Skip to main content
x

पिळगावकर, अरविंद गडबडनाथ

राठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक - नट अरविंद गडबडनाथ पिळगावकर यांचा जन्म मुंबईत झाला. गडबडनाथ दिनानाथ पिळगावकर आणि सुमतीबाई यांचे हे सुपुत्र. वडील सचिवालयात (सेक्रेटरिएट) महसूल खात्यात नोकरीला होते. घरात संगीत वा नाटकाचा वारसा नव्हता. मात्र आई गाणे चांगले म्हणत असे. मंगलाष्टके रचून त्यांना चाली लावत असे. तिला गाण्याची बुद्धी व आकलन होते.
अरविंद पिळगावकर शेठ धरमशी गोविंदजी ठाकरसी हायस्कूलमधून १९५४ साली मॅट्रिक उत्तीर्ण झाले, तर १९५८ साली विल्सन महाविद्यालयामधून ‘इतिहास’ आणि अर्थशास्त्र हा विषय घेऊन बी.ए.ची पदवी घेतली. १९६० ते १९७० या काळात त्यांनी उच्च न्यायालयात नोकरी केली. १९७० पासून त्यांनी पूर्णवेळ संगीत नाटक करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षांपासून शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला के.डी. जावकरांकडे त्यांनी सात वर्षे तालीम घेतली. के.डी. जावकर हे अंतुबुवा जोशींचे पहिले शागीर्द व नंतर ते अब्दुल करीमखाँकडे शिकले.
‘वासवदत्ता’ या नाटकाच्या निमित्ताने अरविंद पिळगावकरांचा पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याशी संबंध आला. त्यानंतर जवळ जवळ दहा वर्षे त्यांना पं. जितेंद्र अभिषेकींचा सहवास लाभला व शास्त्रोक्त संगीताची तालीम मिळाली. पं.अभिषेकींनंतर गोविंदबुवा अग्नींकडे १९७५ पासून त्यांनी वीस वर्षे तालीम घेतली. या शिवाय जुन्या संगीत नाटकांतील भूमिका तयार करण्यासाठी प्रभाकर भालेकर यांच्याकडून व भार्गवराम आचरेकर यांच्याकडून नाट्यसंगीताचे खास शिक्षण घेतले.
संगीत रंगभूमीवर त्यांचे पदार्पण १९६४ साली, मुंबई मराठी साहित्य संघाच्या यशवंतराव होळकर या ऐतिहासिक नाटकाद्वारे झाले. त्यांचे संगीत रंगभूमी कारकीर्दीतील पहिले महत्त्वाचे नाटक वसु भगत यांचे ‘संगीत वासवदत्ता’ (१९६७) होय. त्याचे संगीत पं. जितेंद्र अभिषेकींचे होते. अरविंद पिळगावकरांनी नाटकातील नायक उदयनची भूमिका साकारली होती. सुहासिनी मुळगावकर त्यांच्या सहनायिका होत्या. ‘तुझा गे नितनूतन सहवास’, ‘तू येता सखी माझ्या सदनी’ इ. या नाटकातील गाणी गाजलीत. याचवर्षी पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या ‘नयन तुझे जादूगार’ या नाटकातील ‘उडूनी जा पाखरा’ या गाण्यामुळे ते विशेष प्रसिद्धीच्या झोतात आले.
अरविंद पिळगावकरांची संगीत रंगभूमीवरील वाटचाल पाहता त्यांनी सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक-भक्तिरसपूर्ण, लोकनाट्य-प्रधान, अशा विविध प्रकारच्या संगीत नाटकांतून भिन्न-भिन्न प्रकारच्या भूमिका केलेल्या दिसतात.
अरविंद पिळगावकर यांच्या भूमिका असलेल्या काही नाटकांची नावे अशी : ‘घनश्याम नयनी आला’ (सं. यशवंत देव), ‘धाडिला राम तिने का वनी’ (सं. जितेंद्र अभिषेकी), ‘सोन्याची द्वारका’ (सं. जितेंद्र अभिषेकी), ‘संत नामदेव’, ‘भाव तोच देव’, ‘जय जगदीश हरे’, (सं. सी.आर. व्यास), ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ (विश्वनाथ मोरे), ‘दशावतारी राजा’ (अनंत अमेंबल), ‘विठो रखुमाय’ (यशवंत देव) इत्यादी. याशिवाय ‘राया तुम्ही गादीवर बसा’, सुहासिनी मुळगावकरांचे ‘बाई एके बाई’ व पु.ल. देशपांडे यांच्या ‘वार्‍यावरची वरात’ यातूनही कामे केलेली आहेत.
याशिवाय सं. मानापमान, सं. सौभद्र, सं. मृच्छकटिक, सं. संशयकल्लोळ, सं. विद्याहरण, सं. शारदा आदी जुन्या अभिजात संगीत नाटकांतूनही अरविंद पिळगावकर यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर १९९१ साली ‘संयुक्त मानापमान’ या नाटकाला  सत्तर  वर्षे  पूर्ण  झाल्याच्या  निमित्ताने केलेल्या ‘मानापमान’ या नाटकात सूत्रधार, पहिल्या दोन अंकात धैर्यधराची, तर पुढील दोन अंकात लक्ष्मीधराची भूमिका साकारून विक्रमच केला होता.
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे घेतल्या जाणार्‍या साभिनय नाटक-संगीत प्रशिक्षण वर्गात त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. तसेच विद्याधर गोखले प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येणार्‍या नाट्यसंगीत प्रशिक्षण वर्गातही गेल्या काही वर्षांपासून प्रशिक्षक म्हणून सहभाग आहे. ‘नाट्यगान निपुण कला’ हा नाट्य संगीतावर आधारित साभिनय एकपात्री कार्यक्रमही ते सादर करत असत.
रंगभूमीवरील प्रदीर्घ कारकीर्दीच्या निमित्ताने अनेक पुरस्कार- पारितोषिकांचे ते मानकरी ठरले. नानासाहेब फाटक पुरस्कृत ‘गणपतराव जोशी सुवर्णपदक’ (१९८२), अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ‘बालगंधर्व’ पारितोषिक (१९९६), अ.भा. नाट्य परिषदेचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले’ पुरस्कार (२०००), ‘नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल’ पुरस्कार, सांगली (२०१०), महाराष्ट्र शासनाचा ‘अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन पुरस्कार’ (२०१३) इत्यादी पुरस्कारांचा उल्लेख करता येईल.
तरुण पिढीतील संगीत नाटकातील गायकनटांना ते मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी अव्याहतपणे केले. तसेच संगीत नाटकाचे संपादन व दिग्दर्शनही केले आहे . रागदारी संगीताची तालीम व उत्तम ग्रहणशक्ती व स्मृती यामुळे त्यांना अनवट, अप्रचलित रागातील विविध बंदीशी, तसेच नाट्यसंगीताच्या जुन्या-नव्या चाली, नुसत्याच संग्रही नसून कंठोद्गतही आहेत. 

         — माधव इमारते

पिळगावकर, अरविंद गडबडनाथ