Skip to main content
x

पाटणकर, राजाराम भालचंद्र

    राजाराम पाटणकर यांचा जन्म खामगाव येथे झाला. मराठीतील ख्यातनाम साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे पाटणकरांचे आईकडून आजोबा होत. बालकवींच्या समग्र कवितांचे सर्वप्रथम संपादन करणारे इंग्रजीचे प्राध्यापक, प्राचार्य भा. ल. पाटणकर हे त्यांचे वडील होत. रा. भा. पाटणकरांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथे झाले. ते इंग्रजी व मराठी हे विषय घेऊन १९४९ मध्ये बी.ए. आणि इंग्रजी विषय घेऊन १९५१मध्ये एम. ए. झाले. त्यांच्या ‘कम्युनिकेशन इन लिटरेचर’ या विषयावरील प्रबंधाला पीएच.डी.ची पदवी (१९६०) मिळाली. १९५१ ते १९६४ या काळात भावनगर, अहमदाबाद, भूज, अमरावती येथील शासकीय महाविद्यालयांमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक, १९६४ ते १९८७ या काळात मुंबई विद्यापीठात प्रथम इंग्रजीचे प्रपाठक आणि नंतर प्राध्यापक, १९७८पासून निवृत्तीपर्यंत मुंबई विद्यापीठात इंग्रजी विभागाचे प्रमुख असे कार्य केले.

रा. भा. पाटणकर यांनी आपल्या लेखनाच्या आरंभीच्या काळात, साधारणपणे विशीच्या आसपास ‘एरिअल’ या टोपणनावाने तुरळक कथा-कविता लिहिल्या. नंतर मात्र त्यांनी सर्जनशील लेखन केले नाही. त्यांचे आरंभीचे समीक्षात्मक व सौंदर्यशास्त्रीय लेखन मुख्यतः इंग्रजीमध्येच होते. ‘इस्थेटिक्स अँड लिटररी क्रिटिसिझम’ (१९६९) हे त्यांचे सौंदर्यशास्त्रावरील इंग्रजी पुस्तक होय. साधारणपणे १९७०नंतरचे लेखन त्यांनी प्रामुख्याने मराठीमध्येच  केले. त्यांचा ‘सौंदर्यमीमांसा’ (१९७४) हा स्वतंत्र ग्रंथ आणि ‘क्रोचेचे सौंदर्यशास्त्र: एक भाष्य’ (१९७४), ‘कान्टची सौंदर्यमीमांसा’ (१९७७), ‘कॉलिंगवुडची कलामीमांसा’ (१९७५) हे त्यांचे भाष्यपर ग्रंथ सौंदर्यशास्त्राशी संबंधित आहेत. ‘साहित्यविचार आणि सौंदर्यशास्त्र’ (२००१) हा सौंदर्यशास्त्रावरील लेखसंग्रह, ‘कमल देसाई यांचे कथाविश्व’ (१९८४), ‘मुक्तिबोधांचे साहित्य’ (१९८६), ‘कथाकार शांताराम’ (१९८८), ‘वसंत कानेटकरांची नाटकेः वैविध्य आणि ध्रुवीकरण’ (२००२) हे त्यांचे प्रत्यक्ष साहित्यसमीक्षा करणारे ग्रंथ. ‘अपूर्ण क्रांती’ (१९९८) हा त्यांचा संस्कृती समीक्षेवरील महत्त्वाचा ग्रंथ होय. याखेरीज ‘अपूर्ण क्रांती’ या ग्रंथातील प्रमेयाचा पाठपुरावा करणारी लेखमाला ‘अनुष्टुभ’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. ‘सौंदर्यमीमांसा’ या ग्रंथाची हिंदी, गुजराती भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत.

रा.भा.पाटणकरांना त्यांच्या सौंदर्यशास्त्रीय, समीक्षात्मक लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले. ‘सौंदर्यमीमांसा’ या ग्रंथाला साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. अनेक ग्रंथांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार व अन्यही अनेक पुरस्कार मिळाले. एकूण समीक्षात्मक कार्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला.

