Skip to main content
x

पाटील, हरिश्चंद्र गोपाळ

     डॉ. हरिश्चंद्र गोपाळ पाटील यांचा जन्म बोर्डी, जि. ठाणे येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण बोर्डीत झाले आणि १९२७ साली ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले.

     आचार्य भिसे यांच्या प्रेरणेने पाटील यांनी पुण्यातील शेतकी महाविद्यालयात १९२८ साली प्रवेश घेतला आणि १९३१ साली त्यांनी बी.एजी. ही पदवी मिळवली. ध्येयवादाने प्रेरित डॉ. पाटील यांनी भिसे यांच्या शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करली. पुढे त्यांच्या संचालकपदाखाली शेतकी शाळा सुरू झाली. बोर्डी येथे पुरेशी जमीन उपलब्ध नव्हती म्हणून ही शाळा कोसबाड येथे नेण्यात आली. प्रत्यक्ष जमिनीवर मेहनत करण्याचे शिक्षण देणारी ही शाळा पाटील यांनी नावारूपाला आणली.

     १९५१ साली पाटील जपानमध्ये तेथील भातशेतीचा अभ्यास करण्यासाठी गेले. जपानमधील शेती भारतासारखीच लहान-लहान क्षेत्रफळाची होती. पण शेतकरी त्याच जमिनीतून दोन-तीन पिके काढत होते. पिकांची लागवड सरळ रेषेत आणि ठरावीक अंतरावर करणे, संशोधन केंद्रावरून प्रगत शेतीतंत्राची माहिती मिळवणे, नवनवीन बियाण्यांचा वापर करणे, शास्त्रज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे रासायनिक खतांची ठरावीक मात्रा वापरणे या आणि अशा मार्गांनी जपानी शेतकऱ्याने चांगली उत्पादकता मिळवली होती.

      भारतात परतल्यावर पाटील यांनी कृषिशिक्षण संस्था, कोसबाड आणि कोरा केंद्र, बोरिवली येथे जपानी भातशेतीचे यशस्वी प्रयोग केले. याचा महाराष्ट्रभर प्रसार झाला. जपानी पद्धतीने भातशेती केल्यास भारतातील उत्पादन वाढू शकते, हे कळल्यावर पंतप्रधान नेहरूंनी ही पद्धती देशभर प्रसारित करण्याची योजना आखली. सरकारने ‘भारताची भातक्रांती’ या नावाने एक पुस्तक प्रसिद्ध केले. डॉ. हरिश्चंद्र पाटील आणि प्राणलाल कापडिया यांनी भारतभर फिरून ह्या पद्धतीचा प्रसार केला. जपानी पद्धतीची भातशेती भारतात रुजवून देशातील अन्नधान्य उत्पादन वाढवण्यात डॉ. पाटील यांनी मोठे योगदान दिले. हे करताना रासायनिक खतांचा वापर वाढवून नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फरस) आणि पालाश (पोटॅश) ह्या मुख्य घटकांचा पुरवठा आवश्यक तेवढा उपलब्ध करून दिला. तशी गरज, नवीन-सुधारित बियाण्यांना होती. पण त्याचबरोबर शेणखत, कंपोस्टखत, हिरवळीची खते अशी सेंद्रिय खते वापरून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवायला मदत होते. त्यामुळे सेंद्रिय खतेही वापरावीत, असे पाटील यांनी सांगितले.

     तायचुंग, आय.आर.-८ अशा सुधारित बियाण्यांच्या जाती वापरायला सांगून हेक्टरी उत्पादन चांगले मिळवले गेले. ह्या जाती बुटक्या असून त्यांचा बुंधा मजबूत असतो. तसेच, सूर्यप्रकाश घेऊन अन्नउत्पादनाची शक्ती ह्या जातीत चांगली असते; त्यामुळे भरपूर दाणे तयार होतात. वाढत्या लोकसंख्येकरिता अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी अशा जातींची गरज आहे, असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे कोरडवाहू, ज्वारी, भुईमूग, गहू यांची सुधारित बियाणे वापरून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम केल्यास पारंपरिक बियाण्यांपेक्षा तीन ते दहापट पीक अधिक आल्याचे दिसून आले आहे.        

     शेतकऱ्यांच्या मनातील गैरसमज दूर करून, विज्ञानाचा योग्य संदेश त्यांच्यामार्फत पोहोचवण्यासाठी कृषी विद्यापीठांची गरज डॉ. पाटील यांनी ओळखली. कोसबाड येथील केंद्रात कृषिशिक्षण, कृषिसंशोधन, पशुपालन या क्षेत्रांतील कामांचा अनुभव डॉ. पाटील यांना होता. तसेच भारतातर्फे १९५७ साली रशियात आणि १९५८ साली अमेरिका, चीन व जपान येथे गेलेल्या शेतकी मंडळांत त्यांचा समावेश होता.

      तत्कालीन केंद्रीय मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १९६४ साली स्थापन केलेल्या ‘भारत कृषक समाजा’चे डॉ. पाटील हे संस्थापक सदस्य होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ह्या महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होण्याचा मान पाटील यांना मिळणे रास्तच होते. इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असताना मुंबईतील लोकमान्य दैनिकात त्यांनी शेती या विषयावर लेख लिहिले. ते अत्यंत सोप्या भाषेत असल्यामुळे ते वाचून अनेक शेतकऱ्यांनी नवीन तंत्रांचा स्वीकार केला आणि आपले अन्नधान्याचे उत्पादन वाढवले.

     १९६७ साली ‘पद्मश्री’ हा पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांना गौरवले. डॉ. पाटील यांनी सारे जीवन भारतातील शेतीची उत्पादकता वाढवण्यात आणि त्याद्वारे भारत अन्नधान्यात स्वावलंबी करण्यात व्यतीत केले. कृषी विद्यापीठे आणि शेतकरी यांच्यामध्ये दुवा असायला हवा, म्हणजे कृषिशास्त्रज्ञ करीत असलेल्या संशोधनाची माहिती घेऊन शेतकरी उत्पादकता वाढवू शकेल, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे काम कृषिशास्त्रज्ञ करतील, अशी रास्त भूमिका त्यांनी त्या वेळी मांडली होती, ती आजच्या काळातही लागू आहे.

जयंत एरंडे

- दिलीप हेर्लेकर

पाटील, हरिश्चंद्र गोपाळ