Skip to main content
x

मोदानी, कन्हैयालाल एकनाथ

         न्हैयालाल एकनाथ मोदानी यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात दावरवाडी येथे झाला. त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर शेतीत विशेष लक्ष घातले. त्यांनी जुन्या काळातील पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीचे आणि एक किफायतशीर, उत्पादक व कार्यक्षम व्यवहाराचे रूप दिले. एक प्रगतिशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवला. ‘उद्यम’ मासिकाचे ते कायम वर्गणीदार होते. त्यातील माहितीच्या आधारे ते नवे प्रयोग करत. नव्या प्रयोगांची माहिती घेण्यासाठी समक्ष भेट देत व नव्या प्रयोगांची प्रत्यक्ष पाहणी करत.

         पैठण भागात परंपरेने दगडी ज्वारी पिकवली जात असे. ती आकाराने लहान व टणक होती. पीक तयार होण्यास लागणारा वेळ जास्त होता व एकरी उत्पादनही कमी होते. कन्हैयालाल यांनी सोलापूर मोहोळ भागात ज्वारी चांगली होते असे ऐकले होते. त्यांनी सोलापूरला जाऊन तेथे प्रचलित असलेल्या मालदांडी ज्वारीची माहिती मिळवली. मालदांडी ज्वारीचे उत्पादन जास्त होते, दगडी ज्वारीपेक्षा कमी काळात पीक तयार होत असे, दाणा ठोसर होता व अधिक चमकदार होता. त्यांनी सोलापूरहून (मोहोळ) पोतेभर मालदांडी ज्वारी आणली व ती पेरून पुढील ऋतूसाठी बियाणे तयार केले. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्याचे बियाणे आसपासच्या शेतकर्‍यांना वाटले व मालदांडीचा प्रसार केला.

         पारंपरिक पद्धतीत उसापासून गूळ तयार केला जाई. पण मोदानी भुस साखर तयार करू लागल्यामुळे शेतकर्‍यांना एकरी अधिक उत्पन्न मिळू लागले. त्यासाठी उत्तर प्रदेशातून जाणकार तज्ज्ञ आणले होते. मोदानी कुटुंबाकडील जमिनीचे क्षेत्र विशाल होते. सर्व जमिनीला पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांना गावाशेजारील वीरभद्रा नदीतून पाणी आणण्यात यश लाभले. त्यांनी नदीच्या पात्रात जॅकवेल बांधली. त्यावर इंजिन बसवले व १९५० मध्ये ५००० फूट लांबीची आणि ८ इंच व्यासाची सिमेंट पाईपलाईन टाकली व त्याद्वारे शेतीला पाणी उपलब्ध केले. त्या भागातील लिफ्ट इरिगेशनचा हा पहिलाच प्रयोग होता. तो यशस्वी ठरल्याने इतरांनाही प्रोत्साहन मिळाले व त्यांनी पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना राबवल्या. ही प्रगती पाहण्यासाठी हैदराबाद राज्यातील इंग्रज अभियंते आले होते. हैदराबाद संस्थानचे मुख्यमंत्री बी. रामकृष्ण राव यांनीही या योजनेला भेट दिली. पीक योजनेतही त्यांनी अनेक प्रयोग केले. मोदानी कुटुंब परंपरेने जरिला व गावरान कापसाची लागवड करत. परंतु पुढे त्यांनी बाजारात नव्याने आलेल्या कंबोडिया व वरलक्ष्मी या कापसाची निवड केली व कपास उत्पादनात भरघोस वाढ करण्यात यश मिळवले. पैठणसारख्या ठिकाणीही त्यांनी भात व भुईमुगाची शेती करण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखवले. येथेही तांदूळ पिकवता येईल हे सिद्ध केले. भुईमूग हे या भागातील पारंपरिक पीक नाही. पण तेही कन्हैयालाल मोदानी यांनी घेतले.  

