Skip to main content
x

मंगरूळकर, अरविंद गंगाधर

     मराठी आणि संस्कृतचे जाणकार असलेल्या अरविंद गंगाधर मंगरूळकर यांनी संस्कृत आणि प्राकृत (मराठी) या दोन विषयांत एम.ए.ची पदवी प्राप्त केली होती. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून अध्यापन कार्यास सुरुवात करणार्‍या मंगरूळकरांनी पुढे पुण्याच्याच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात संस्कृत-मराठीचे प्राध्यापक आणि विभाग-प्रमुख म्हणून काम केले. मराठी आणि संस्कृत साहित्याच्या व्यासंगाचा त्यांचा अवाकही प्रचंड होता. साहित्य, संगीत आणि कला या तिन्हींचे ते मर्मज्ञ होते. या क्षेत्रातील त्यांचा अभ्यास थक्क करून सोडणारा होता. या विषयांतील ‘ज्ञानकोश’ अशी त्यांची यथार्थ ख्याती होती.

     मराठी भाषाशास्त्राचा त्यांचा व्यासंग मोठा होता. या संदर्भात ‘मराठी: घटना, रचना आणि परंपरा’ हा त्यांनी १९५८साली संपादित केलेला ग्रंथ अभ्यासकांसाठी आजही उपयुक्त आहे. त्यांनी स्वतंत्र लेखन फारसे केले नसले, तरी ‘मेघदूत’चे (१९६१) त्यांचे संपादन अभ्यासपूर्ण आणि नेटक्या संपादनाचा वस्तुपाठ ठरावा. वि.मो.केळकरांबरोबर तयार झालेला त्यांचा ‘ज्ञानदेवी’ हाही अभ्यासक-संशोधकांत मान्यता पावलेला ग्रंथ आहे. ‘नीतिशतक’ हा ग्रंथ त्यांनी १९६१मध्ये संपादित केला असून मृत्यूपूर्वी दोनच वर्षे आधी त्यांचा ‘शेफालिका’ (१९८४) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला असून तो हालसातवाहनाच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद (गद्य) आहे.

     महाराष्ट्र साहित्य पत्रिका (पुणे) ह्यांच्या अनेक अंकांत त्याचे मराठी-संस्कृत साहित्यावर संशोधन-समीक्षात्मक विपुल लेख प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह म्हणून जवळपास दहा वर्षांची त्यांची कारकीर्द प्रशासन आणि साहित्यविषयक उपक्रम या दोन्हींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

     ‘मम्मटाचा काव्यप्रकाश’ हा अर्जुनवाडकर आणि मंगरूळकर यांनी भाषांतरित व संपादित केलेला हजार पृष्ठांचा विवेचक ग्रंथ चाळून आचार्य अत्रेे स्तिमित होऊन गडबडा लोळले, ही आख्यायिका नसून सत्य घटना आहे; अशी नोंद म.श्री.दीक्षित यांनी केली आहे. अग्निहोत्री संपादित पंचखंडी मराठी शब्दकोशानिर्मितीतही त्यांचा मोठा वाटा आहे. मंगरूळकर हे अभिजात रसिक आणि साक्षेपी साहित्य-समीक्षक होते.

     - मधू नेने

मंगरूळकर, अरविंद गंगाधर