Skip to main content
x

मसलेकर, आनंद रामचंद्र

        नंद रामचंद्र मसलेकर यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्यांचे  वडील  रामचंद्र  मसलेकर हे हैद्राबाद येथे दिवाणी न्यायाधीश होते.आनंद मसलेकर यांचे प्राथमिक शिक्षण अहमदनगर येथे झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. १९५२ ते १९५७ या काळात त्यांनी पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात बी.एस्सी.पर्यंतचे पदवी शिक्षण घेतले. याच कालावधीत त्यांनी हिंदी (प्रवीण) या विषयातील ज्ञान मिळविले. १९५७ मध्ये महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेत त्यांचा सहभाग होता. त्यानंतर १९५८  ते १९६१ या कालावधीत त्यांनी डेहराडून येथील ‘इंडियन फॉरेस्ट महाविद्यालया’त पदव्युत्तर शिक्षण घेतले. येथे साठ जणांच्या बॅचमध्ये त्यांचा पाचवा क्रमांक आला. डॉ. मसलेकर ‘बॉम्बे पब्लिक सर्व्हिस कमिशन’च्या निवड चाचणी परीक्षेत सर्वप्रथम आले.

        १९६० मध्ये डॉ.मसलेकरांची पुणे येथे पहिली नियुक्ती झाली. १९६२ ते १९६३ या काळात त्यांनी जोधपूरच्या ‘ए.झेड.आर.आय.’ या संस्थेत चार महिन्यांचा ‘एअर फोटो इंटरप्रिटेशन’ या विषयाचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला. तसेच १९६५ ते १९६६ मध्ये डेहराडून येथेदेखील ‘इंडियन फोटो इंटरप्रिटेशन’ या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर ‘आय.पी.आय’ या संस्थेत ‘इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर अर्थ सायन्स’  या विषयात त्यांनी एका वर्षाचा पदव्युत्तर प्रशिक्षण कोर्स केला. संपूर्ण वर्गात ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले होते.

         पुढे १९६९ ते १९७१ या काळात नेदरलँड येथे जाऊन त्यांनी याच विषयात एम.एस्सी पदवी प्राप्त केली. या विषयात ही पदवी घेणारे मसलेकर हे पहिले वनाधिकारी होते. त्यानंतर जर्मनी, ऑस्ट्रिया या देशांत त्यांनी काम केले. १९८१ मध्ये ‘बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड मार्केटिंग’ या विषयात त्यांनी गुजरात विद्यापीठातून पी.एच.डी. केली. १९८९ मध्ये बंगळुरू येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज’ येथून मसलेकर यांनी दहा आठवड्यांचा प्रशिक्षण कोर्स  केला. त्यानंतर मद्रासच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’ या संस्थेचा ‘ए.आय.बी.एम’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला.

         १९८५ ते १९८७ या काळात केंद्र सरकारतर्फे ‘बिझनेस मॅनेजमेंट’ या विषयातील अभ्यासक्रम वनाधिकाऱ्यांसाठी अनिवार्य केला होता. डॉ.मसलेकर यांनी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यात समन्वयक आणि अध्यापक म्हणून काम केले. त्यांनी पुणे, राजपिपला आणि जोधपूर येथे तीन अभ्यासक्रम सत्रे घेतली.

        डॉ.मसलेकर यांनी विदर्भातील आठ जिल्ह्यांत कामे केली. नागपूर येथे त्यांनी साहाय्यक वनसंवर्धन अधिकारी म्हणून काम पाहिले. १९६३मध्ये त्यांनी नरनाळा किल्ला पर्यटनासाठी विशेष योजना तयार केली. १९७२ ते १९७४मध्ये डेहराडून येथे ‘प्री-इन्व्हेस्टमेंट सर्व्हे ऑफ फॉरेस्ट’ या संस्थेत त्यांनी ‘एअर फोटो अँड मॅपिंग’ या विषयावर काम पाहिले. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार आणि भूतान या प्रदेशांत मसलेकरांनी वनाधिकारी म्हणून काम केले. १९७३मध्ये भारताच्या परदेश मंत्रालयातर्फे तीन वनाधिकाऱ्यांना भूतानमध्ये विशेषज्ञ म्हणून पाठविण्यात आले होते, त्यांत डॉ.मसलेकरदेखील सभासद होते. या वेळी ‘ वनसर्वेक्षण आणि भूतानची वनसंपदा’ या विषयावर त्यांनी अहवाल सादर केला.

