Skip to main content
x

नारायणगावकर, आत्माराम पांडुरंग

त्माराम पांडुरंग नारायणगावकरांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड या गावी झाला. त्यांच्या मूळ गावी नारायणगाव येथे त्यांचे बालपण गेले. समर्थ रामदासांचे शिष्य बाळकराम महाराज यांच्या परंपरेतील बापू महाराज वैद्य हे त्यांचे वडील आणि चंद्रिकाबाई या त्यांच्या आई होत्या. रामसंकीर्तनाचे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले. पण संगीत शिकणे व संगीत हाच व्यवसाय करणे यासाठी घरातून वडिलांचा विरोध असल्याने कुमारवयातच घर सोडून ते औंध संस्थानाचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या पाठिंब्याने १९३३ मध्ये सातारा जिल्ह्यातील संस्थान औंध येथे वास्तव्यास आले.

दरबार गवई पं. अनंत मनोहर जोशी ऊर्फ अंतूबुवा यांच्याकडे सात वर्षे त्यांनी शास्त्रशुद्ध तालीम घेतली. शालेय शिक्षण आणि कीर्तनाचे शिक्षण त्यांनी औंध येथेच पूर्ण केले. महाराजांकडून त्यांना ‘संगीत रत्न’ आणि ‘कीर्तन विशारद’ या पदव्या प्राप्त झाल्या. पुढे त्यांनी समाज प्रबोधनाच्या उद्देशाने अनेक वर्षे कीर्तने केली आणि त्यांना ‘राष्ट्रीय कीर्तनकार’ हा बहुमान मिळाला.

पुण्यात १९४० पासून पं. बापूराव केतकर आणि मास्तर कृष्णराव यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले.  मुंबई आकाशवाणीवर १९४२ साली त्यांचा पहिला गायन कार्यक्रम झाला आणि १९४३ मध्ये त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही.तर्फे प्रकाशित झाल्यावर १९६५ पर्यंत मैफलींचे लोकप्रिय कलाकार म्हणून त्यांचे नाव झाले. त्याच काळात ‘नंदादीप’, ‘मदिरा’, ‘अर्ध्या वाटेवर’, ‘नवे जग’ अशा काही संगीत नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिकाही गाजल्या. त्या नाटकांना संगीतही त्यांचेच असल्याने एच.एम.व्ही. या नावाजलेल्या ग्रामोफोन कंपनीत संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांंना बोलावण्यात आले. त्यांनी तिथे १९४४ ते १९५५ अशी ११ वर्षे संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. आत्माराम नारायणगावकरांनी संगीत दिलेल्या गीतांच्या ध्वनिमुद्रिका राम मराठे, जयमाला शिलेदार, सुरेश हळदणकर, शाहीर साबळे अशा अनेक गायक कलाकारांच्या आवाजात निघाल्या.

त्यांनी १९५२ सालापासून चेंबूर येथे ‘श्रीराम संगीत विद्यालय’ या संस्थेची स्थापना करून अनेक शिष्यांना संगीताची तालीम दिली. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने १९९५ साली त्यांना ‘कलादान पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

संगीत समीक्षक म्हणून त्यांनी ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘नवशक्ती’, ‘नवाकाळ’ अशा वृत्तपत्रांतून लेखन केले. संगीत क्षेत्रातील गायक, वादक कलाकारांवर त्यांनी लिहिलेल्या लेखांची ‘स्वरयोगी’ आणि ‘स्वरयोगिनी’ ही पुस्तके प्रकाशित झाली. वयाच्या चौर्‍याऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले.

मधुवंती पेठे

नारायणगावकर, आत्माराम पांडुरंग