Skip to main content
x

नागेशकर, पंढरीनाथ गंगाधर

प्रसिद्ध तबलावादक आणि गुरू पंढरीनाथ गंगाधर नागेशकर यांचा जन्म गोव्यात नागेशी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव आवडूबाई होते. वयाच्या आठव्या वर्षीच ते चौघडा व ताशा वाजविण्यास शिकले. तबल्याचे प्राथमिक धडे त्यांनी आपल्या मामांकडे घेतले. मामांचा व मास्टर दीनानाथांचा चांगला घरोबा होता.
मा. दीनानाथ मंगेशकरांची बलवंत संगीत मंडळी पणजीत आली असताना त्यांनी पंढरीनाथांना तबला वाजवताना ऐकले व ते म्हणाले, ‘‘तबला हे शास्त्र अति गहन आहे. नागेशीस राहून त्याचा थांगपत्ता लागणार नाही. माझ्या कंपनीत ये, मी तुला तयार करीन.’’ दीनानाथांच्या याच शब्दांनी पंढरीनाथ नागेशकरांची पुढील कारकीर्द घडवली. दीनानाथ मंगेशकरांचे हे बोल व तबलावादन शिकण्याची पंढरीनाथांची तळमळ यांचा परिणाम घर सोडण्यात झाला. पंढरपुरात बलवंत संगीत मंडळी आली असताना ते घरातून पळून बलवंत संगीत मंडळीत आले. या संगीत मंडळीचे तबलावादक विठ्ठल नाईक ऊर्फ वल्हेमामा यांच्याकडे त्यांचे तबला शिक्षण सुरू झाले. हळूहळू ते तबलावादनात तयार व्हायला लागले. दीनानाथांच्या खाजगी बैठकीलाही त्यांनी साथ केली. दोन वर्षे बलवंत कंपनीत राहून ते परत नागेशीला परतले.
त्यानंतर ते नाटकात व कीर्तनात तबला वाजवीत. त्यांनी काही महिने कोल्हापूरला किर्लोस्कर नाटक कंपनीत काढले, नंतर कोल्हापूर सोडून ते मुंबईत आले. अर्थार्जन करण्यासाठी त्यांनी दिग्वीर सिनेमाच्या कंपनीतही काम केले, मेनका पिक्चर्समध्ये नोकरी केली. मुंबई हीच आपली कर्मभूमी आहे याची त्यांना जाणीव झाली. कला शिकण्याची व वाढविण्याची संधी मुंबईतच आहे असे मनोमन पटल्यामुळे मुंबईलाच स्थायिक होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. साथसंगत करणे, शिकवण्या करणे यांतून ते आपला उदरनिर्वाह करीत.
त्यानंतर उस्ताद मुनीर खाँचे शिष्य सुब्रामामा अंकोलेकर यांचे ते गंडाबंध शिष्य झाले. सुब्रामामांच्या मृत्यूनंतर त्यांनी खाप्रूमामा पर्वतकर यांचा गंडा बांधला. तसेच अन्वर हुसेन खाँ आणि पंजाबचे जतीनबक्ष खाँ यांच्याकडून काही कायदे त्यांनी आत्मसात केले. पुढे योगायोगाने हैद्राबादचे ज्ञानी व विद्वान तबलावादक अमीर हुसेन खाँसाहेब यांची ओळख झाली. तब्बल बारा वर्षे अमीर हुसेन खाँसाहेबांकडे त्यांनी नित्यनियमाने शिक्षण घेतले इतकेच नव्हे, तर अमीर हुसेन खाँना मुंबईला बोलावून त्यांची राहण्याची व्यवस्था केली. मुंबईच्या संगीतविश्वात अमीर हुसेेन खाँसाहेबांची ख्याती पसरविण्याचे श्रेय नि:संशय पंढरीनाथ नागेशकरांना जाते.
अजराडा, दिल्ली, पूरब, फरुखाबाद या चारही घराण्यांतील वादनशैलीचा पंढरीनाथ नागेशकरांनी अभ्यास केला असल्यामुळे, या वादनशैलीतील नेमकी सौंदर्यस्थळे टिपून त्यांनी आपली तबलावादनशैली समृद्ध केेली. अनेक कायदे, रेले, बोल यांच्या त्यांनी रचना केल्या. त्यांनी एका  विशिष्ट बाजालाच स्वत:ला कधी बांधून ठेवले नाही. पंचमसवारीसारख्या अवघड तालातही त्यांनी विपुल रचना केल्या आहेत. नागेशकरांच्या उजव्या हाताचे मधले बोट जन्मापासून उंचीलाच कमी होते, त्यामुळे तबलावादनात या बोटाची ताकद कमी पडत असे; पण यावरही त्यांनी मात केली.
पंढरीनाथ नागेशकरांनी अनेक नामवंत गायकांना तबल्यावर साथ केली; पण नंतर विद्यादान हेच ध्येय ठेवले. अनेकांना मुक्तहस्ते व सौंदर्यदृष्टी ठेवून विद्या देऊन अनेक दर्जेदार तबलावादक निर्माण केले. त्यांचे काही शिष्य असे : वसंतराव आचरेकर, मुकुंद काणे, राजेंद्र अन्तरकर, नाना मुळे, संदीप संझगिरी, सुरेश तळवलकर आणि सुपुत्र विभव नागेशकर.
पंढरीनाथ नागेशकरांना संगीत रिसर्च अकादमीचा पुरस्कार (१९९९),  गोमंतक मराठी अकॅडमीतर्फे ‘मंगेशकर’ पुरस्कार (२०००), मुंबईत वसंतराव नाईक प्रतिष्ठानातर्फे राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते सन्मान असे काही सन्मान्य पुरस्कार मिळाले. जवळजवळ ५३ वर्षे अखंडित विद्यादान करून वयाच्या पंचाण्णवाव्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले.

माधव इमारते

नागेशकर, पंढरीनाथ गंगाधर