       १९७४ ते १९७६ मध्ये  इथिओपियात त्यांनी ‘युएनडीपी-वर्ल्ड-फूड प्रोग्रॅम’ साठी वनतज्ज्ञ आणि प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले. तिथे वनीकरणाच्या २४ कामांची आखणी केली. खाद्यसामग्री आणि वितरणाची व्यवस्था केली. त्यांनी ‘अंगमेहनत आणि खाद्य’ यांची सांगड घालणारे परिमाण तयार केले. १९६८ ते  १९६९ मध्ये ‘महाराष्ट्र वनविकास मंडळा’ची स्थापना केली. यात चार विभागवार रचनेनुसार पश्चिम चांदा विभागाचे पहिले उपसंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जगातील पहिली ६० एकर क्षेत्रात असलेली सागवान नर्सरी मसलेकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा येथे निर्माण केली.

        १९७८ मध्ये अहमदाबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये त्यांची प्राध्यापक आणि कार्यक्रम समन्वयक म्हणून नेमणूक झाली. तेथील सात तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट’ ही संस्था स्थापण्यात आली. येथे प्रशिक्षण कार्यक्रमांचे संपूर्ण काम डॉ. मसलेकरांनी पाहिले. नंतर पंतप्रधानांच्या आदेशानुसार ही संस्था भोपाळ येथे स्थापित झाली आणि वन-व्यवस्थापनात एक वेगळे पर्व सुरू झाले. याच काळात ‘गुजरात स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट’ या संस्थेत त्यांनी अध्यापन केले. गुजरात विद्यापीठात त्यांनी संशोधनोत्तर पी.एच.डी. पूर्ण केली.

          १९८३ ते १९८५ दरम्यान चंद्रपूर येथे वनविकास महामंडळात प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून ते नियुक्त झाले. डॉ.मसलेकरांच्या प्रामाणिक आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे सर्वांमध्ये उत्साह निर्माण झाला. अलापल्ली विभागात जुन्या अयशस्वी रोपवनांना त्यांनी प्रयोगाद्वारे तरतरीत केले. लोहारा येथील हस्तकागद गिरणी चालू केली. कनारगाव (चंद्रपूर) आणि यामला (गडचिरोली) या ठिकाणी दोन वसाहतींतील एकूण १७० जुने येरवडा तुरुंगाचे कैदी होते, त्यांच्या समाजातील पुन:स्थापनेसाठी विशेष प्रयत्न केले. सर्व प्रदेशांत बिनतारी योजना कार्यान्वित केली. चांदा जिल्ह्याचे दोन जिल्हे झाले : चंद्रपूर आणि गडचिरोली; या जिल्ह्यांत प्रवेश केलेल्या नक्षलवादी चळवळीकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. या क्षेत्रात (एफ.डी.सी.एम.) ‘आगप्रतिबंधक’ योजना चालू केली.

         डॉ. मसलेकरांनी आलापल्ली येथे आदिवासींसाठी सुतारकाम प्रशिक्षण सुरू केले, तज्ज्ञांच्या सल्ल्याने अनेक उत्पादने व विक्रीही  सुरू केली. या दोन वर्षांत आदिवासी भागात डॉ. मसलेकरांनी लक्षणीय सुधारणा केल्या.

