पाटील-वांजरीकर, रामकृष्ण मारोतराव
रामकृष्ण मारोतराव पाटील यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावातील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण पांढरकवडा येथेच झाले. त्यांनी बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन करून शेती व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यांनी एलएल.बी. ही पदवी संपादन केली, तरी त्यांचा ओढा शेती करण्याकडे जास्त होता. त्यांनी वकिली सोडून वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय करणे पसंत केले. त्यांची पुष्कळशी शेती कोरडवाहू होती. त्यांनी शेतीकामात नवनवीन प्रयोग करून शेती व्यवसाय समृद्ध केला. त्यांनी सर्वप्रथम बी.टी. कापूस लागवड करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांनी आपल्या शेतीवर तुषारसिंचन प्रणाली बसवून कापसाला ओलीत केले आणि कापसाच्या पीकवाढीमध्ये उच्चांक गाठला. त्यामुळे त्यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, तसेच डॉ. पं.दे.कृ.वि.मार्फत जीवनगौरव पुरस्कार मिळाले. त्यांनी आपल्या शेतीमध्ये नूतन तंत्रज्ञान वापरून उत्पादनवाढीचे प्रयत्न केले.
खताचे व्यवस्थापन, सेंद्रिय खताचा वापर व सूक्ष्म द्रव्यांचे व्यवस्थापन करून स्वतःची शेती उन्नत करून गावातील शेतकर्यांना खत, कीड रोगांचे नियंत्रण करण्याबद्दल मार्गदर्शन केले. पाटील यांनी परंपरागत शेतीला फाटा देऊन नव्या विकसित तंत्रज्ञानाद्वारे शेती केली व शेतीला केवळ उपजीविकेचे साधन न समजता तो व्यवसाय मानून शेतीतून उत्पन्न काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. नियोजनबद्ध शेती केली, तर उपलब्ध भांडवलामधून आणि पाणी व्यवस्थापन करून शेतीमध्ये पीक उत्पादनाचा उच्चांक गाठण्यास मदत होते आणि शेतकर्यांनी व्यवस्थित व लक्ष देऊन शेती केली, तर त्यांचे जीवन समृद्ध होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केले. ते सेंद्रिय खताचा वापर करून शेतीमध्ये उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. सेंद्रिय शेती जास्त फायदेशीर ठरत आहे आणि सकस धान्य उपज करण्यास मदत होत आहे, असे त्यांचे ठाम मत आहे.