्तकेही त्यांनी लिहिली.

     या गद्यलेखनाबरोबर ‘आपली आवड’ (१९६३), ‘उषःकाल’ (१९७१), ‘रसिका तुझ्याचसाठी’ (१९७६), ‘मराठी गझल’ (१९८१), ‘आनंदाचे डोही’ (१९८६) इत्यादी गीतसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. महाराष्ट्र गौरवगीते, मौलिक मराठी चित्रगीते, आचार्य अत्रे, पी.सावळाराम, खांडेकर, माडगूळकर, पु.ल.देशपांडे यांच्या चित्रगीतांचे संग्रह त्यांनी संपादित केले. त्यांची गद्यलेखन शैली साधी, सरळ, प्रासादिक आहे आणि गीतांमध्ये सोपी रचना व शब्दांची अचूक निवड हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

     त्यांच्या ‘मौलिक मराठी चित्रगीते’ या पुस्तकाला २००१ साली राष्ट्रपतींनी सुवर्णकमल देऊन राष्ट्रीय सन्मान केला आणि ‘ग्रामीण उद्योगाच्या यशस्वी वाटा’ ह्या पुस्तकाला २००८ सालचा, महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार लाभला. 

     - अशोक बेंडखळे

महांबरे, गंगाधर मनमोहन