Skip to main content
x

मूर्ते, नीळकंठ लक्ष्मण

नीळकंठ लक्ष्मण मूर्ते यांचा जन्म भंडाऱ्यानजीक अंभोरा येथे गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव काशीबाई होते. वयाच्या दहाव्या वर्षीच आई व वडिलांचे पाठोपाठ निधन झाले. दरम्यान मोठे बंधू चिंतामण यांना नागपूरच्या जमनादास पोद्दारेश्वर राममंदिरात जेवणा-खाण्यासह पुजार्‍याची नोकरी लागली.

नीळकंठ मूर्ते यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण फडणीस प्राथमिक शाळेत झाले. राममंदिरात रोज नागोराव बोबडे गायन करीत. त्यांनी मूर्ते यांना प्रसिद्ध तबलावादक बळीराम पंडे यांच्या स्वाधीन केले. गुणग्राहक, सालस व मेहनती मूर्त्यांनी लवकरच चमक दाखवली. शिक्षण चालू असताना पोद्दारांनी त्यांना उदारपणे आश्रय दिला. त्यांनी १९२७ ते १९३२ या काळात तबला शिक्षण, शिवणकाम व राममंदिरात सेवा बजावली. नंतर अंधविद्यालयात तबलावादकाची अर्धवेळ नोकरी करून अंधांना तबलावादनाचे धडे  दिले आणि बरेच विद्यार्थी तयार केले. त्यांचा १९३२ मध्येच विवाह काटी गावचे तुकारामजी हेजीब यांच्या कन्या इंदिराबाईंशी झाला.

नीळकंठ मूर्ते यांनी डॉ.सुमती मुटाटकरांना तबलासंगत केली. सावळाराम मास्तरांबरोबर ते बाहेरगावी तबला साथीला जात असत. मुंबईला एच.एम.व्ही.ने १९३५ मध्ये सावळाराम मास्तरांच्या बासरीवादनाच्या ध्वनिमुद्रिका केल्या, त्या वेळी तबला-संगत मूर्त्यांचीच होती. मास्टर मनोहर बर्वे यांच्याबरोबरही त्यांनी तबलासंगत केली. त्यांनी १९४३ ते  १९४६ व १९४० ते १९५० पर्यंत क्रमशः हिस्लॉप महाविद्यालयामध्ये व भिडे कन्याशाळेत तबलावादकाचे काम केले. त्यांना १९५० मध्ये एल.ए.डी. महाविद्यालयात तबला-अध्यापकाची नोकरी मिळाली.

वादनाचार्य बळीराम पंडे यांनी स्थापन केलेली संस्था ‘बलवंत वादन कला भुवन’ बंद पडण्याची स्थिती उत्पन्न होताच नीळकंठ मूर्ते यांनी १९५३ मध्ये त्याचे नामांतर ‘बलवंत वादनालय’ करून आपल्या घरीच आपल्या गुरूची संस्था चालू ठेवली. गीतामंदिर व मारुतीमंदिर यांच्यामध्ये तालमंदिर उभारून मूर्त्यांनी विद्यादानाचे कार्य केले.

गुरूकडून संपादन केलेल्या पानसे घराण्याच्या शुद्ध, घरंदाज वादनशैलीचे शिक्षण मूर्ते यांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेमाने, निरलसपणे देऊन विशाल शिष्यवर्ग निर्माण केला. त्यात बॅरिस्टर दामोदर वाडेगावकर (मुंबई), गोविंद देशमुख (खैरागड), रामदास शेंडे (उज्जैन), मुरलीधर दीक्षित, नामदेव बुराडे, चंद्रशेखर आष्टीकर, मुकुंद कुलकर्णी, दिलीप मूर्ते व इतर अनेकांचा समावेश होतो. त्यांनी विख्यात कलाकारांची तबला संगत करून अनेक बैठकी गाजविल्या. गुरुकृपा संगीत मंडळातर्फे २५ जुलै १९७१ रोजी बाबूराव दंडे यांच्या अध्यक्षतेखाली नीळकंठ मूर्ते यांचा एकसष्टीनिमित्त हृद्य सत्कार केला गेला.

             — वि.ग. जोशी

मूर्ते, नीळकंठ लक्ष्मण