Skip to main content
x

पणशीकर,वासुदेवशास्त्री लक्ष्मणशास्त्री

     ‘‘निर्णयसागरच्या माध्यमातून आधुनिक काळात प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या मुद्रणाचे जे महान कार्य संपन्न झालं त्याच्या प्रमुख आधारस्तंभांत वासुदेवशास्त्री पणशीकर होते. संस्कृत विद्येच्या अभ्यासकांवर पं. वासुदेवशास्त्रींचे जे ऋण आहे त्यातून मुक्त होणे कोणालाच शक्य नाही. दोनशेपेक्षाही अधिक ग्रंथांचं संपादन करणं म्हणजे जागतिक कीर्तीचा विक्रमच आहे.’’ असे गौरवोद्वार मराठीतील थोर विचारवंत कै. नरहर कुरुंदकर यांनी काढले आहेत.

     मुुंबईतल्या प्रख्यात निर्णयसागर मुद्रणालयात प्रसिद्ध झालेल्या अनेक संस्कृत ग्रंथांवर ‘पणशीकरोपाह्व विद्वद्वरलक्ष्मणशर्मतनुजनुषा वासुदेवशर्मणा परिष्कृता संस्कृता च।’ अशी विद्वत्तापूर्ण व समासप्रचुर भाषेत संपादकांनी आपली नाममुद्रा उमटवलेले अनेक संस्कृत ग्रंथ अभ्यासकांच्या चांगलेच लक्षात असतील. प्रकाशक निर्णयसागर व संपादक वासुदेवशास्त्री पणशीकर ही ‘द्वयी’ म्हणजे ग्रंथाच्या प्रमाणतेची साक्षच मानली जायची, भारतवर्षातच नव्हे, तर भारताबाहेरही! आजही जाणते संस्कृत अभ्यासक अनेक मुद्रित प्रती उपलब्ध असूनही वा.ल. पणशीकरांनी संपादित केलेल्या आवृत्तीचाच मागोवा घेत अगदी परदेशातूनही भारतात येतात.

     १४ पिढ्यांपासून वैदिक व शास्त्र यांची परंपरा असलेल्या वेदशास्त्रसंपन्न पणशीकर घराण्यात, गोमांतकातील पेडणे या छोट्या गावात वासुदेवशास्त्रींचा जन्म झाला. त्यांचे वडील लक्ष्मणशास्त्री आणि आई सत्यभामाबाई. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता व लहान वयातही विद्याध्ययनाकडे असलेला ओढा लक्षात घेऊन गावातील प्रमुख देशप्रभू कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन त्यांना कोल्हापूरला शिक्षणासाठी पाठविले. तेथे कान्ताचार्य महापण्डितांकडे याज्ञिकीचे व संस्कृत व्याकरणाचे सांगोपांग अध्ययन झाले. अवघ्या २५ व्या वर्षी ते ६ शास्त्रांमध्ये पारंगत झाले. सुप्रसिद्ध साहित्यिक भाऊसाहेब माडखोलकर यांच्या वडिलांनी त्यांना मुंबईत आणले. मुंबईत निर्णयसागर या प्रसिद्ध छापखान्यात ते ‘प्रधानशास्त्री’ म्हणून काम पाहू लागले. मुद्रणकलेचा विकास होत असतानाच वासुदेवशास्त्रींच्या द्रष्टेपणामुळेच भारतभर हस्तलिखितांच्या स्वरुपात विखुरलेले अनेक संस्कृत ग्रंथ हे शुद्ध मुद्रित रुपात संस्कृत अभ्यासकांच्या हाती आले. ग्रंथ संपादन करणे म्हणजे केवळ शुद्धलेखन तपासणे नव्हे तर हस्तलिखितांचे संकलन, उपलब्ध प्रतींच्या पाठभेदांचे संशोधन, कठीण शब्दांचे अर्थ, टीपा व व्याख्या देणे, शास्त्रांच्या आधारे त्रुटींची पूर्तता करणे आणि परिशिष्टे व लेखकांचा परिचय देऊन ग्रंथाची उपयुक्तता वाढविणे म्हणजे ग्रंथसंपादन होय अशी वासुदेवशास्त्रींची धारणा होती. निर्णयसागर या मुद्रणालयाच्या माध्यमातून सातत्याने ५१ वर्षे (१८८५-१९३७) २०० हून अधिक ग्रंथांच्या शुद्धतम व प्रमाणित प्रतींचे देखणे संपादन करून वासुदेवशास्त्री यांनी या प्रती लोकार्पण केल्या. लंडन विद्यापीठातील वाचनालयामध्ये वासुदेवशास्त्री पणशीकरांनी संपादित केलेल्या संस्कृत पुस्तकांचा २ कपाटांचा एक स्वतंत्र विभागच स्थापन केला असून शास्त्रीबुवांच्या ग्रंथसंपदेचे तेथे मोेठ्या गौरवाने जतन केले आहे.

