Skip to main content
x

पाठक, नारायण विनायक

नारायण विनायक पाठक यांचा जन्म ग्वाल्हेरमध्ये झाला. त्यांना लहानपणीच संगीताची आवड निर्माण झाली. माधव संगीत विद्यालयाचे प्राचार्य राजाभैया पूछवाले हे त्यांचे गुरू होते. १९२४ मध्ये ते ‘संगीतरत्न’ परीक्षा  उत्तीर्ण झाले. पाठकांनी ग्वाल्हेर गायकीचा चांगला अभ्यास केला. प्रवर्तक मास्तरांच्या ‘चतुर संगीत महाविद्यालया’मध्ये त्यांनी २-३ वर्षे अध्यापन केले. नंतर १९२५ मध्ये प्रवर्तक यांनी ‘अभिनव संगीत विद्यालय’ सुरू केले आणि १९२६ पासून नारायण पाठक यांची  प्राचार्यपदी नियुक्ती केली.  पाठकांनी अथक परिश्रमाने विद्यालयाला समृद्ध केले. 

पाठक मास्तरांची शिकवण्याची पद्धत सुसूत्र, सोपी व आकर्षक होती. ते अभिनव रागमंजिरी, संस्कृत श्लोक,दोहे पाठ करून घेत. ख्याल, धृपदे, धमार, तराणे, चिजा व रागविवेचन यांवर त्यांचा भर असे. पाठांतरावर त्यांचा खास भर असे. त्यांनी चरितार्थाकरिता टिळक विद्यालय, अंधविद्यालय व हिंदू मुलींची शाळा इ. संस्थांमध्ये संगीत शिक्षकाचे काम केले. लोकसंग्रहक वृत्तीमुळे त्यांना कुशल शिक्षकवर्ग, घनिष्ठ मित्रमंडळी व उत्तम शिष्य लाभले. त्यांच्या शिष्यवर्गात दादाजी तुळाणकर, भैयासाहेब सराफ, विद्याधर वझलवार, कृष्णराव कर्वे, रामाजी एलकुंचवार,  लीला कुलकर्णी, वत्सला वडाभात (पालकर), उषा तांबे,  घुमरे भगिनी यांचा समावेश आहे. बर्डी व धरमपेठ विभागात पाठकांनी  विद्यालयाच्या शाखा सुरू केल्या. काशी येथील मैफलीत त्यांना ‘गायनाचार्य’ पदवी देण्यात आली.

त्यांची १९४५ मध्ये लखनौजवळ सीतापूर  महाविद्यालयामध्ये संगीत अध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नंतर त्यांना खैरागडला आमंत्रित केले गेले. तेथील संगीत अकादमीत त्यांनी १९५८ पर्यंत मुख्याध्यापक पदावर कार्य केले. नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी डोंगरगडला घर बांधले व ते सहकुटुंब तेथे स्थायिक झाले. योगायोगाने भंडारा येथे वनिता समाजाने सुरू केलेल्या संगीत विद्यालयात त्यांना पाचारण केले गेले. पाठक व दादाजी तुळाणकर या गुरुशिष्यांनी काही वर्षे विद्यालय चालविले; पण पुढे प्रकृती ढासळू लागल्याने ते डोंगरगडला गेले. तेथेच त्यांचे निधन झाले.

वि.ग. जोशी

पाठक, नारायण विनायक