मुळगावकर, अरविंद विष्णू
अरविंद विष्णू मुळगावकरांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांना लहानपणापासून तालवाद्यांबद्दल आकर्षण होते. उ. अल्लारखासाहेबांचा तबला ऐकून तबल्याबद्दल त्यांना जास्त आकर्षण वाटू लागले. देशपांडेबुवा यांच्याकडे १९५३ च्या सुमारास त्यांच्या तबलावादनाचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर उस्ताद बाबालाल इस्लामपूरकरांकडे त्यांचे तबल्यातील शिक्षण सुरू झाले. उस्ताद अमीर हुसेन खाँसाहेब यांच्याकडे त्यांना सोळा वर्षे तालीम मिळाली.
या दीर्घ कालावधीत त्यांच्या गुरूंकडून त्यांना बनारसचा अपवाद वगळता इतर सर्व घराण्यांची शास्त्रशुद्ध तालीम मिळाली. खाँसाहेब शास्त्रावर प्रभुत्व असणार्या काही दुर्मीळ व्यक्तींपैकी एक होते. त्यामुळे अरविंद मुळगावकरांना विविध घराणी, त्यांचे योग्य निकास, तबल्यातील विविध संकल्पना, नादसौंदर्य, रचनासौंदर्य इ. अनेक गोष्टी खाँसाहेबांकडून मिळाल्या.
खाँसाहेबांनी आपल्या रचनांसोबत विविध घराण्यांच्या ज्येष्ठ रचनाकारांच्या हजारो रचना मुळगावकरांना दिल्या. त्याबरोबरच त्यांना उस्ताद अहमदजान थिरकवा, उस्ताद अता हुसेन खाँ यांसारख्या दिग्गजांची तालीम व पं. भोला श्रेष्ठ, पं. सामताप्रसाद यांच्याकडून बनारस घराण्यासंदर्भातही मार्गदर्शन मिळाले. तबल्याबाबत सर्वांगीण चिंतन व खडतर परिश्रम यांमुळे अरविंदजी मुळगावकर भारतातील एक अतिशय अधिकारी व्यक्ती म्हणून संगीत जगताला सुपरिचित आहेत.
पारंपरिक रचनांचा चिकित्सकपणे अभ्यास करून त्या योग्य निकासांसह सादर करणे, दायां-बायांचे वजन, बोलांची स्पष्टता ही त्यांच्या वादनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. विविध रचनांचे व्याकरण समजावून घेऊन केलेली सौंदर्यपूर्ण पढंत हे विशेष होय.
ते विद्यादानाचे कार्य गेली ४५ वर्षे अव्याहतपणे करीत आहेत. लेखक म्हणूनही मुळगावकरांनी भरीव कार्य केले आहे. त्यांच्या ‘तबला’ या ग्रंथाने संगीतविषयक साहित्यात मोलाची भर टाकली आहे. ‘आठवणींचा डोह’ हा त्यांनी लिहिलेला आणखी एक ग्रंथ. एका शिष्याच्या नजरेतून साकारलेला गुरूच्या जीवनाचा अतिशय परिणामकारक आलेख या ग्रंथामध्ये दिसून येतो. मुळगावकर रचनाकार म्हणूनही अतिशय श्रेष्ठ आहेत. त्यांच्या ‘गुस्ताखी मुआँफ’ व ‘इजाजत’ या दोन ग्रंथांमधून त्यांच्यातील प्रतिभावंत रचनाकाराचे दर्शन होते.
अमीर हुसेन खाँसाहेबांच्या जन्मशताब्दीला त्यांनी आपल्या २५ शिष्यांकडून खाँसाहेबांच्या १०५ बंदिशी बसवून घेतल्या व असे २५ जणांच्या सहवादनाचे कार्यक्रम कोल्हापूर, मुंबई व कर्हाड येथे सादर केले.
तबल्याच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी ‘बंदिश’ नावाची संस्था स्थापन केली असून दरवर्षी त्या संस्थेतर्फे मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम, तसेच राज्यपातळीवरील तबलावादनाच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील तबलाप्रेमींना तबल्याचे शास्त्र समजवण्यामध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सादर केलेल्या सप्रयोग व्याख्यानांचा खूप मोठा वाटा आहे. संवाद फाउण्डेशनतर्फे होणार्या दृक् - श्राव्य ध्वनिमुद्रणांसाठी तज्ज्ञ वक्ता म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. संपूर्ण भारत, तसेच अमेरिका, स्वित्झर्लंड, मॉरिशस येथेही त्यांचे स्वतंत्र वादन व सप्रयोग व्याख्याने झाली आहेत.
त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘वाद्यसंगीत’ पुरस्कार, भारत सरकारची सीनियर फेलोशिप, ‘स्वरसाधना रत्न’, आय.टी.सी. तसेच अय्यर प्रतिष्ठानातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार, ‘वसुंधरा पंडित स्मृती’ पुरस्कार इ. अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. ओंकार गुलवाडी, विवेक जोशी, कृष्णा घोटकर, सूर्याक्ष देशपांडे, सतीश तारे, आमोद दंडगे, बाळकृष्ण अय्यर, प्रसाद पाध्ये, इ. त्यांच्या शिष्यवर्गापैकी काही महत्त्वाची नावे होत.