Skip to main content
x

मंगेशकर, दीनानाथ गणेशभट

मास्टर दीनानाथ मंगेशकर

दीनानाथ गणेशभट मंगेशकर (अभिषेकी) यांचा जन्म गोव्यातील मंगेशी येथे झाला. त्यांचे वडील गणेशभट भिकाजी अभिषेकी (नवाथे) आणि आई येसूबाई हे मंगेशी देवस्थानाचे, म्हणून त्यांचे ‘मंगेशकर’ हे आडनाव पडले. पांडीमामा मंगेशकरांकडून त्यांना सारंगीचे प्राथमिक शिक्षण मिळाले. शालेय शिक्षणापेक्षा कलेकडे असलेली ओढ पाहून आईने दीनानाथांना रघुनाथ (बाबा) माशेलकर यांच्याकडे गायन शिकण्यास पाठवले. बाबा माशेलकर हे पं. भास्करबुवा बखले यांचे गुरुबंधू, उत्कृष्ट तबलावादक आणि गायक होते.

दीनानाथांची कीर्ती ऐकून किर्लोस्कर संगीत मंडळाच्या चालकांनी त्यांना आपल्या कंपनीत आग्रहपूर्वक बोलावले. त्या वेळी दीनानाथांचे वय अवघे तेरा वर्षे होते. किर्लोस्कर कंपनीत दीनानाथांनी ‘ताज-ए-वफा’ या उर्दू संगीत नाटकातून मुग्धा कमलेची भूमिका केली. या नाटकातील त्यांची पदे अतिशय गाजली. ‘सुंदोपसुंद’ या नाटकात १९१६ साली सुविभ्रमा ही भूमिका करताना ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकरांनी त्यांना ‘मास्टर’ ही पदवी दिली, तीच पुढे रूढ झाली.

वयाच्या अठराव्या वर्षी मा. दीनानाथांनी १९१८ साली चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे या सहकार्‍यांच्या साथीने ‘बलवंत संगीत मंडळी’ स्थापन केली.

बलवंतच्या १९१८ ते १९४० या २२ वर्षांच्या काळात दीनानाथांचे कलाकर्तृत्व झळाळून उठले. बलवंत संगीत मंडळीतील कारकिर्दीत दीनानाथांच्या शकुंतला (सं. शकुंतला), सुरुची (धरम का चांद), कांता (जन्मरहस्य), उत्तरा (वीर विडंबन), लतिका (भावबंधन), शिवांगी (राजसंन्यास), तेजस्वी (रणदुंदुभी), सुलोचना (संन्यस्त खड्ग), सिंधू (एकच प्याला), देवयानी (विद्याहरण), सरोजिनी (मूकनायक) या स्त्री-भूमिका, तसेच गौतम (ब्रह्मकुमारी), राम (रामराज्यवियोग), अर्जुन (सौभद्र), धैर्यधर (मानापमान), सदानंद (गैरसमज), हिंमतराव (देशकंटक), या पुरुष भूमिका गाजल्या.

मा.दीनानाथांची कारकीर्द प्रामुख्याने मराठी संगीत रंगभूमीवर घडली असली तरी त्यांचा शास्त्रीय संगीताचा व्यासंगही मोठा होता. पं.रामकृष्णबुवा वझे यांचे शिष्यत्व त्यांनी विधिवत पत्करले असले, तरी त्या काळात अनेक नामवंत गवयांना ऐकूनही त्यांनी आपली गायकी समृद्ध केली होती. दीनानाथांचे गाणे शास्त्रीय आधाराचे, तसेच उत्स्फूर्त होते. मा. दीनानाथांनी आकाशवाणीवरूनही गायन केले. मलुहा केदार, हेमकल्याण, बागेश्री बहार, बागेश्री कानडा असे अनवट राग त्यांनी आकाशवाणीवरून सादर केले.

संगीतकार म्हणूनही दीनानाथांचे योगदान मोलाचे आहे. ‘संन्यस्त खड्ग’, ‘ब्रह्मकुमारी’, ‘उग्रमंगल’ अशा नाटकांना त्यांनी संगीत दिले. ‘मानापमान’ नाटकातील धैर्यधराच्या पदांच्या चाली त्यांनी बदलल्या. ‘शूरा मी वंदिले’, ‘प्रेम सेवा शरण’, ‘रवि मी’, ‘चंद्रिका ही जणू’ या त्यांच्या चाली लोकप्रिय झाल्या.

मराठी संगीत रंगभूमीवर नाट्यसंगीताचा घाट सुस्थापित झाला. नाट्यसंगीताच्या सुवर्णकाळातच मा.दीनानाथांनी आपली तेजस्वी, तडफदार तरीही मधुर अशी गायनशैली प्रस्थापित केली व नाट्यसंगीतात एक नवीन पर्व सुरू केले. मा.दीनानाथांनी पंजाब बाज प्रथमच नाट्यसंगीतात आणला. ‘उग्रमंगल’ नाटकात प्रथमच कथक नृत्य आणले. रागदारी संगीतातील उत्तमोत्तम बंदिशी, गझला त्यांनी रंगभूमीवर आणल्या.

मा.दीनानाथांचे गाणे आक्रमक व स्वरतालावर प्रभुत्व असणारे होते. लागोपाठचे स्वर आणि श्रुती एका मागोमाग वेगाने घेऊन ते चमत्कृती साधत. उदंड दमश्वास, आक्रमक तान, चमत्कृतिजन्य स्वरयोजना, निसर्गदत्त दैवी आवाज, अनुनासिकाचा कलात्मक वापर, आवाजाचा विस्तृत पल्ला, तीन सप्तकांतील सहज फिरत, अनपेक्षित स्वरसंगतीने साधलेला कलात्मक अपेक्षाभंग, अस्खलित वाणी व उत्तुंग प्रतिभाविलास अशा विविध गुणांनी दीनानाथांचे गाणे नटलेले असे.

संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात आणि नवनवीन बोलपटांच्या आकर्षणामुळे ‘बलवंत’ने १९३३ मध्ये चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा ‘कृष्णार्जुन युद्ध’ हा पहिला चित्रपट होय. त्यातील ‘सुहास्य तुझे मनास मोही’ हे गाणे गाजले; पण चित्रपट चालला नाही. त्यानंतरचेही सर्व चित्रपट अयशस्वी झाल्यामुळे त्यांना नैराश्य आले.

मा.दीनानाथ व्यक्तिगत आयुष्यात एक अजातशत्रू सहृदय व्यक्ती होते. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा व्यासंग दांडगा होता, तसेच देशभक्तीही त्यांच्या ठायी भरलेली होती. सिमला येथे तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नरसमोर झालेल्या जलशात ‘परवशता पाश दैवे’ हे पद ते निर्भयपणे गायले. देशभक्तीमुळेच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून ‘संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक लिहून घेऊन सादर केले.

चित्रपटातील अपयशाने निराश झालेल्या मास्टर दीनानाथांचे वयाच्या अवघ्या एकेचाळिसाव्या वर्षी पुणे मुक्कामी    निधन झाले. मा.दीनानाथांच्या ध्वनिमुद्रिकांतून त्यांच्या गायनाची कल्पना येते. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर या त्यांच्या कन्या व हृदयनाथ हे पुत्र यांनी आज संगीत क्षेत्रात त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे.

        — डॉ. रवींद्र घांगुर्डे

मंगेशकर, दीनानाथ गणेशभट