‘सौंदर्यमीमांसा’ या ग्रंथात पाटणकरांनी आपला कलेच्या द्विध्रुवात्मकतेचा सिद्धान्त मांडताना पाश्चात्त्य सौंदर्य-विचाराचा एक व्यापक नकाशा मराठी वाचकांसमोर ठेवला. त्यांच्या मते ‘कला’ वा ‘साहित्य’ ही अनेकांगी व्यामिश्र संकल्पना असल्यामुळे तिची एकच एक व्याख्या देता येत नाही. या संकल्पनेच्या व्यामिश्रतेमुळेच तिच्यासंबंधी विविध सिद्धान्त निर्माण होतात. या सिद्धान्तांचे स्वाभाविकपणे दोन गटांत विभाजन होते, आणि त्यातून दोन परस्परविरोधी संकल्पनाव्यूह उभे राहतात. स्वायत्तवाद/अलौकिकतावाद/कलावाद व लौकिकतावाद/जीवनवाद हे ते दोन व्यूह आहेत. ज्यात लौकिक जीवनाचा संबंध जवळपास नसतो. असे अर्थरहित संगीत स्वायत्ततेच्या ध्रुवाकडे, तर आशयावर भर देणारी साहित्यासारखी कला लौकिकतेच्या ध्रुवाकडे झुकलेली असते. परंतु कोणतीही कला निर्भेळपणे एका ध्रुवाचे उदाहरण म्हणून घेता येत नाही. कारण बहुतेक कलांमध्ये हे दोन्ही ध्रुव निदान बीजरूपाने तरी अस्तित्वात असतात. हा पाटणकरांचा द्विधु्रवात्मकतेचा सिद्धान्त होय.

पाटणकरांनी द्विध्रुवात्मकतेच्या सिद्धान्ताच्या आधारे साहित्य या कलेचा विचार केला आहे. साहित्याच्या आशयसापेक्ष प्रकृतीमुळे त्याच्या संदर्भात रूपात्मक निकषांबरोबरीनेच ज्ञानात्मक आणि नैतिक निकषांचा, म्हणजेच अनेक-निकषतेचा अवलंब करणे अपरिहार्य कसे ठरते, हे त्यांनी दाखविले आहे. पाटणकरांच्या मते कलाकृती अलौकिक ठरण्यासाठी तिची घडण केवळ सौंदर्यात्मक/कलात्मक तत्त्वांनी व्हावयास हवी. ती ज्ञानात्मक व नैतिक तत्त्वानुसार व्हावयास नको. परंतु साहित्यासारख्या आशययुक्त कलांमध्ये ती अपरिहार्यपणे ज्ञानात्मक व नैतिक तत्त्वांनुसारच होते, आणि त्यामुळे आस्वादामध्ये अगदी स्वाभाविकपणेच ज्ञानात्मक व व्यवहारात्मक भूमिका जागृत होते. साहित्यासारखी कला अप्रत्यक्षपणे नैतिकतेचा परिपोष कसा करते, ते त्यांनी दाखविले आहे. याबरोबरीनेच त्यांनी कला कोणत्या प्रकारे ज्ञान देते, तिच्या ज्ञानात्मकतेवर व वैचारिकतेवर तिचे मूल्य कसे अवलंबून असते, याचीही चर्चा केली आहे. पाटणकरांचे हे सौंदर्यशास्त्रीय लेखन तार्किक व तत्त्वज्ञानात्मक शिस्तीने केले गेले आहे. याबरोबरीनेच ते ससंदर्भही आहे. त्यामुळे मराठीतील सौंदर्यशास्त्रीय लेखनाच्या परंपरेत हे लेखन वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.

