Skip to main content
x

नाईक, चित्रा जयंत

       चित्रा जयंत नाईक यांचे बालपण सुखी मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. चित्राताईंचे माहेरचे आडनाव योगायोगाने नाईकच. त्यांचे वडील मुंबईमध्ये नामांकित डॉक्टर होते. लाडात वाढलेल्या चित्रा नाईक  लहानपणी शाळेत जायला नाखूष असत, पण त्यांच्या आईने त्यांचा शिक्षणाचा आरंभ स्वत: करून दिला. त्यांनी ओळखले की, मुलीला नेमलेला अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके यात रूची नाही. पण अन्य वाचनाची आवड खूप आहे. म्हणून त्यांनी मुलीच्या  वाचनाची भूक भागेल यासाठी भरपूर व्यवस्था केली. त्यातून चित्रा नाईक यांचे मानसिक जग खूप विस्तारले. थोडेसे लेखन होऊ लागले. वक्तृत्व सभांमध्ये भाग घेणे घडू लागले.

१९४० च्या सुमारास त्यांच्यासारखा विद्यार्थी वर्ग देशाच्या स्वातंत्र्यासाठी चिंता करण्यात गढला होता. चित्रा नाईकही सत्याग्रह, मार्क्सवाद, समाजवाद अशा विषयाच्या चर्चेत दंग होत.पत्रकारितेचे सुद्धा त्यांना आकर्षण होते.  इंग्रजी ऑनर्स घेऊन त्या बी. ए. झाल्या आणि बी. टी. च्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह पहिला वर्ग मिळविला. मुंबईच्या सरकारी शिक्षणशास्त्र विद्यालयात त्यांना साहाय्यक व्याख्यात्याची जागा मिळाली. नंतर पीएच. डी. साठी संशोधन सुरू केले. तेथील मार्गदर्शक प्रा. रामभाऊ परूळेकर व त्यांचे स्नेही जे.पी. नाईक यांनी

चित्राताईंना भरपूर वैचारिक खाद्य पुरविले. डॉक्टरेट केल्यावर त्यांना सरकारमध्ये शिक्षण अधिकार्‍याचे पद मिळाले. त्यावेळी त्या अ‍ॅडव्हेंचर ऑफ एज्युकेशनहे त्रैमासिक संपादित करीत असत. १९५० मध्ये त्यांना ब्रिटनमधील मनोदुर्बल मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था अभ्यासण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची शिष्यवृत्ती मिळाली व त्या इंग्लंडला गेल्या. तेथून परत आल्यावर त्यांची मुंबई सरकारच्या शिक्षण सेवेत सहाय्यक शैक्षणिक तपासणी अधिकारीया जागेवर नेमणूक झाली. ते काम करीत असतानाच १९५३ मध्ये त्यांना फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली आणि त्या न्यूयॉर्कला कोलंबिया विद्यापीठात दाखल झाल्या. तत्पूर्वी त्यांचा  नाईकांच्या मौनी विद्यापीठाशी संबंध आला होता.त्यामुळे त्यांनी अभ्यासासाठी ग्रामीण शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापनहा विषय निवडला.

शिष्यवृत्तीचा एक वर्षाचा काळ संपल्यावर सातारा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे जाण्यापूर्वी कोल्हापूरला जे.पी.नाईक व त्यांचे सहकारी यांच्याशी त्यांची चार दिवस चर्चा झाली.

तेव्हा त्यांनी गारगोटीच्या ग्रामीण विद्यापीठाची संपूर्ण माहिती घेतली. नंतरही सुटीच्या दिवसात त्या अनेकदा कोल्हापूरला जात. त्यावेळी नाईकांच्या मित्रमंडळींनी त्या दोघांना विवाह करण्याचा आग्रह केला आणि त्याप्रमाणे १९५५ मध्ये त्यांनी विवाह बंधन स्वीकारले. नंतर त्यांना कोल्हापूरच्या महाराणी ताराबाई महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नेमणूकही मिळाली आणि कोरगावकरांच्या वाड्यात चार खोल्यांमध्ये त्यांचा संसार सुरू झाला. तोपर्यंत मौनी विद्यापीठाला अखिल भारतीय मान्यता मिळाली होती. मात्र प्रा. परुळेकर निवृत्त झाल्याने कोरगावकर संशोधन संस्थेच्या संचालकांची जागा रिकामी झाली होती. तिथे चित्रा नाईक यांना प्रतिनियुक्तीवर घेण्याचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आणि १९५७ मध्ये ३ वर्षांच्या करारावर त्या गारगोटीला गेल्या. मात्र १९५९ मध्ये नाईकांना शिक्षण मंत्रालयाने दिल्लीला प्राथमिक शिक्षण सल्लागार म्हणून निमंत्रित केले व तेथून पुढे त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्य वाढतच गेले.

