Skip to main content
x

मराठे, अनुराधा

निसर्गरम्य कोकणातील चिपळूण जवळील वहाळ या गावी अनुराधा मराठे यांचा जन्म झाला. वडील स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे सेवादलाची नवी शाखा उघडण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. म्हणून त्यांना धुळ्यामध्ये स्थायिक व्हावे लागले. आई सुधा व वडील विष्णू वामन नेने या दोघांनाही गाण्याची जाण असल्यामुळे धुळ्यासारख्या संगीताचा दुष्काळ असलेल्या भागातही अनुराधावर संगीताचे संस्कार लहानपणापासून झाले. आग्रा घराण्याचे अप्पा शास्त्री यांनी अनुराधाची वयाच्या सातव्या वर्षी परीक्षा घेतली. गळ्यातील गोडवा आणि सुरांची समज यांमुळे प्रभावित होऊन अप्पांनी त्यांचे शिष्य श्रीपाद रामचंद्र नाईक यांना अनुराधाला शास्त्रीय गायन शिकवण्याचा आदेश दिला. नाईक यांनी अनुराधा यांना तब्बल अठरा वर्षे (१९५७ ते १९७४) आग्रा घराण्याच्या शास्त्रीय गायनाचे धडे दिले.

त्यांचे बालपण धुळ्यातच गेले, आणि कला शाखेतील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी तेथेच पूर्ण केले. बी.ए.चे शिक्षण घेत असतानाच त्यांनी गायन हा मुख्य विषय घेतला. त्यांना १९७० साली पदवी संपादन केल्यावर नाईक सरांकडून स्वतंत्र गाण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार धुळे आणि आसपासच्या परिसरात त्यांनी छोटेखानी मैफली केल्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘धुक्यात हरवली वाट’ आणि ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशा दोन नाटकांमधून त्यांनी अभिनेत्री म्हणून रंगमंचावर पदार्पण केले. या दोनही नाटकांसाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाचे अभिनयाचे रौप्यपदक  मिळवले.

त्यांचे १९७४ साली लग्न झाल्यावर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. संसार सांभाळून जमेल तेवढे गावे असा त्यांचा उद्देश होता. पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडून १९७५ ते १९८० या काळात भेंडीबाजार घराण्याची गायकी शिकण्याचा योग आला. तसेच, त्यांनी आकाशवाणीची स्वरचाचणी देण्याचे ठरवले व त्या निमित्ताने १९७८ पासून गजाननराव वाटवे यांच्याकडून त्या भावगीते शिकल्या. त्या १९७८ पासून आकाशवाणीवर चाळीसहून अधिक ‘स्वरचित्रे’ गायल्या आहेत. अभ्यासू वृत्ती असल्यामुळे प्रत्येकाकडून त्या काहीतरी नवे शिकत होत्या आणि आपल्या गायनाच्या शैलीला नवे पैलू पाडत होत्या.

यशवंत देवांकडून शब्दोच्चार, श्रीनिवास खळे यांच्याकडून अवघड गाण्यांमधील लयीचा अचूक अंदाज, राम कदम यांच्याकडून लावणी, चित्रपटगीते आणि अभंग अशा वेगवेगळ्या शैलींमधील फरक आणि बारकावे त्यांनी टिपले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’ या प्रसिद्ध कार्यक्रमात त्या गायल्या. माया गोविंदांच्या पदांवर संगीतकार जयदेवांनी ठुमरीच्या धाटणीवर संगीतबद्ध केलेल्या हिंदी रचना त्या पुणे आकाशवाणीसाठी गायल्या.

स्वरानंद प्रतिष्ठानाच्या ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या मराठी वाद्यवृंदात त्यांनी गायलेल्या गाण्यांना रसिकांनी ‘वन्समोअर’ने नेहमीच दाद दिली. त्यानंतर पु.ल. देशपांडे यांच्या गीतांवर आधारित ‘पुलकित गीते’, सुधीर मोघे यांच्या देशभक्तिपर गीतांवर आधारित ‘स्वतंत्रते भगवती’, अरुण दाते यांचा ‘शुक्रतारा’, सुधीर फडके यांचा ‘फिटे अंधाराचे जाळे’, यशवंत देवांचा ‘स्वर आले दुरुनी’, प्रभाकर जोग यांचा ‘गाणारं व्हायोलिन’ अशा अनेक कार्यक्रमांतून अनुराधा मराठे यांनी आपल्या समर्थ गायकीचे दर्शन घडविले.

‘साज ठुमरीचा’, ‘ओंजळीत स्वर तुझेच’, ‘गंध प्रीतीचा’, ‘माय लेकरू’ या अलीकडच्या काळात नव्या संगीतरचनांच्या कार्यक्रमांतही त्या गायल्या आहेत. दूरदर्शनवरील ‘शब्दांच्या पलीकडले’, ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमांतही त्यांचा सहभाग होता. ‘विठ्ठल विठ्ठल’ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली होती. ‘बंदा रुपया’ (राम कदम यांनी स्वरबद्ध केलेल्या लावण्या )व ‘मी काय तुला वाहू’ (गजानन वाटवे यांनी स्वरबद्ध केलेली भावगीते) या दोन स्वतंत्र ध्वनिफिती त्यांच्या नावावर जमा असून, अन्यही अनेक ध्वनिफितींसाठी त्यांनी गायन केलेआहे. यशवंत देव यांच्या ‘संपूर्ण ज्ञानेश्वरी’ या प्रकल्पात त्यांनी ५०० ओव्या गायल्या.

अनंत माने यांच्या ‘गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं’ या चित्रपटासाठी अनुराधा मराठे यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले. ‘मायेची सावली’, ‘लावण्यवती’, ‘आभाळाची सावली’ असे चित्रपट करत नव्या पिढीतील संगीत दिग्दर्शकांसोबत ‘दहावी फ’, ‘हापूस’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले.  चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा ‘चित्रकर्मी’ हा सन्माननीय पुरस्कार मिळाला. स्वरानंद प्रतिष्ठानाचा ‘माणिक वर्मा बहुस्पर्शी गायिका’ हा पुरस्कार पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. भारत गायन समाजाचा ‘मालती पांडे’ पुरस्कार, ‘खानदेश भूषण’, ‘स्वरगायत्री’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

अमोल ठाकुरदास

मराठे, अनुराधा