Skip to main content
x

मोडक, ताराबाई के.

     सदाशिवराव व उमा केळकर ताराबाईंचे मातापिता. ताराबाईंचे बालपण व प्राथमिक शिक्षण इंदूर कॅम्पमधील मिशन शाळेत हिंदी माध्यमातून झाले. पुढचे शिक्षण हुजुरपागेच्या कन्याशाळेत झाले. ताराबाई १९०९ मध्ये मॅट्रिक झाल्या. त्याच वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. १९१४ मध्ये त्या मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. झाल्या आणि १९१५ मध्ये त्यांचा विवाह के. व्ही. मोडक यांच्याशी झाला.

      १९२१ मध्ये ताराबाई राजकोट येथील बार्टन फीमेल ट्रेनिंग महाविद्यालया प्राचार्या झाल्या. या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्याच भारतीय महिला होत. १९२३ ते १९३२ या काळात त्यांची कार्यभूमी दक्षिणामूर्ती ही होती. पुढची दोन वर्षे त्या वासदा येथे शिक्षिकेची नोकरी करीत होत्या. नंतरची १३ वर्षे त्यांनी दादर, मुंबई येथे शिशुविहार मधून बालशिक्षण प्रसाराचे कार्य केले. ग्रामीण बालशिक्षणाचे कार्य त्यांनी १९४५ ते ५७ या काळात बोर्डी येथे केले. याच अवधीत १९५२ मध्ये त्यांची कन्या प्रभा हिचा व पुढच्याच वर्षी पती के. व्ही. मोडक यांचा मृत्यू झाला. १९४६ ते ५१ मध्ये त्या महाराष्ट्र विधानसभा सदस्या होत्या. यानंतर म्हणजे १९५५ ते १९७३ पर्यंत त्या कोसबाडशी एकरूप होऊन राहिल्या आणि “माणसाचं माणूसपण कठीण आणि अशक्यप्राय दिसणारी कामे करण्यातच आहे” याचा प्रत्यय ताराबाईंनी कोसबाडच्या टेकडीवर फुला-मुलांचा बगीचा फुलवून, विकासवाडीचे आनंदवन निर्माण करून दिला. बोर्डीचे ग्रामीण बाल शिक्षा केंद्र कोसबाडला १९५७ मध्ये स्थानांतरित झाले. विकासवाडी योजना ताराबाईंनी एप्रिल १९५५ मध्ये भारत सरकारच्या शिक्षण खात्याकडे सादर केली होती व दीड वर्षाने ती मंजूर झाली. १० फेब्रुवारी १९५८ ला इंदिरा गांधींच्या हस्ते विकासवाडी योजनेचे औपचारिक उद्घाटन झाले.

      ताराबाईंना अनुताई वाघ व सरलाताई देवधर यांनी साथ दिली. ताराबाई त्यांना क्रमश: आपला मुलगा व मुलगीच मानत. ठाणे जिल्ह्यात ३ ते ३.१ लाख वारली जमातीचे लोक होते. वारली मुलांची गैरहजेरीची, अनियमितपणाची कारणे शोधून त्यांच्या शिक्षणाच्या मार्गातला अडथळा दूर करून, परकेपणाची भिंत फोडण्याचे काम ताराबाई व त्यांच्या सहाय्यकांनी अविरतपणे केले. आदिवासींना शाळेबद्दल जो दुरावा वाटतो तो नाहीसा करण्यासाठी पाड्या-पाड्यात ओळखी केल्या, आठवड्यातून एकाएका घरी बैठक घेतली, शिक्षिका झोपड्यात जाऊन गप्पा मारू लागल्या, अंगणवाड्या चालवू लागल्या. वारल्यांच्या मुलांना श्रमाचा कंटाळा नाही, हे ताराबाईंनी ओळखले. ताराबाईंची कुरणशाळा गुरे चारणाऱ्या मुलांच्या मागोमाग जाई. श्रम व उद्योगात वारली वरचढ असत म्हणून झाडावर चढणे यासारख्या स्पर्धा घेऊन, रोजच्या भटक्या जीवनाशी सुसंगत असे सहली, प्रवासाचे उपक्रम त्यांनी आखले. माध्यम, अभ्यासक्रम, शिकविण्याची पद्धत, जागा, गती या सर्वांतच ताराबाईंनी आमूलाग्र बदल केला. १९६४ मध्ये ‘बालग्राम सेविका विद्यालय’ सुरू केले. मुलांना शाळेच्या कार्यक्रमाचे आकर्षण वाटेल आणि त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चेतना मिळेल असा अभ्यासक्रम सुरू केला. दारिद्रय, अंधश्रद्धा, अस्वच्छता, अज्ञान व दारुचे व्यसन यातून व अवहेलनेतून या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांच्याशी समरस झालेल्या ताराबाईंनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने अनेक उपक्रम हाती घेतले, प्रयोग केले.“त्यांना खाता येईल अशा वस्तूंची निर्मिती त्यांना शिकवणं हे सर्वप्रथम काम. गणित, सफाई, मूलोद्योग सुद्धा नंतर!” अशा निश्‍चयाने सर्व केले.

      तेथील मुलांचे नैसर्गिक गुण लोप पावणार नाहीत याची काळजी विकासवाडी घेई. विकासवाडीने मुलांच्या बुद्धीबरोबर पोटाला खाद्य पुरवायचे प्रयत्न केले. डॉक्टरांकडून सर्व मुलांची शारीरिक तपासणी करून घेतली, त्यांना स्वच्छतेच्या सवयी लावल्या. कोसबाडची माती कोसबाडच्या मुलांची प्रतिभा फुलवू लागली. शेतकरी मूलोद्योग सुरू केला, मुलांचे व मुलींचे वसतिगृह काढले, उद्योगालय चालू केले. कार्यानुभव योजना लागू केली. शिक्षण हे जीवनशिक्षण व्हावे म्हणून व्यवसाय शिक्षण समाविष्ट केले. १९७३ मध्ये विकास मुद्रणालयाची स्थापना केली. ५० पेक्षा अधिक वर्षे ताराबाईंनी बालशिक्षणाचा प्रयोग केला.

