पाटील, चंद्रकांत भोजराज
चंद्रकांत भोजराज पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील शेतकरी. त्यांचे सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण जळगाव येथील नगरपालिका विद्यालयात झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण जळगाव येथील आर.आर. विद्यालय येथे पूर्ण केले, तर पुणे येथील कृषी महाविद्यालयातून १९६२मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी कृषी महाविद्यालय धुळे, कोल्हापूर आणि दापोली (रत्नागिरी) येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य केले. कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे काम करताना त्यांनी एम.एस्सी. (कृषी) ही पदवी संशोधनाद्वारे १९६८मध्ये प्राप्त केली.
१९८५मध्ये पीएच.डी. प्राप्त केल्यावर कारळा संशोधन केंद्र, इगतपुरी येथे त्यांच्या संशोधनात्मक कार्यास सुरुवात झाली. परंतु त्यांच्या कार्याची लक्षणीय सुरुवात सोलापूर येथील कोरडवाहू शेतीमध्ये हवामान विशेषतः पाऊस महत्त्वाचा असल्याने त्याचा पीकवाढीवर कसा कसा परिणाम होतो यापासून झाला. त्यामुळे पडणारा पाऊस, जमिनीतील ओल यांचा संबंध लावून पीक कसे येईल याचा अंदाज बांधणे शक्य होते. तसेच या अभ्यासामुळे संवेदनाक्षमवाढीच्या अवस्था कशा प्रकारे बाधित होतात यांचाही अभ्यास करता येऊन पीक उत्पादन किती येऊ शकेल याचा ठोकताळा बांधता येतो.
डॉ. पाटील यांनी महाराष्ट्रातील २७६ तालुक्यांच्या उपलब्ध पावसाची आकडेवारी (२४ ते ६० वर्षे) अभ्यासून १०, २०, ३०, ४० व ५० मिलिमीटर पावसाची प्राथमिक व काही अटी लावून संभाव्यता काढून ती उपलब्ध करून दिली. या माहितीचा आधार देऊन कोरडवाहू व पर्जन्याक्षयी शेतीत पेरणी कधी केली असता लाभदायी होईल याचा अंदाज बांधता येतो. सामान्यतः जमीन चांगली पेरणीयोग्य ओल झाल्यानंतर पेरणीस सुरुवात होते, परंतु अशा स्थितीत पेरणीयोग्य जमीन करताना ओल कमी होऊन पेरणी लांबण्याचा धोका संभवतो, परंतु डॉ. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या संशोधनामुळे पावसाच्या संभाव्यता पाहून कोरड्या मातीत पेरणी करणे शक्य होते. त्यासंबधीचे प्रयोग केले असता पीक उत्पादनात ३० ते ५० टक्के वाढ झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून अमेरिकन बायोग्राफिक संस्थेत ‘मॅन ऑफ द इयर’ असा नामनिर्देश १९९८ मध्ये केला. तसेच जमिनीचा प्रकार पाहून (विशेषतः खोली) अपेक्षित पाऊस व ओलावा निर्देशांक तयार केला. या सर्व कामांचा उपयोग कोरडवाहू शेतीत पीक नियोजनावर होतो. ही सर्व माहिती डॉ. पाटील यांनी डॉ. एस.पी. काळे यांच्या सहभागाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. कोरडवाहू शेतीत हवामान हा उपयुक्त घटक कसा होईल याबद्दलचे हे महत्त्वाचे कार्य आहे. डॉ. चंद्रकांत पाटील यांनी संशोधनावर आधारित २०० हून अधिक लेख लिहिले आहेत. तसेच तांत्रिक माहितीवर आधारित १०० पर्यंत लेखांची संख्या आहे. ‘पीक संवर्धनाची मूलतत्त्वे’ हे (मराठी) पुस्तक १९७३मध्ये प्रसिद्ध केले. तसेच ‘रेनफॉल अॅट लोकेशन, महाराष्ट्र स्टेट’ हे (इंग्रजी) पुस्तक २००७ मध्ये प्रकाशित झाले. म.फु.कृ.वि.मध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत असताना डॉ. चंद्रकांत पाटील हे १९९९मध्ये सेवानिवृत्त झाले.