पाटील, वसंत माधव
वसंत माधव पाटील यांचा जन्म खानदेशातील न्याहळोद येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण येथेच पार पडले. त्यांनी १९३४मध्ये धुळे येथील मराठा बोर्डिंगमध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली आणि ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी १९३८मध्ये पुण्याच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते १९४१मध्ये बी.एस्सी. (कृषी) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पाटील १९४१मध्ये धुळ्याच्या शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. तिथे ते १९५४पर्यंत शिक्षक, मुख्याध्यापक व अधीक्षक अशा विविध पदांवर सेवा करत होते. त्यांचा विवाह वत्सला यांच्याशी झाला.
पोस्ट वॉर रिकन्स्ट्रक्शन या योजनेखाली १९४७मध्ये पाटील यांची अमेरिकेत तीन वर्षे उच्च शिक्षणासाठी निवड झाली. त्या काळात त्यांनी पशुसंवर्धन व दुग्ध उत्पादन या विषयातील एम.एस्सी. व पीएच.डी. पदव्या संपादन केल्या. त्यांनी त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायाचा चिकित्सकपणे अभ्यास केला आणि आपल्या विषयासंबंधी उपलब्ध असलेले सारे वाङ्मय त्यांनी वाचून काढले. तेथील आर्थिक व व्यावसायिक प्रगतीच्या प्रलोभनांना बळी न पडता आपल्या देशबांधवांना आपल्या ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून मायदेशाच्या ओढीने ते १९५०मध्ये भारतात परतले. त्यांची १९५४मध्ये पुणे येथे लाइव्ह स्टॉक एक्सपर्ट या पदावर नेमणूक झाली. त्यांची १९५६च्या राज्यपुनर्रचनेमुळे नागपूर व अकोला येथे एक वर्ष प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली आणि १९५९मध्ये महाराष्ट्राचे कॅटल डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करताना त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले.
शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनासारखा गतिमान जोडधंदा दुसरा नाही अशी पाटील यांची प्रदीर्घ अभ्यासानंतर खात्री झाली. दुधाच्या उत्पादनात झपाट्याने वाढ होण्यासाठी गायीचा संकर अत्यावश्यक आहे, हा विचार प्रथमच त्यांनी मांडला, पण नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यास तयार नसलेल्या अधिकाऱ्यांनी व समाजमनाने हा विचार मान्य केला नाही, पण पुढे तोच विचार मोठ्या प्रमाणात स्वीकारण्यात आला. पुढे त्यांची मुंबई येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली. त्या काळात त्यांनी दुग्धोत्पादन वाढवण्याचे वेगवेगळे प्रकल्प तयार केले. दुग्धोत्पादन हा शेती व्यवसायाचा पूरक भाग झाला पाहिजे, हा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला. या विचाराचा पाठपुरावा तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसार्ई यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या दूध योजनांचे सहसंचालक व संचालक म्हणून डॉ. पाटील यांची बढती झाली व महाराष्ट्रात धवलक्रांतीचे एक नवे पर्व सुरू झाले.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून दूध योजनेत १९६३च्या सुमारास प्रतिदिनी जास्तीत जास्त ३० हजार लीटर दूधपुरवठा होत होता. डॉक्टरांनी आखलेल्या धोरणांचा परिणाम म्हणून हा पुरवठा दहा लाख लीटरपर्यंत वाढला. त्यांच्या या क्रांतिकारक विचारांच्या सन्मानार्थ म.फु.कृ.वि.ने मानद पीएच.डी. पदवी त्यांना प्रदान केली. त्यांनी दुग्धोत्पादनाच्या क्षेत्रात गाईंचा संकर करणे, चारा साठवण्याच्या शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करणे, सामूहिक दुग्धोत्पादन, गुरांची निगा राखणे, दुधाची प्रतवारी इ. संबंधात अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रयोगशील व क्रांतिकारक दुग्ध व्यवसायाला न्याय देण्यासाठी बोराडी येथे दुग्धतंत्र निकेतन स्थापन केले होते.
- संपादित