Skip to main content
x

मंगळवेढेकर, वसंत नारायण

मंगळवेढेकर राजा

     बालसाहित्यकार श्री. वसंत नारायण मंगळवेढेकर यांचे संपूर्ण लेखन ‘राजा मंगळवेढेकर’ याच टोपणनावाने प्रसिद्ध आहे. त्यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

     राष्ट्रसेवादल, साने गुरुजी कथामाला, आंतरभारती इत्यादी सांस्कृतिक कार्य करणार्‍या संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कथाकथन, बालमेळावे, शिबिरे इत्यादींच्या निमित्ताने त्यांनी भारतभर भटकंती केली. या अनुभवविश्वातून त्यांची अनेक पुस्तके आकारास आली आहेत. अनेक ठिकाणी ते कथाकथनाच्या कार्यक्रमासाठी जात. यातूनच आकारास आलेल्या त्यांच्या ‘कथा आणि कथाकथन’ या पुस्तकात त्यांनी कथाकथनाची तंत्रे सांगितली आहेत. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या असून महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट ग्रंथाचे पारितोषिकही या पुस्तकास प्राप्त झालेले आहे. ‘साने गुरुजी जीवनचरित्र’ हा साने गुरुजींच्या जीवनसंघर्षावर प्रकाश टाकणारा असा त्यांचा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आहे.

     कथाकथनांमधून बालगोपाळांची मने जिंकणार्‍या राजा मंगळवेढेकरांनी बालवाचकांसाठी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे बहुतांश लेखन चरित्रे, वृक्ष, निसर्ग व विज्ञान या विषयांवर आधारित आहेत. त्यांच्या पुष्कळशा पुस्तकांना राज्य व केंद्रशासनाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

     मराठी साहित्याच्या दालनात आपल्या विविधांगी अशा समृद्ध साहित्यप्रयत्नांनी राजा मंगळवेढेकरांनी मोलाची भर घातली आहे. तसेच बालगोपाळांसाठीही चरित्रे, नाटके, कथा अशा विविध साहित्यप्रकारांची निर्मिती केलेली आहे.

     आपल्या भारत देशाची विविधतेतून एकतेचा संदेश देणारी संस्कृती आणि भारतातल्या सर्वच राज्यांची सर्व प्रकारची वैशिष्ट्ये आपल्या सहज-सुंदर शब्दांत प्रकट करणारी अशी प्रत्येक राज्याविषयीचे स्वतंत्र पुस्तक लिहिणारे राजा मंगळवेढेकर यांची छोटी-मोठी अशी जवळपास तीनशे पुस्तके प्रसिद्ध आहेत.

- डॉ. संध्या पवार

मंगळवेढेकर, वसंत नारायण