Skip to main content
x

पंडित, कृष्णराव शंकर

हाराष्ट्राबाहेर ग्वाल्हेर या मराठी संस्थानात राहून घरंदाज गायकी जपणार्‍या कृष्णराव शंकर पंडित यांचा उल्लेख विसाव्या शतकातील ‘संगीत भीष्माचार्य’ म्हणून केला जातो. ग्वाल्हेर येथे पंडित घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते.आपले पिता गायक शंकर पंडित (१८६३ - १९१७) यांच्याकडून कृष्णराव पंडितांना ग्वाल्हेर घराण्याच्या अष्टांग गायकीची तालीम मिळाली. निसार हुसेन खाँसह तत्कालीन अनेक गवैयांचा सहवास त्यांना लाभला. गायनाबरोबर तबला, पखवाज, सतारही ते शिकले. ख्यालासह धृपद, ठुमरी, होरी, टप्पा, तराणा, त्रिवट, चतुरंग, अष्टपदी, भजन इ. प्रकार ते पेश करत. तीनही सप्तकांत सहज व चपळाईने फिरणारा लवचिक आवाज लाभलेल्या पंडितजींच्या गायकीत दमसांसयुक्त आलापचारी, बेहलावा, गमकेच्या बोलताना, दाणेदार सट्ट्याच्या ताना व तालावरची हुकूमतही दिसे. महाराष्ट्रात प्रचलित झालेल्या ग्वाल्हेर घराण्याच्या ख्यालगायकीपेक्षा निराळी, मूलस्रोत मानली जावी अशी जोशपूर्ण व गतिप्रधान गायकी ते गात. त्यांच्या ख्यालगायकीत टप्पा अंग बरेच आढळते. मींड-गमक-बेहलाव्यासह खटका-मुरकी-झमझमा-गिटकडी यांचाही ते प्रचुर वापर करीत.

त्यांनी ३१ जानेवारी १९१४ रोजी ग्वाल्हेर येथे संगीत विद्यालय सुरू केले. वडिलांच्या स्मृतीनिमित्त १९१७ साली त्याचे नामकरण ‘शंकर महाविद्यालय’ असे केले. विद्यालयात संगीत शिक्षणाबरोबरच अनेक नामवंत व शिकाऊ कलाकारांच्या मैफली ‘गुरुवासरीय सभा’मध्ये होत. त्यांनी १९१२ च्या सुमारास स्वत:ची स्वरलिपी निर्माण केली होती व या लिपीतच त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांनी संगीत सरगम सार व हार्मोनिअम शिक्षा- २ भाग (१९२४), संगीत प्रवेश- २ भाग (१९२८), संगीत आलाप संचारी (१९३०), सितार और जलतरंग शिक्षा (१९३३), तबला वादन शिक्षा (१९४१) ही पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी अनेक बंदिशींची रचनाही केली.

१९११-१२ साली सातारा संस्थानने त्यांना राजगायकाचा किताब दिला. त्यांनी १९२५ ते १९३६ या काळात दोनदा ग्वाल्हेर दरबारचे राजगायकपद स्वीकारले व त्यागले. ते १९३६ ते १९४८ या काळात ग्वाल्हेर दरबारचे राजगायक होते.

वयाच्या चौदाव्या वर्षी म्हणजे १९०७ साली पहिली जाहीर मैफल करणार्‍या पंडितजींनी १९८६ साली वयाच्या ९३ व्या वर्षी सार्वजनिक कार्यक्रमांत गायन थांबवले. मुलतानपासून ढाक्यापर्यंत आणि काश्मीरपासून मद्रासपर्यंत भारतभर त्यांच्या यशस्वी मैफली झाल्या. ते १९४० पासून आकाशवाणीसाठी नियमितपणे गायन करू लागले. कोलंबिया कंपनीने १९४८च्या सुमारास त्यांच्या २ ध्वनिमुद्रिका काढल्या, यांत ते दरबारी कानडा, गौडसारंग व भैरवी टप्पा गायले होते. एच.एम.व्ही.ने १९७२ साली त्यांची जयजयवंती, हमीर व काफी टप्पा अशी दीर्घ ध्वनिमुद्रिका काढली. आकाशवाणीनेही त्यांच्या गायनाचे ध्वनिमुद्रण प्रसिद्ध केले आहे. फिल्म डिव्हिजन ऑफ इंडियाने १९८७ साली ‘पंडित कृष्णराव शंकर पंडित’ हा चरित्रपट निर्माण केला. भोपाळ येथील भारत भवन या संस्थेने नोव्हेंबर १९८५ मध्ये ‘कृष्णराव पंडित प्रसंग’ हा महोत्सव केला.

त्यांना सांगीतिक योगदानासाठी अनेक सन्मान लाभले, ते असे- गायक शिरोमणी (१९२१, अखिल भारतीय काँग्रेस, अहमदाबाद), भारत सरकारतर्फे राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय गायक’ किताब (१९५९), सन्माननीय डॉक्टरेट (खैरागढ विद्यापीठ, १९६१), पद्मभूषण (१९७३), शिखर सम्मान (मध्य प्रदेश सरकार,  १९७३), तानसेन सम्मान (मध्य प्रदेश सरकार, १९८०), संगीत रिसर्च अकादमी पुरस्कार (१९८६).

प्रदीर्घ कारकीर्द गाजवणार्‍या पंडितजींचा मोठा शिष्यवर्ग भारतभर पसरलेला होता. त्यांचे पुत्र लक्ष्मण, नारायण, चंद्रकांत, भाचे सदाशिवराव अमृतफळे, केशवराव सुरंगे (व्हायोलिनवादक) तसेच एकनाथ सारोळकर, पांडुरंग उमडेकर, मानवलकर (ग्वाल्हेर), पुरुषोत्तम व रामचंद्र सप्तर्षी (दिल्ली), नारायण जोशी (कानपूर), विश्वनाथ रिंगे (इंदूर), शरच्चंद्र आरोळकर, गोपाळराव पटवर्धन (मुंबई), सुमन चौधरी, दत्तात्रेय पनके (अमरावती), केशवराव राजहंस (नागपूर), गोविंदराव कुलकर्णी (जळगाव), काशीनाथ तुळपुळे इ. त्यांचे मुख्य शिष्य होत. ग्वाल्हेर येथे वयाच्या शहाण्णवव्या वर्षी वृद्धापकाळ व न्यूमोनियाने या गानमहर्षीचे निधन झाले.

           — चैतन्य कुंटे

पंडित, कृष्णराव शंकर