मिरजकर, निशिकांत धोंडोपंत
तौलनिक साहित्याभ्यासाचे प्रध्यापक आणि अनुवादक निशिकांत धोंडोपंत मिरजकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. पुणे येथील राजा धनराजगिरजी हायस्कूलमधून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १९६२ साली नौरोसजी वाडिया महाविद्यालय पुणे येथून ते बी.एस्सी. झाले. त्यानंतर त्याच महाविद्यालयातून १९६४साली मराठी व संस्कृत हे विषय घेऊन पुणे विद्यापीठाची बी.ए.आणि १९६६मध्ये पुणे विद्यापीठाची एम.ए. या पदव्या प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने त्यांनी संपादन केल्या. बी.ए.च्या परीक्षेत सुवर्णपदक तर एम.ए.च्या परीक्षेत सर्व पारितोषिके त्यांनी मिळविली. त्यानंतरच्या काळात त्यांनी कर्हाड व सांगली येथे मराठीचे अध्यापन केले.
१९७८मध्ये ते दिल्ली विद्यापीठातील आधुनिक भारतीय भाषा व साहित्याभ्यास विभागात मराठी आणि तौलनिक साहित्याभ्यास यांचे अध्यापन करू लागले. हे त्यांचे कार्य २००७पर्यंत चालू होते. सहा वर्षे विभागप्रमुख व तीन वर्षे आर्ट्स फॅकल्टीचे डीन म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या लेखनाची सुरुवात काव्यलेखनाने झाली. तथापि मराठी वाचक त्यांना संतसाहित्याचे, आधुनिक मराठी साहित्याचे व तौलनिक साहित्याभ्यासाचे तज्ज्ञ म्हणून ओळखतात. ‘श्रीनामदेव दर्शन’ (१९७०), ‘श्रीनामदेव चरित्र आणि काव्य’ (१९७०), ‘नामदेवांची अभंगवाणी’ (१९७८) ही त्यांनी सहकार्याने केलेली संपादने त्यांच्या नामदेवाभ्यासाची ग्वाही देणारी आहेत. ‘कवितेची रसतीर्थे’ (१९८२), ‘साहित्यगंगा: प्रवाह आणि घाट’, ‘साहित्य: रंग आणि अंतरंग’ (२००९) हे त्यांचे समीक्षालेखांचे संग्रह. याशिवाय साहित्य अकादमीसाठी त्यांनी कुसुमाग्रजांविषयीचा परिचयग्रंथ लिहिला आहे. समग्र कविताएँ: विनायक दामोदर सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांचा काव्यरूप हिंदी अनुवाद) ‘महाभारत एक चींटी का’ (गंगाधर गाडगीळ यांच्या ‘एका मुंगीचे महाभारत’ या आत्मचरित्राचा अनुवाद) इत्यादी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भारतात व भारताबाहेर आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांत त्यांनी संशोधनपर निबंधांचे वाचन केले आहे. मराठीतील वेगवेगळ्या नियतकालिकांतून त्यांचे समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध झाले आहे. ‘भारतीय भाषांतील स्त्री-साहित्याचा मागोवा’ (१८५० ते २०००) खंड १ व २ या ग्रंथांचे ते सहसंपादक आहेत. त्यांच्या एकंदर साहित्यसेवेचा गौरव महाराष्ट्र साहित्यपरिषदेच्या वतीने करण्यात आला असून त्यांना कै.गं.ना.जोगळेकर पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.