     भगवद्गीता, आश्वलायन गृह्यसूत्र, ऐतरेय आरण्यक, ब्रह्मसूत्रभाष्य, संस्कृत काव्य व नाटके, ललिता सहस्रनाम, योगवासिष्ठ, मनुस्मृति, मीमांसा परिभाषा, गंगालहरी, सिद्धान्त कौमुदी या पंडित वासुदेवशास्त्रींनी संपादित केलेल्या ग्रंथांच्या नामावलीवर नुसता दृष्टीक्षेप जरी टाकला, तरी त्यांचे संपादन करण्यासाठी लागणाऱ्या विद्वत्तेची योग्यता आपल्या लक्षात येईल. एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, भावार्थ रामायण, ज्ञानेश्वरी असे संत साहित्याचेही अत्यंत साक्षेपी संपादन केले. त्यासाठी विशेष अभ्यास करताना वारकऱ्यांचे शिष्यत्वही स्वीकारले. त्यांनी संपादित केलेली पोस्टकार्ड आकारात छापलेली तुकाराम गाथा विशेष लोकप्रिय झाली.

     शास्त्रीबुवांचा शुद्धलेखनाबद्दल कमालीचा आग्रह, त्यामुळे प्रसंगी ८-१० वेळासुद्धा ते प्रुफे तपासत. निर्णयसागरमध्ये त्यांच्या हाताखाली ६ शास्त्री साहाय्यक म्हणून काम करत होते. अलौकिक बुद्धिमत्ता व पराकोटीचे परिश्रम यांमुळे तत्कालीन शास्त्री, वैदिक, पुराणिक व पुरोहित या सर्वांनाच शास्त्रीबुवांच्या कार्याचा लाभ होत होता. सर्वच शाखांच्या विद्वानांचे शास्त्रीबुवा हे श्रद्धास्थानच होते. अनेक मान्यवर त्यांच्याकडे शास्त्रार्थासाठी येत असत, तेव्हा हा शास्त्रार्थ अथवा संवाद कित्येकदा संस्कृत भाषेतच होई.

     त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथांपैकी ९८ ग्रंथांची सूची भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत तर ६९ ग्रंथांची सूची पुणे विद्यापीठात आहे. अनेक ग्रंथ अहमदनगरच्या जैन मंदिरातही उपलब्ध आहेत. पं.वासुदेवशास्त्रींचे वैशिष्ट्य म्हणजे संपादित ग्रंथाच्या प्रारंभी ग्रंथप्रशस्ती व विद्वदभ्यर्थनम् हे दोन्हीही ते काव्यरूपातच रचत असत. शास्त्रीबुवांच्या लांबलचक व पल्लेदार संस्कृत वाक्यरचना यामुळे बाणभट्टाच्या शैलीचीच आठवण होत असे. संपादित ग्रंथाची प्रस्तावना हीदेखील ग्रंथाइतकीच महत्त्वाची असते. शास्त्रीबुवांच्या पांडित्यपूर्ण प्रस्तावनांमुळे हे ग्रंथ विद्वन्मान्य झाले. असे असूनही त्यांनी स्वतंत्र ग्रंथ निर्मिती मात्र केली नाही. नवीन रचनेपेक्षा ‘प्राप्तस्य परिरक्षणम्’ या तत्त्वाने त्यांनी आपली सारी प्रतिभा संशोधनाकरिताच पणाला लावली. कोणत्याही मान-सन्मानाची अथवा प्रसिद्धीची कामना न बाळगता ध्येयासक्तीने ग्रंथ संस्करणाचे व्रत निष्ठेने करीत राहिले. संस्कृत भाषेच्या प्रचारात या ग्रंथांचे मोठेच योगदान आहे.

     ‘ग्रंथसंपादनाच्या व प्रकाशनाच्या रूपाने सरस्वतीची उपासना’ हेच वासुदेवशास्त्रींच्या जीवनाचे उच्चतम ध्येय होते. आपल्या पुढच्या पिढ्यांवर ज्ञानाचेच संस्कार त्यांनी केले. त्यांचे सुपुत्र व्याकरणतज्ज्ञ पंडित विष्णुशास्त्री पणशीकर,नातू - संस्कृत पंडित व ज्योतिर्विद् आबाजी पणशीकर, नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर व महाभारताचे भाष्यकार दाजीशास्त्री पणशीकर यांनी महाराष्ट्रात पणशीकर घराण्याचा ठसा वेगवेगळ्या क्षेत्रांत उमटवला आहे.

    भारतीय संस्कृतीच्या रक्षणार्थ वासुदेवशास्त्रींनी केलेल्या लोकोत्तर कार्याने प्रेरित होऊन व त्यांचे हे कार्य सतत लोकांसमोर राहावे म्हणून नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांना ‘महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान’ ही संस्कृत प्रचाराला वाहिलेली संस्था १९९६ रोजी स्थापन केली. या संस्थेतर्फे २००३ सालापासून संस्कृत भाषेच्या अध्ययनात आणि अध्यापनात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या अमरकोश या ग्रंथाच्या पाठांतरास प्रोत्साहन मिळावे म्हणून अमरकोश पठण स्पर्धा आयोजित केली जाते. गुणवत्तापूर्ण सहभागाबद्दल ‘विद्वद्रत्न वासुदेवशास्त्री पणशीकर स्मृती चषक’ दिला जातो. आजमितीस १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

     वासुदेवशास्त्री पणशीकर हे संस्कृत साहित्याचे प्रकांड पंडित होते व मराठी भाषेवरही त्यांचे जबरदस्त प्रभुत्व होते. अलीकडच्या काळातील एक थोर विद्वान या नात्याने गोमांतकातील विद्वत्परंपरा त्यांनी राखली यात शंका नाही.

तरंगिणी खोत

पणशीकर,वासुदेवशास्त्री लक्ष्मणशास्त्री