      सकस आहार योजना, पूरक अन्न योजना, कुरणशाळा, रात्रशाळा, शबरी उद्योगालय (१९७७), प्रौढ शिक्षण वर्ग असे विविध उपक्रम त्यांनी बालवाडी व पाळणाघराबरोबर राबविले. पालक शिक्षणाचा समावेश हा त्यांच्या कार्याचा विशेष मानता येईल. त्यांचे सारे प्रकल्प रिकाम्या तिजोरीच्या आधाराने सोडले जात. त्या म्हणत - “होईल, सारे होईल, मला वाट पाहायची सवय आहे.” स्वतःच्या खासगी खर्चासाठी त्यांनी कधी दुसर्याचा पैसा घेतला नाही. राष्ट्रीय उत्सव, प्रशिक्षण वर्ग, शिक्षक मेळावे, आदिवासी भगिनींचे मेळावे, रंजन कार्यक्रम, बालशिक्षण विषयक प्रदर्शने इत्यादी कार्यक्रम कोसबाड टेकडीवर वर्षभर चालू असत. ओसाड टेकडी खऱ्या अर्थाने शैक्षणिक पंढरपूर बनवण्याचे श्रेय ताराबाई व त्यांच्यासोबत चिकाटीने परिश्रम करणाऱ्या सहकाऱ्यांना आहे. ‘प्रार्थना समाजी’ असल्यामुळे ताराबाई कर्मकांडाच्या, देवपूजेच्या विरुद्ध होत्या. तरी त्या समतोल वृत्तीच्या, अत्यंत सहृदय होत्या. त्यांना कामाचा चतुरस्र उरक होता. ‘शिक्षणपत्रिका’ हे नियतकालिक मराठी, गुजराती व हिंदी या तीन भाषांतून त्यांनी चालविले व चौदा वर्षे त्या माध्यमातून केवळ तात्त्विक विवेचनापेक्षा प्रत्यक्ष कृती, अनुभवचित्रण, चर्चा, उदाहरणे अशा गोष्टींवर त्यांनी भर दिला. अनेक दुखण्यांशी झुंज देणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ ताराबाईंचा ८१ वा वाढदिवस १९ एप्रिल १९७३ रोजी साजरा झाला. अखेर कर्करोगाने त्यांची इहलोक यात्रा संपविली.

       ताराबाईंच्या या बालशिक्षण यज्ञात त्यांचे प्रेरणास्थान व सुरुवातीचे मार्गदर्शक म्हणून गिरिजाशंकर भगवानजी ऊर्फ गिजुभाई बधेका यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तसेच आपल्या देहाला अनुताईंनी अग्नी द्यावा अशी इच्छा करणाऱ्या ताराबाईंच्या जीवनकार्याची सांगता अनुताईंच्या उल्लेखावाचून पूर्ण होणार नाही.

       ताराबाईंच्या बहुमोल शिक्षण कार्याबद्दल भारत सरकारने १९६२ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार व सुवर्णपदक जाहीर केले, परंतु ‘स्वतःचा मानसन्मान करून घ्यायला एवढा वेळ व पैसा खर्च करणं’ ताराबाईंना परवडणारे नव्हते. म्हणून त्यांचे मानचिन्ह व सनद टपालाने त्यांच्याकडे पाठवले गेले. बालवाडी व प्राथमिक शाळेत ९५ टक्के तर पाळणाघरात १०० टक्के आदिवासी मुले आहेत. काका कालेलकर म्हणतात, “मी जर हिंदुस्थानच्या शिक्षण कार्याचा इतिहास लिहावयास बसलो तर ‘एका नव्या युगाचा आरंभ’ म्हणून ताराबाईंच्या कुरणशाळेला एक स्वतंत्र अध्याय देईन.....माँटेसरी व गिजुभाई यांना मागे टाकून ताराबाई कितीतरी पुढे गेल्या आहेत.”

      आमचे घर, बालकांचा हट्ट, स्वयंविकास व शिस्त, बिचारी बालके, कुरणशाळा ही पुस्तके ताराबाईंनी पालकांसाठी लिहिली. नदीची गोष्ट, गंपू आणि लाकूड दंड्या, परोपकारी राजा विक्रम, आजीबाईंच्या गोष्टी भाग १ व २, कावळ्याला लागली तहान, बिरबल बादशहाच्या गोष्टी ही पुस्तके त्यांनी लहान मुलांसाठी लिहिली. ताराबेनना पाठो, आपणुं घर, बाळकोनुं हठ, स्वयंविकास अने शिस्त, घरमां मॉण्टेसोरी, गंगेशना पोपट. ही त्यांची गुजराती पुस्तके प्रसिध्द आहेत. बालवाडी इन रूरल एरिया, मिडोव स्कूल हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले.

       त्यांनी अनुताई वाघ यांच्या सोबत - विकासाच्या मार्गावर (मराठी), विकास के मार्ग पर (हिंदी) ही पुस्तकेही लिहिली आहेत.

 - वि. ग. जोशी

संदर्भ
१.      केळकर स. आ. ; ताराबाई आणि बालशिक्षण
२.      फाटक  पद्मजा ; शिक्षणतज्ज्ञ ताराबाई 
३.      वाघ अनुताई ; कोसबाडच्या टेकडीवरून 
मोडक, ताराबाई के.