Skip to main content
x

मुर्डेश्वर, देवेंद्र

देवेंद्र मुर्डेश्वर यांचा जन्म कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील मासूर या गावात झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई ही कर्मभूमी म्हणून निवडली आणि १९४३ मध्ये उपजीविकेसाठी ते मुंबईत स्थायिक झाले.

लहानपणापासून मुर्डेश्वर यांना संगीतात रुची होती. प्रथम त्यांनी श्रेष्ठ तबलावादक उ. अमीर हुसेन खाँ यांच्याकडे तबलावादनाचे धडे घ्यावयास सुरुवात केली. त्यांनी १९४५ पर्यंत तबल्यावर रियाझ करून त्यावर प्रभुत्व मिळविले. उ. अमीर हुसेन खाँ पं. पन्नालाल घोषांच्या साथीसाठी जात असत. पं. पन्नालाल घोषांचे आकाशवाणीवरील धीरगंभीर वादन ऐकून मुर्डेश्वर यांना बासरी शिकण्याची अनिवार ओढ लागली. त्यांनी गुरू अमीर हुसेन खाँ यांना आपली ही इच्छा पन्नाबाबूंकडे व्यक्त करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे १९४५ सालापासून पं. घोषांकडे बासरीचे अध्ययन सुरू झाले.

गुरुकुल पद्धतीच्या या शिक्षणातून पं. पन्नालाल घोषांच्या बासरीवादन तंत्राचे आणि रागाविष्काराचे सर्व बारकावे आणि खासियती त्यांनी आत्मसात केल्या आणि बासरी तयार करण्यापासून ते घोषशैलीमध्ये वाजविण्यापर्यंतचे पूर्ण प्राविण्य मिळविले. पुढे मुंबई आणि दिल्ली आकाशवाणीवर निर्माता म्हणून ते शेवटपर्यंत कार्यरत होते. ते आकाशवाणीचे ‘अ’ दर्जा प्राप्त कलाकार होते. गुरू पं. पन्नालाल घोष यांना संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमांत मुर्डेश्वर नेहमी बासरीची साथ करीत. त्यांचे स्वत:चेसुद्धा संगीताचे अनेक अखिल भारतीय कार्यक्रम झाले, तसेच विदेशांत अमेरिका, कॅनडा, युरोपमध्ये त्यांच्या अनेक मैफली गाजल्या.

एच.एम.व्ही. कंपनीने मुर्डेश्वरांच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केल्या. त्यांच्या केदार, झिंजोटी, पूरिया कल्याण, पिलू रागातील गती विशेष गाजल्या. आलापप्रधान, सौंदर्यपूर्ण स्वरलतांची गुंफण, गमकयुक्त दमसांसाचे वेणुवादन, लयबद्ध तंतकारी असे त्यांच्या वादनशैलीचे वर्णन करता येईल.

पं.पन्नालाल घोष यांचे मुर्डेश्वर पट्टशिष्य व जावई होेते. पन्नाबाबूंची कन्या शांतिसुधा ही त्यांची पत्नी होय. त्यांचा मुलगा आनंद हासुद्धा उत्तम बासरीवादक होता. अवघे ४० वर्षे आयुष्य लाभलेल्या आनंदनेही बासरीचे देशविदेशांत अनेक कार्यक्रम केले.

पन्नाबाबूंच्या निधनानंतर मुर्डेश्वरांना मैहर घराण्याचे उ. अल्लाउद्दीन खाँ यांचे मार्गदर्शन लाभले. शास्त्रीय संगीतातील अनेक पारंपरिक चिजा त्यांना मुखोद्गत होत्या. त्यामुळे त्यांचे बासरीवादन घरंदाज आणि समृद्ध होते. त्यांना संगीत नाटक अकादमी, दिल्लीचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार मिळाला होता. संगीतातील प्राविण्याबरोबर चित्रकलेतसुद्धा त्यांना उत्तम गती होती.

बासरीचा प्रसार आणि प्रबोधन यांसाठी त्यांनी पं. पन्नालाल घोष बासरी विद्यापीठ स्थापून गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले. रागविस्तार, स्वरलिपी, ध्वनिमुद्रित वादनाद्वारे शिक्षणापेक्षा विद्यार्थ्याने गुरूच्या वादनाचा मागोवा घेत स्वत:च्या प्रतिभेने मांडणी करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांच्या अनेक शिष्यांपैकी केशव गिंडे, नित्यानंद हळदीपूर, आनंद मुर्डेश्वर, लायन लाइफर (अमेरिका) हे प्रमुख आहेत.

केशव गिंडे

मुर्डेश्वर, देवेंद्र