Skip to main content
x

मिश्रा, बैजनाथ कालिकाप्रसाद

लच्छू महाराज

गुरू बैजनाथ महाराज अर्थात बैजनाथ कालिकाप्रसाद मिश्रा हे लखनौ घराण्याचे एक प्रथितयश, ओजस्वी, पण तितकेच कोमल, मुलायम हृदयाचे, विलक्षण प्रतिभेचे आणि सर्वांगसुंदर अशा भावाभिनयाचे मानबिंदू होते. बैजनाथ उपाख्य लच्छू महाराज लहानपणापासूनच अतिशय चपळ, खट्याळ व मिस्कील, त्यामुळे ‘लुच्चा’-‘लच्छू’-‘लच्छू महाराज’ या नावाने ते प्रसिद्ध झाले. लहान वयातच काका कथकमार्तंड बिंदादीन महाराज यांच्या विद्वत्तापूर्ण, पण रसाळ रचना त्यांना प्रभावित करत असत. साधन-संपन्नता, विलासपूर्णता यांनी समृद्ध अशा त्यांच्या बाल्यावस्थेतही त्यांना शायरी हा प्रकारही रुचिपूर्ण वाटला. या सार्‍यांचा परिपाक म्हणजे त्यांच्याकडे चालत आलेल्या परंपरागत वारशात त्यांच्याकडूनही मोलाची भर पडली.

खुद्द त्यांना भावाभिनय व सुढंग अशा नाजूक, अर्थवाही अंग-प्रत्यंगांच्या नाजूक हालचाली फार मोहवत असत. त्याला अनुसरून त्यांनी लांबलचक व लयबद्ध, छंदबद्ध अशा कविता, छोटे कवित्त तर अभिनयाने नितांतसुंदर केलेच, पण नृत्त विभागातदेखील आमद, तोडे, तुकडे, परण इत्यादींवर ही भावप्रस्तुती करायला सुरुवात केली, की जे आतापर्यंत कोणीही, कधीही केलेले नव्हते. हे निश्चितच एका प्रगल्भ बुद्धिमत्ता व सर्वांगसुंदर अभिनयाच्या मिलाफाचे द्योतक वाटते.

पत्नी रमादेवी ही त्यांच्या केवळ आयुष्याची संगिनी नव्हती, तर कलाविश्वातीलही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी अशी सखी होती. त्यामुळेच जेव्हा ते सपत्नीक मुंबईला फिल्मी दुनियेच्या आमंत्रणावरून आले, तेव्हा ‘मुगल-ए-आजम’, ‘पाकीजा’, ‘जीवन-मृत्यू’, ‘एक ही रास्ता’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘काला पानी’ इत्यादींमध्ये नृत्यदिग्दर्शन करताना आधी लच्छू महाराजजी त्यांना हवे तसे हावभाव, हालचाली प्रथम रमांवर बसवीत व मग ते दोघे मिळून सेटवर नृत्यदिग्दर्शन करीत.

त्यांच्या मुंबईतील वास्तव्यात त्यांच्या भोवती शिष्यगणही होता, उदा. सितारादेवी, रोहिणी भाटे, मधुरिता सारंग, श्वेनी पंड्या इ. बॅले नृत्यशैली कथक नृत्याच्या माध्यमातून अधिक विस्तृत व चांगली व परिणामकारक रितीने भावाभिव्यक्ती करू शकते हेही त्यांचेच मत होय. त्यांची, कथकनृत्याचा देवलोकातून रंगमंचापर्यंतचा प्रवास दर्शविणारी ‘नृत्य परिवर्तन’ ही नृत्यनाटिका फारच संस्मरणीय ठरली. त्यांनी ‘मौसमे-बहार’, ‘बापू की अमर कहानी’, ‘आम्रपाली’, ‘गोकुल की गली सांकरी’, ‘राधा पिया प्यारी’, ‘मालती-माधव’ या सर्व प्रसिद्ध नृत्य-नाटिकांतून आजचे मोठे गुरू, कलाकार यांना नृत्य-दिग्दर्शन केले होते.

मात्र १९७२ साली मुंबईची चमक-दमक व फिल्मी दुनिया सोडून ते लखनौला परतले, तेथील उर्वरित काळ त्यांनी रोजच अध्यापन करीत व्यतीत केला व तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने ‘संगीत नाटक अकादमी’ अवॉर्ड (१९५७), ‘राष्ट्रपती’ पदक (१९५८), ‘राज्य अकादमी’ पुरस्कार (१९७४) देऊन त्यांचा गौरव केला.

अलका राहाळकर

मिश्रा, बैजनाथ कालिकाप्रसाद