        त्यांनी १९८७ मध्ये वनमंत्रालयात वनसहसचिव म्हणून काम पाहिले, त्यानंतर त्यांची वन आणि महसूल विभागांत नियुक्ती करण्यात आली. डॉ. मसलेकरांच्या पुढाकाराने वनविभागात संगणकाचा वापर करण्याची योजना अमलात आली. मसलेकरांच्या या कामगिरीबद्दल त्यांना पुढे  सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.

         १९८८ ते १९९१ मध्ये बंगळुरू येथे त्यांनी केंद्राचे पहिले प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक म्हणून काम पाहिले. यात आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, केरळ, तामीळनाडू आणि लक्षद्वीप या राज्यांत त्यांनी वनाधिकारी म्हणून काम पाहिले. याच काळात ‘सार्क’च्या वनसंशोधन तज्ज्ञांच्या बैठकीसाठी श्रीलंकेत भारताचे प्रतिनिधी म्हणून डॉ. मसलेकरांची निवड झाली. १९९१ मध्ये त्यांची महाराष्ट्राच्या सामाजिक वनीकरण संचालनालयात संचालक म्हणून नेमणूक झाली. १९९३मध्ये डॉ.मसलेकरांची महाराष्ट्राचा मुख्य वनसंरक्षक म्हणून नेमणूक झाली.

         १९६० मध्ये डॉ. आनंद मसलेकरांनी बॉम्बे फॉरेस्ट मॅन्युअलच्या कामासाठी एका वनसंरक्षकाची नेमणूक केली. १९९३ आणि १९९४ साली ‘इंटरनॅशनल फॉरेस्ट कॉन्फरन्स’ झाली. यात राज्यातर्फे वनमंत्र्यांना पाठविले होते. नागपूर येथे १९८६ मध्ये वनविभागाचे मुख्यालय म्हणून ‘वनभवन’ इमारतीसाठी डॉ. मसलेकरांनी पाठपुरावा करून शासनाची  मंजुरी घेतली.

          १९९३ - ९४ मध्ये डॉ. मसलेकरांनी सई परांजपे दिग्दर्शित ‘पपीटा’ या चित्रपटासाठी केंद्र आणि राज्यशासनाकडून आर्थिक मदत मिळवून दिली. हा चित्रपट वने आणि आदिवासींवर आधारित होता.

          डॉ. मसलेकरांनी ‘फॉरेस्ट पॉकेट बुक’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले व वनव्यवस्थापनावर आधारित असलेल्या या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या काढल्या. त्यांचे अनेक शास्त्रोक्त लेख प्रसिद्ध झाले. त्यांचे ‘जंगलची वाट’ हे आत्मवृत्त १९९४ साली प्रसिद्ध झाले.

          डॉ. मसलेकरांना उत्कृष्ट संशोधन लेखांबद्दल १९७२ साली ‘सर डेट्रिच ब्रॅन्डीस’ हे पारितोषिक मिळाले. १९८३ मध्ये टाटा रिसर्च फाउण्डेशन, पुणेतर्फे घेतलेल्या निबंध स्पर्धेत त्यांना दुसरे पारितोषिक मिळाले. १९९८ मध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्रालयाने त्यांना ‘कार्य आयोजन सुधारणा समिती’चे अध्यक्ष केले. १९९४ मध्ये ‘जंगलची वाट’ या पुस्तकाला उत्कृष्ट आत्मवृत्ताबद्दल कै. हरी  नारायण आपटे स्मृती पारितोषिक मिळाले. २००९ मध्ये सांगलीच्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठातर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत मसलेकरांना प्रथम पारितोषिक मिळाले. डॉ. मसलेकर यांनी  ड्रॉइंग ,पेंटिंग, यांसाठी अनेक पारितोषिके मिळवली होती. त्यांना नाटकात काम करायलादेखील आवडायचे. १९५५ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या ‘यूथ फेस्टिव्हल’मध्ये पुणे विद्यापीठाच्या ‘सतरा वर्षे’ या नाटकाला त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवून दिले होते.

       - अनघा फासे

मसलेकर, आनंद रामचंद्र