पाटील, अरविंद रेणुराव
अरविंद रेणुराव उपाख्य बाबासाहेब पाटील यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील सायखेड येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दारव्हा येथेच झाले. त्यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. त्यांनी अकोला येथील कृषी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि नागपूर विद्यापीठाची बी.एस्सी. (कृषी) पदवी घेतली. त्यांनी वडील रेणुराव यांच्या नावे एक धर्मादाय न्यास (चॅरिटेबल ट्रस्ट) निर्माण केला व शेतकर्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले. त्यांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेतामध्ये त्यांचे स्मारक उभारले व ट्रस्टच्या नावे २८ एकर जमीन दिली.
अरविंद पाटील यांनी डॉ. पं.दे.कृ.वि.ला देणगी देऊन वनस्पति-रोगशास्त्र विभागात प्रथम येणार्या विद्यार्थ्याला या निधीतून सुवर्णपदक द्यावे असे सुचवले. त्यांना फलोत्पादनामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल २ ऑक्टोबर १९९१ रोजी राज्यपालांच्या हस्ते कृषिभूषण पदवी दिली.
उन्हाळ्यामध्ये संत्रा बगीच्याला पाणी दिलेच नाही, तर पुढील जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये उत्तम बहर येतो व फळधारणाही चांगली होते, असे पाटील यांनी त्यांच्या शेतीवर दाखवून दिले. त्यामुळे फलोत्पादनामध्ये कमी पाण्याचा वापर केल्यास उत्तम फायदा मिळतो हे सिद्ध झाले. तसेच काळ्या जमिनीला योग्यरीत्या पाणी दिल्यास संत्र्याची लागवड फायदेशीर होते. त्यांना जुलै १९९४मध्ये वसंतराव नाईक पुरस्काराने सन्मानित केले. फलोत्पादन विभागाने राज्य शासनातर्फे त्यांना १९९२ व १९९४मध्ये प्रशस्तिपत्रेही दिली आहेत. त्यांनी आपल्या मालकीची विहीर सायखेडवासीयांना दान केली आहे.