         कन्हैयालाल शेतीविषयक माहिती मिळवून आपले ज्ञान अद्ययावत ठेवत. दिल्लीला १९५८मध्ये अखिल भारतीय स्तरावर कृषी प्रदर्शन भरले होते. त्याला अमेरिकेचे अध्यक्ष जनरल आयसेन हॉवर हजर होते. कन्हैयालालही या प्रदर्शनाला आवर्जून गेले होते. देशात १९५०च्या दशकात रासायनिक खतांचा प्रसार झालेला नव्हता. पारंपरिक पद्धतीने शेणखत तयार व्हायला वर्ष-सहा महिने लागत. शेतकी खात्याने कंपोस्ट खताचा प्रसार हाती घेतला होता. या नव्या तंत्रज्ञानाचा कन्हैयालाल यांनी अंगिकार केला. स्वत:च्या शेतात कंपोस्ट खड्डे घेऊन कंपोस्ट खत निर्माण केले व ते तंत्रज्ञान लोकांपर्यंत नेले. या नव्या तंत्रज्ञानाचा शेती उत्पादनावर चांगला परिणाम झाला. ते कृषी प्रदर्शनात उत्साहाने भाग घेत असत आणि त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. एके वर्षी त्यांनी ५३१ क्विंटल ज्वारी ‘लेव्ही’त घातली. त्याबद्दल त्यांना राज्य पुरस्कारही मिळाला. ज्वारीची मळणी बैलांनी तुडवून करत असत. पण या प्रक्रियेत बैलांच्या पायाला फार जखमा होत, त्यातून रक्तही येई. हा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांनी दगडी रोलर तयार केला होता. तो रोलर कणसांच्या ढीगावरून आधी फिरवला जाई, त्यामुळे कणसाचे टोकदार कंगोरे मोडले जात. त्यामुळे बैलांना होणार्‍या दुखापतीचे प्रमाण कमी झाले.

         मोदानी आपल्या शेतात मोठाले बांध घालत. त्याचे दोन फायदे होत. बांध घातल्यामुळे शेतात पडलेले पावसाचे पाणी वाहून न जाता शेतातच मुरत असे. त्याबरोबर शेतातील माती वाहून जाणे थांबते. जमिनीची धूप थांबते. दुसरा फायदा असा की रुंद बांधावर खुरटे गवत चांगले उगवते व शेतात काम करणार्‍या बैलांना कामाच्याच ठिकाणी वैरण मिळते. शेतमशागती बाबतीतही मोदानी यांनी नवे विचार रुजवले व त्यांचा प्रसार केला. पेरणी केल्यावर विरळणी करण्याची पद्धत त्यांनी प्रचलित केली. बियांची उगवण झाल्यावर ज्या भागात दाट पेरा झाला आहे तेथील झाडांची संख्या ते कमी करत. पेरणी करण्यासाठी त्यांनी सुधारित तिफण विकसित केली.

         पारंपरिक पंधरा इंची तिफण ऐवजी अठरा इंची तिफण तयार केली व ती वापरात आणली. पेरणी विरळ केल्यामुळे आंतरमशागत करणे सोयीचे होत असे. त्यांनी शेतीसाठी आधुनिक यंत्रसामग्री आणली. त्या काळात संपूर्ण जिल्ह्यात तीन ट्रॅक्टर्स होते. त्यापैकी एक ट्रॅक्टर मोदानी यांच्याकडे होता. शेतीतील विविध कार्यांसाठी ते ट्रॅक्टरचा वापर करत. त्यांनी ट्रॅक्टरचा उपयोग विहिरीतून पाणी उपसण्यासाठीही प्रामुख्याने केला. दावरवाडी व आसपासच्या परिसरात पिठाची गिरणी नव्हती, मोदानी यांनी ही अडचण लक्षात घेऊन गावात पिठाची गिरणी सुरू केली. भारत स्वतंत्र झाला पण हैद्राबाद संस्थानात मात्र राजकीय व सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली. येणारे संकट लक्षात घेऊन मोदानी यांनी आपले कुटुंब पुण्याला हलवले. त्यांनी आपण एकटेच गावात राहून मालमत्तेचे संरक्षण केले व लोकांना धीर दिला.

         कन्हैयालाल बहुश्रुत होते. त्या काळात बाह्य जगाशी व बाजारपेठेशी संपर्क ठेवायचे एकच साधन होते, ते म्हणजे आकाशवाणी. ते आकाशवाणीवरील बातम्या व बाजारभाव नियमित ऐकत व वर्तमानकाळाशी संपर्क ठेवत. त्यांनी आयुष्यभर खादीचे कपडेच परिधान केले. अशा कर्तबगार शेतीनिष्ठ नागरिकाचे त्यांच्या वयाच्या एकसष्ठाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

- डॉ. निळकंठ गंगाधर बापट

मोदानी, कन्हैयालाल एकनाथ