Skip to main content
x

पै, शिरीष व्यंकटेश

     पुणे येथे जन्मलेल्या शिरीष पै यांना बी.ए., एल्.एल.बी. असे शिक्षण घेतले. आचार्य अत्रे यांची ज्येष्ठ कन्या असणार्‍या या लेखिकेने वयाच्या ९ व्या वर्षापासून कथालेखनाला प्रारंभ केला. चित्रपट, प्रवासवर्णन, अनुवाद, नाट्यलेखन, कथा, कविता अशा सर्व साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले आहे. ‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार मराठीत आणल्याबद्दल शिरीष पै यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अतिशय तरल भाव प्रकट करणारा आणि रचायला काहीसा अवघड असा तीन ओळींचा हा काव्यप्रकार शिरीष पै यांनी ‘हायकू’, ‘ध्रुवा’, ‘हायकूंचे दिवस’, ‘माझे हायकू’, ‘मनातले हायकू’, ‘पुन्हा हायकू’ या पुस्तकांद्वारे मराठीत आणला.

     त्यांची साहित्यसेवा गेली ५० वर्षं सुरू असून २००८ सालीही त्यांची ‘पुन्हा हायकू’, ‘जुनं ते सोनं’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली. ‘हायकू’ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. ‘कविता एका पावसाची’ व ‘ऋतुचित्रे’ (१९९१) या दोन पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले. ‘वडिलांचे सेवेसी’ व ‘मी माझे मला’ या दोन पुस्तकांनाही राज्य पुरस्कार मिळाले. ‘अखेरचे पान’ (अमेरिकन कथांचा अनुवाद), ‘माझे नाव आराम’ या अनुवादित कथा पुस्तकांसह ओशो यांची ८ पुस्तके त्यांनी मराठीत अनुवादित केली.

     ‘कळी एकदा खुलली होती’ (१९७४), ‘हा खेळ सावल्यांचा’ (१९६८), ‘झपाटलेली’ (१९७५) या तीन नाटकांद्वारे त्यांनी नाट्यलेखनातही आघाडी घेतली. ‘अज्ञात रेषा’ (रुबाया), ‘हापूसचे आंबे’, ‘दुःखाचे रंग’, ‘कांचन गंगा’ (१९९६), ‘हृदयरंग’, ‘प्रेमरोग’ , ‘कमलपत्र’ (१९८८), ‘रानपाखरे’ (१९९८), ‘भवसागर’ असे कथासंग्रह; ‘मुके सोबती’, ‘रानातले दिवस’, ‘हाती शिल्लक’, ‘सय’, ‘आतला आवाज’, ‘आजचा दिवस’, ‘मैलोन्मैल कुणीच नाही’, ‘अनुभवांती’, ‘आकाशगंगा’ इत्यादी ललित लेखसंग्रह; ‘बागेतील जमती’, ‘आईची गाणी’ असे बालवाङ्मय अशी विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.

     महाराष्ट्र टाइम्स (सय), नवशक्ती (खायच्या गोष्टी), चित्रलेखा (मर्मबंध) मधून त्यांनी सदरलेखनही केले.  १३ जून १९६९ ते १५ नव्हेंबर १९७६पर्यंत त्यांनी दैनिक, संपादकपद भूषविले होते व पुढे त्या मराठाच्या संपादकही झाल्या. १९५३ पासून ‘नवयुग’च्या संपादन विभागात काम करणार्‍या शिरीष पै यांनी १९६२ला ‘नवयुग’ बंद झाल्यावर दैनिक ‘मराठा’च्या रविवार पुरवणीचे काम पाहायला सुरुवात केली. नारायण सुर्वे, बाबूराव बागूल यांसारख्या सामाजिक जाणिवेतून लेखन करणार्‍यांना त्यांनी उत्तेजन देऊन पुढे आणले, हे विशेष!

     - सुहास बारटक्के

पै, शिरीष व्यंकटेश