Skip to main content
x

पंडित, एकनाथ विष्णुशास्त्री

पं.एकनाथ विष्णुशास्त्री पंडित यांचा ग्वाल्हेर येथे जन्म झाला. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पुण्याजवळच्या चिंचवड या देवस्थानाचे मूळ रहिवासी असणारे पंडित हे कुटुंब ग्वाल्हेरला शिंदे सरकारांकडे देवसेवेत रुजू झाले होते. शिंदे सरकारांच्या वाड्यावर ख्यालाबरोबरच भजनेही गावी लागत असल्याने ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक उ. हद्दू व हस्सू खाँ यांना कीर्तनकार पंडित विष्णुशास्त्री चिंचवडकर हे संस्कृत श्लोक व मोरोपंतांच्या आर्या शिकवत. गोपाळ, गणपत, शंकर व एकनाथ हे विष्णुशास्त्रींचे चारही पुत्र गात असत.

उ.हद्दू खाँसाहेबांनी विशेषत: शंकर पंडित व एकनाथ पंडित यांना गायन शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या मृत्यूनंतर (१८८३) या दोघांना उ.नत्थू खाँची तालीम १८८४ पर्यंत मिळाली. नंतर उ.निसार हुसेन खाँ यांचा १९१६ पर्यंत त्यांना आजीवन सहवास मिळाला. खाँसाहेब १८८६ पासून शंकर पंडितांच्या घरीच राहू लागले. तेथील ब्राह्मणी वातावरण आवडल्याने खाँसाहेबही जानवे घालून शुद्ध शाकाहारी झाले आणि स्वत:स ‘निसारभट्ट’ म्हणवण्यात भूषण मानू लागले. संगीताद्वारे धार्मिक सलोख्याचे हे एक अद्भूत उदाहरण आहे! खाँसाहेब स्वत: संस्कृत श्लोक, अष्टपदी, आर्या गात असत. या तीन उस्तादांच्या तालमीमुळे शंकर पंडित व एकनाथ पंडित हे ग्वाल्हेर गायकीचे मूर्धन्य गायक बनले. पं.एकनाथ पंडित हे गायनाबरोबरच बीन, सतार, पखवाज वादनातही निपुण होते. त्यांनी बीनची तालीम उ.बंंदे अली खाँ व उ.मुशर्रफ खाँ, सतारची तालीम उ.बाबू खाँ आणि पखवाजाचे शिक्षण पं.अग्निहोत्रीबुवांकडून घेतले होते. ते तानपुर्‍यावरही गोटाबीनप्रमाणे वादन करीत असत. नंतर ते मुंबईला स्थायिक झाले. कुष्णराव मुळे, डॉ. ह.ग.मोघे, शरच्चंद्र आरोळकर, भैयासाहेब मावळणकर, शिवरामशास्त्री पिंगळे हे त्यांचे महत्त्वाचे शिष्य होते. एकनाथजींचे पुत्र काशीनाथ, रघुनाथ व सीताराम हेही गायक होते. एकनाथ पंडितांनी पं.वि.ना.भातखंडे यांना ग्वाल्हेर घराण्यातील सुमारे चार-पाचशे बंदिशी ‘क्रमिक पुस्तक मालिका’साठी दिल्याने या घरंदाज बंदिशींचे जतन झाले. मात्र यामुळे त्यांच्यावर घराण्यातीलच काहींचा रोष होता. त्यांचे ग्वाल्हेर येथेच निधन झाले.

चैतन्य कुंटे

पंडित, एकनाथ विष्णुशास्त्री