पाटणकरांनी प्रत्यक्ष साहित्यसमीक्षा करणार्‍या आपल्या ग्रंथांमध्येही त्या-त्या लेखकाच्या समग्र साहित्याचे अनेक निकषांच्या आणि विविध समीक्षा पद्धतींच्या साहाय्याने विश्लेषण, मूल्यमापन केले आहे. मराठीमधील आस्वादक आणि चरित्रात्मक समीक्षापद्धती नाकारून विश्लेषणात्मक, मूल्यमापनात्मक अशा समीक्षेचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांच्या मते समीक्षा ही साहित्यकृतीलक्ष्यी असायला हवी. अर्थात, साहित्यकृती ही विशिष्ट साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेत निर्माण होते. साहित्यकृतीचे अस्तित्व व स्वरूप या परंपरांवर अवलंबून असल्यामुळे तिचे विश्लेषण व मूल्यमापन या संदर्भातच करावयास हवे. साहित्यकृतीची अशी सर्वांगीण चिकित्सा करणार्‍या समीक्षा पद्धतीला ते ‘विदग्ध समीक्षापद्धती’ असे म्हणतात. त्यांची ही समीक्षा साहित्यकृतीची व्यामिश्रता, तिची अनेक अंगे लक्षात घेऊन तिचा विचार करणारी आहे. पाटणकरांच्या कमल देसाई, मुक्तिबोध व शांताराम ह्यांच्यावरील लेखनात एक सूत्र कायम आहे. ते म्हणजे आधुनिक मराठी साहित्यात महत्तेची बीजे विखुरलेली सापडतात; परंतु या बीजांमधून एखादा भरगच्च वृक्ष निर्माण झालेला दिसत नाही. असे का झाले, आणि यावर उपाय काय, हा पाटणकरांचा एक चिंतनाचा विषय राहिला.

‘अपूर्ण क्रांती’ या आपल्या ग्रंथामध्ये पाटणकर भारतीय, विशेषतः मराठी संस्कृतीची चिकित्सा करतात. आज आपली ज्ञानेच्छा व विचारेच्छा कमी का झाली आहे, या प्रश्नाचा शोध त्यांनी या पुस्तकात घेतला आहे. आपला हा अभ्यास त्यांनी आर्थिक, शैक्षणिक व साहित्यिक अशा तीन भागांमध्ये मांडलेला आहे. इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारे आपले आर्थिक शोषण केलेले असले, तरी त्यांनी शिक्षण व साहित्य या व्यवस्था आर्थिक शोषणाला पूरक यंत्रणा म्हणून उभारल्या, याला कोणताच पुरावा दिसत नाही; असे या ग्रंथातील प्रतिपादन आहे. त्यांचे हे प्रतिपादन आज प्रचलित व लोकप्रिय असलेल्या वसाहतवादाच्या चर्चेच्या विरोधात आहे. पाटणकरांनी आपल्या प्रमेयाच्या पुष्ट्यर्थ अर्थशास्त्र, इतिहास, शिक्षण, साहित्य अशा अनेक ज्ञानविषयांमधील भरपूर पुरावे सादर केले आहेत.

रा.भा.पाटणकरांनी सौंदर्यशास्त्रीय लेखनाच्या संदर्भात वेगळ्या सिद्धान्ताची मांडणी करून मराठी सौंदर्यशास्त्रीय लेखनामध्ये मोलाची भर घातली आहे. याचप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष साहित्यसमीक्षेतही अनेक अंगांनी साहित्यकृतींचा विचार केला आहे. भक्कम सैद्धान्तिक भूमिका, साहित्यिक व सांस्कृतिक परंपरा यांचे सुस्पष्ट भान, सविस्तर व सूक्ष्म चिकित्सा आणि सजग अशी संवेदनक्षमता यांमुळे त्यांची प्रत्यक्ष साहित्यसमीक्षाही मराठी परंपरेत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे.

- डॉ. वसंत पाटणकर

पाटणकर, राजाराम भालचंद्र