Skip to main content
x

नंदनपवार, उषा लक्ष्मण

        उषा लक्ष्मण नंदनपवार यांचा जन्म नागपूरला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायण मंगळमूर्ती व आईचे इंदिराबाई होते. वडील व दोन्ही काका वकील होते. धाकटे काका केशव ऊर्फ अण्णासाहेब मंगळमूर्ती न्यायाधीश व नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांना संगीताची आवड व जाणही होती, तर काकू मालतीबाई गात असत. या काका-काकूंनी उषाला संगीताकडे वळविले आणि तिच्यासाठी छोटा तंबोरा विकत घेतला.

त्यांचे शिक्षण भिडे कन्याशाळेत आणि संगीत शिक्षण भातखंडे म्युझिक कॉलेजमध्ये संपन्न झाले. संगीत हा विषय घेऊन त्या १९४४ साली मॅट्रिक, १९४८ मध्ये बी.ए. व १९५३ मध्ये बी.टी. झाल्या. त्यांनी १९५०-१९५४ या काळात साहाय्यक जिल्हा शाळा निरीक्षिका म्हणून सरकारी शिक्षण खात्यात नोकरी केली.

त्यांचा विवाह १९५४ मध्ये लक्ष्मण श्रीनिवास नंदनपवार यांच्याशी झाला. तरीदेखील उषा मंगळमूर्ती या नावानेच त्या अधिक सुपरिचित आहेत. पती एम.एस्सी., एलएल.बी व लखनौ संगीत विद्यापीठाचे पदवीधर, तसेच संगीताचे कसलेले जाणकार होते. उषा नंदनपवारांनी या प्रोत्साहनाने व मेहनतीने १९५८ मध्ये कंठसंगीतात गांधर्व महाविद्यालय मंडळाची ‘डॉक्टर ऑफ म्युझिक’ ही पदवी पहिल्या वर्गात, पहिल्या क्रमांकाने प्राप्त केली. त्यांनी बैठकी गाजविल्या. मध्यप्रदेशातल्या प्रथम दर्जाच्या संगीतज्ञांत उषा नंदनपवारांची गणना होते. सहृदयता, व्यवहारदक्षता व निगर्वी स्वभावामुळे त्या लोकप्रिय कलाकार झाल्या. स्वातंत्र्यदिनाचा पहिला वर्धापन महोत्सव ऑगस्ट १९४८ मध्ये दिल्लीला आयोजित केला गेला. त्यात विदर्भातून पहिल्या महिला गायिकेचा मान उषा नंदनपवार यांना  लाभला होता.

त्यांचे १९४८ ते १९५० च्या दरम्यान आकाशवाणीच्या इंदूर, हैदराबाद, औरंगाबाद, बडोदा व दिल्ली केंद्रांवरून कार्यक्रम झाले. नागपूर विद्यापीठाच्या व गांधर्व महामंडळाच्या त्या परीक्षिका होत्या.  त्यांची  ख्याल, ठुमरी गायनशैली प्रभावी होती. आवाज सुरेल, फिरतीचा, सहजसाध्य होता. उत्तम लयकारी, आलापी व तानप्रकार तयारीच्या असून ग्वाल्हेर व किराना घराण्याच्या मिश्रित गायकीची त्यांची विशेषता होती. 

वि.. जोशी

नंदनपवार, उषा लक्ष्मण