Skip to main content
x

पैठणकर,मधुकर नारायण

           धुकर नारायण पैठणकर यांचा जन्म खांडवा जिल्ह्यातील बुऱ्हाणपूर येथे एका सनातन महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव अहिल्या आणि वडिलांचे नाव नारायण जगदीश पैठणकर होते. तापी नदी काठावर त्यांची दीडशे एकर शेतजमीन, आंब्याच्या मोठ्या बागा आणि गाई-बैल होते. त्या वेळी गावच्या एकमेव रॉबर्टसन हायस्कूलमध्ये पैठणकर यांचे शिक्षण झाले. त्यांनी एस.एस.सी. परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. त्या वेळेस मुख्याध्यापक वैद्य यांचे पुतणे डॉ. व्ही.जी. वैद्य यांनी पैठणकर यांना कृषी विषयातील पदवी घेण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. त्यांनी कृषी पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला. यासाठी त्यांना विद्यापीठाचे रौप्य आणि सुवर्णपदक तर मिळालेच, शिवाय सर ऑर्थर ब्लेनरहॅसेट स्मृतीपदक, चक्रधर स्मृतीपदक आणि केदारनाथ राय स्मृतीपदक अशी तीन आणि एकंदर पाच पदके मिळाली. त्यांच्या या कामगिरीमुळे प्रबंध सादर करून मास्टर्स डिग्री करण्यासाठी नागपूर विद्यापीठाची किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. त्यासाठी नामांकित संख्याशास्त्रज्ञ डॉ.पां.वा.सुखात्मे यांच्या मार्गदर्शनाखाली १९४४ साली नवी दिल्ली येथील इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रीसर्च इन्स्टिट्यूट येथे त्यांना संधी मिळाली व नोकरी करत असतानाच त्यांनी एम.एस्सी.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. सहा वर्षांच्या अनुभवानंतर त्यांना कृषी मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी विभागामध्ये अधिकारी पदावर बोलावले. सरकारी अधिकाऱ्यांना तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्यासाठी, तसेच ग्रामीण भागांमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे आणि तंत्रज्ञान विकासाचे काम करण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. समाजविकासाच्या एका कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने त्यांना १९५६-५७ साली अमेरिकेला पाठवले. ग्रामीण भागातील तंत्रज्ञान आणि व्यवसायाचा एकात्मिक विकास, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि लवकर विकास घडवणे असे त्याचे स्वरूप होते. अमेरिकी सरकारच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य कार्यक्रमांतर्गत होम इकॉनॉमिक्स अँड अ‍ॅग्रिकल्चर या करारान्वये हा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यांना अमेरिकेतील ग्रामीण भागातील कृषीविषयक प्रगतीचे प्रात्यक्षिक बघायची संधी मिळाली. त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय, अरबाना आणि युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना येथे जाण्याची संधी मिळाली. येथील प्रशिक्षणात शेती पूरक उद्योगांची आवश्यकता त्यांच्या लक्षात आली.

           अमेरिकेतून परतल्यावर पैठणकर यांना ‘डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट स्मॉल फार्मर्स डेव्हलपमेंट एजन्सी’त  शैलेशचंद्र रॉय यांच्याकडे उपायुक्त पदावर आमंत्रित केले. या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांतर्गत देशभर एक चांगली व्यवस्था होती. यात पैठणकर यांच्याकडे योजना बनवणे, वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे अभ्यासक्रम तयार करणे आणि त्यांच्या तारखा ठरवण्याचे काम होते.

           पैठणकर यांचा विवाह संगीत विषयाची गोडी असणाऱ्या सुमन एंखे या जळगावच्या एका खासगी उद्योगातील व्यवस्थापकाच्या मुलीशी झाला. ते भारत सरकारच्या सेवेतून १९७९मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर त्यांची इफकोचे व्यवस्थापकीय संचालक पॉल पोथेन यांनी प्रशिक्षण व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. तेथून ते १९८२मध्ये निवृत्त झाले. इफकोमध्ये असताना पैठणकर यांनी विस्तार कार्य चालूच ठेवले. त्यांच्या एकंदर कारकिर्दीत दहा हजारपेक्षा अधिक विस्तारतज्ज्ञांना त्यांनी प्रशिक्षण दिले. त्यामुळेच त्यांना ‘प्रशिक्षकांचा प्रशिक्षक’ म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- डॉ. अनिल मोहरीर

पैठणकर,मधुकर नारायण