 जून १९६१ मध्ये चित्रा नाईक कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राचार्यपदी परत गेल्या. १९६२-६३ च्या दरम्यान त्यांना भारत सरकारच्या मूलोद्योग शिक्षण संस्थेत संचालक पदावर प्रतिनियुक्तीवर नेमणूक मिळाली. परंतु १९६४ मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने परत बोलविले. १९६९-७० मध्ये त्या पुन्हा प्रतिनियुक्तीवर दिल्लीला गेल्या. पण नंतरच्याच वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड होऊन त्या पुण्यात परत आल्या.

१९७८ ते ८० ताईंना प्रौढ शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यासाठी व्हिएतनाम, बँकॉक, रशिया वगैरे देशातून प्रवास करावा लागला.

जे. पी. नाईकांचे कर्करोगाने ३० ऑगस्ट १९८१ रोजी निधन झाले. त्यानंतर सर्वांसाठी शिक्षण मुक्त व्हावे म्हणून इन्स्टिट्यूटमध्ये अनौपचारिक शिक्षण संशोधन केंद्र १९७८ मध्ये सुरू करण्यात आले व त्याला त्यांनी वाहून घेतले.

या केंद्राच्या मानद संचालिका म्हणून काम करीत असताना त्यांनी नव-साक्षरांसाठी पसायमासिक काढले, ४५ कथा पुस्तिका लिहिल्या, देशोदेशीचे प्रौढ शिक्षणतज्ज्ञ निमंत्रित करून नव्या अभ्यासक्रमाचे आराखडे तयार केले. इतर देशातील प्रौढ शिक्षणाची पाहणी करण्यासाठी अनेक देशांना भेटी दिल्या.

भारत सरकार व अन्य संस्थांनी त्यांना प्रौढ शिक्षण आंदोलनासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केले. याच सुमारास इंडियन इन्स्टिट्यूटला भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेने मान्यता दिली. जे.पी  नाईकांच्या पश्चात इन्स्टिट्यूटची देखभाल चित्रा नाईक यांनीच केली व तिचा सर्व बाजूंनी विस्तार केला. ती संस्था पुण्यात कोथरुडमध्ये आहे.

शाळा सोडलेल्या मुलामुलींसाठी अनौपचारिक शिक्षणाचा कृती संशोधन प्रकल्प चित्रा नाईक यांनीच १९७९ मध्ये सुरू केला. त्यात सुमारे ८००० विद्यार्थ्यांसाठी २२८ खेड्यापाड्यात वर्ग उघडले व प्राथमिक शिक्षण प्रसाराला नवी दिशा दिली. १९८२ मध्ये चित्रा नाईक यांना  अफगाणिस्थानातील स्त्रियांचे प्रौढ शिक्षण व प्राथमिक शिक्षण यासाठी सल्लागार म्हणून निमंत्रण आले.  १९८४ मध्ये तुलनात्मक शिक्षणया विषयावर पॅरिस येथील जागतिक परिषदेत आणि फ्रँकफर्ट विद्यापीठात त्यांची व्याख्याने झाली. शैक्षणिक योजनेवर निबंध वाचण्यासाठी १९८८ मध्ये त्यांना रशियाला जावे लागले. त्याच वर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियोजन मंडळाचे सदस्यत्व मिळाले तर १९९१ मध्ये भारताच्या योजना आयोगाचे.  तीन राजकीय पक्षांच्या प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ते कार्य सांभाळून १९९८ मध्ये त्या पुण्यास परतल्या. तत्पूर्वी १९९४ मध्ये ग्रामीण स्त्रियांचे शिक्षण व सबलीकरण होण्याच्या उद्देशाने त्यांनी शिवापूर येथे ग्रामीण महिला विकासिनीया केंद्राची स्थापना केली होती. त्या कामाकडे नंतर त्यांनी अधिक लक्ष पुरविले. संस्थेचे शिक्षण आणि समाजहे त्रैमासिक त्या १९७८ पासून संपादित करीत आहेत. जागतिकीकरणाच्या वास्तवाला भारतीय शिक्षण क्षेत्र कोणत्या प्रकारे सामोरे जाऊ शकेल याचे संशोधन त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले.

त्यांच्या अलौकिक कार्याला देखील सार्वत्रिक मान्यता मिळाली. त्यांना युनेस्कोने आंतरराष्ट्रीय जॅन कमेनियस पारितोषिक १९९३ मध्ये प्रदान केले. त्याशिवाय त्यांना जमनालाल बजाज पुरस्कार, टागोर पुरस्कार, प्रणवानंद पुरस्कार आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदागौरव पुरस्कार प्राप्त  झाला आहे. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला आहे.

- सविता भावे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].