पाध्ये, दिगंबर विठ्ठल
विठ्ठल व लक्ष्मीबाई यांच्या पोटी दिगंबर पाध्ये यांचा जन्म पाथर्डी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे झाला. शालेय शिक्षण मुंबईला राम मोहन इंग्लिश शाळेतून पूर्ण केले व महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल महाविद्यालय माटुंगा येथे झाले. मराठी व संस्कृत विषयांत बी.ए.ला प्रथम वर्गात तर एम.ए.ला मराठी विषयात प्रथम वर्ग प्राप्त झाला. दादोबा पांडुरंग. के.पी. जोग व न.चि. केळकर सुवर्णपदकाचे ते मानकरी होते. १९७१पासून १९९९ पर्यंत साठ्ये महाविद्यालय विलेपार्ले, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते तर १९९० ते १९९९ ह्या काळात ते मराठीचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.
ललित लेखनापेक्षा समीक्षेच्या प्रांगणात रमणारे प्रा.पाध्ये यांचे लेखन गाजले ते त्यांच्या स्वतंत्र व चिकित्सा दृष्टीमुळे. विशेषतः साहित्य, समाज आणि संस्कृती यांचे विशिष्ट दृष्टीकोनातून केलेले लेखन हे वैशिष्ट्यपूर्ण ठरणारे आहे. साहित्याचा कला म्हणून येणारा अनुभव मोठा तर आहेच परंतु साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक स्वरूपही तेवढेच मोठे आहे, अशी तात्त्विक मांडणी त्यांच्या ‘साहित्य समाज संस्कृती’ या ग्रंथातून झाली आहे. ‘नारायण सुर्वे यांची कविता’ या समीक्षात्मक ग्रंथातून सुर्व्यांच्या कवितांची सुसंगत, तार्किक व काटेकोर मांडणी केली आहे.
समीक्षात्मक दृष्टिकोनाविषयीच्या, दृढमूल विचारांच्या प्रभावाचे श्रेय ते ज्येष्ठ साहित्यिक वसंत दावतर यांच्याशी आलेल्या वैचारिक घनिष्ठ संबंधांना देतात. १९६७पासून ‘आलोचना’ या मासिकाच्या सहकारी संपादकाची भूमिका बजावली. महाराष्ट्र साहित्य पत्रिका, समाज प्रबोधन पत्रिका, युगवाणी इत्यादी पत्रिकांतून लेखन केलेल्या पाध्येंना पुरस्कारापासून दूर राहायला आवडते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या समीक्षेचा इतिहास (१९५०-१९५५) या कालखंडाचे लिखाणाचे काम चालू आहे. तसेच ‘आधुनिक मराठी साहित्याचे समाजशास्त्र’ या ग्रंथावरील लिखाण तयार आहे.
२०१६ साली त्यांचे निधन झाले.