Skip to main content
x

पंडित, साबानंद मोनप्पा

         राजा रविवर्मा यांच्यानंतर भारतीय पौराणिक प्रसंगांवर आधारित नयनमनोहर व वास्तववादी शैलीतील चित्रांचा आनंद घराघरांत जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे  चित्रकार म्हणून सांबानंद मोनप्पा ऊर्फ एस.एम.पंडित ख्यातनाम आहेत. त्यांच्या आईचे नाव काळम्मा होते. कर्नाटकातील गुलबर्गा या गावी त्यांचा जन्म झाला. कुटुंबाचा वडिलोपार्जित व्यवसाय तांबटाचा होता. त्यामुळे कष्टामय जीवन व अत्यंत गरिबी होती. 

         एकदा पाणी घेऊन येताना काळम्मा आईच्या घड्यात पंडित कुटुंबाचे गुरू पूज्य लच्छत सिद्धप्पा महाराजांनी चिमूटभर विभूती घातली आणि आशीर्वाद दिला, की ‘तुझ्या पोटी असा कीर्तिवान पुत्र जन्माला येईल, की त्याच्या डोक्यावर जितके केस असतील त्यापेक्षा अधिक संख्येने तो काम करेल!’ एस.एम.पंडितांच्या आयुष्यातील एकंदरीत चित्रकृतींची संख्या लक्षात घेतली तरी वरच्या विधानाला पुष्टी मिळेल असे वाटते.

         त्या काळी गुलबर्गा हे हैद्राबादच्या निजामशाहीत होते. पंडितांचे शालेय शिक्षण इयत्ता चवथीपर्यंत उर्दू भाषेत झाले. घरच्या गरिबीमुळे त्यानंतर पंडितांचे शालेय शिक्षण झाले नाही. गुलबर्ग्यातील घराजवळ एक नाटक-सिनेमाचे थिएटर होते. त्या थिएटरमध्ये पडेल ते लहान-मोठे काम पंडित करीत. तिथे पडदे रंगविण्यास ते मदत करू लागले व त्यांना चित्रकलेत गोडी निर्माण झाली.

         बालपणी पंडितांनी दिव्याच्या काजळीचा वापर करून स्केचिंग केल्याचे सांगतात. लहानपणी त्यांनी पहिले तैलरंगातले चित्र आजोबांच्या धोतराच्या तुकड्यावर रंगविले होते. त्याकरिता कुण्या एका चित्रकाराने पिळून फेकलेल्या रंगांच्या ट्यूब्स त्यांनी जमा करून वापरल्या होत्या.

         त्या काळात बिदरचे कलाशिक्षक साठे मास्तरांनी पंडितांचे काम पाहून त्यांना मार्गदर्शन केले. तसेच, वडील मोनप्पांचे मित्र व गुलबर्ग्यातील कला प्रशिक्षक  शंकरराव आळंदकर यांनी पंडितांना मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पाठविण्याचा सल्ला दिला.

         चित्रकलेच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांना मुंबईला पाठविण्यास वडील तयार नव्हते आणि तशी त्यांची आर्थिक स्थितीही नव्हती. परंतु पंडितांची बालपणापासूनची चित्रकलेची जिद्द पाहून पंडितांच्या आत्येने आपल्या सोन्याच्या बांगड्या सराफाकडे गहाण ठेवल्या आणि सांबानंद पंडितांची मुंबईला जाण्याची व्यवस्था केली.

         एस.एम.पंडितांना सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळाला नाही, तरी पंडितांनी दंडवतीमठ यांच्या नूतन कला मंदिरात प्रवेश मिळविला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिकू लागले.

         तो काळ वास्तववादी (रिअॅलिस्टिक) चित्रशैलीचा होता. याशिवाय चित्रपटगृहाच्या बाहेर लागणारी बॅनर्स, नाटकांचे पार्श्‍वपडदे (बॅकड्राप्स), सेटवरील निसर्गदृश्ये रंगविण्यासाठी वास्तववादी शैलीत पारंगत असलेल्या चित्रकारांची भरपूर आवश्यकता असे. कलाशिक्षणाबरोबर मुंबईत उपजीविकेकरिता, १९३५ मध्ये ते गिरगावातील एम.बी.सोटकर यांच्या बॅनर कंपनीत कामे करू लागले. दिवसा नोकरी आणि सायंकाळी नूतन कला मंदिरात चित्रकलेचे शिक्षण असा त्यांचा नित्यक्रम होता.

         पंडितांनी १९३६ मध्ये सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टची परीक्षा बाहेरून दिली आणि पंडित विशेष प्रावीण्याने (डिस्टिंक्शनने) शासकीय कला पदविका (जी.डी.आर्ट) उत्तीर्ण झाले. जे.जे. स्कूलमधील के.भ.चुडेकर मास्तर आणि अधिष्ठाता कॅ.डब्ल्यू.ई. ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी पंडितांच्या कामाची वाखाणणी केली.

         पुढे एस.एम.पंडित, रतन बात्रा यांच्या स्टुडीओत काम करू लागले. याच काळात त्यांनी ‘फिल्म इंडिया’ या मासिकाच्या मुखपृष्ठासाठी चित्रे रंगविली. टोरॅन्टो (कॅनडा) येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात  पंडितांनी रंगविलेल्या मुखपृष्ठचित्र संकल्पनेला (कव्हर डिझाइन) १९४६ मध्ये विशेष पारितोषिक प्राप्त झाले.

         आपल्या चित्रकलेच्या कारकिर्दीला दोन बाबूरावांच्या संपर्काने विशेष कलाटणी मिळाली असे पंडित सांगत. एक म्हणजे बाबूराव पटेल आणि दुसरे बाबूराव धनवटे. ‘फिल्म इंडिया’चे संपादक असलेल्या बाबूराव पटेलांनी मासिकाची सर्व मुखपृष्ठे एस.एम. पंडितांनीच रंगवावीत असा करार केला. त्यामुळे सिने जगतात त्यांची अनेक चित्रे गाजली. तसेच, नागपूरचे बाबूराव धनवटे यांचा खूप मोठा ऑफसेट प्रेस होता. त्यांनी पंडितांना कॅलेण्डर्सकरिता धार्मिक चित्रे रंगविण्याचा आग्रह केला. ही सर्व चित्रे पंडितांनी आपल्या स्वतंत्र शैलीत अपारदर्शक जलरंगांत (पोस्टर कलर्स) रंगविली.

         यापूर्वी पोस्टर कलर्स हे केवळ जाहिरात क्षेत्रात सपाट, पारदर्शक (फ्लॅट) रंगपद्धती आणि अपारदर्शक (ओपेक) रंगपद्धतीने रंगविण्याकरिता वापरले जात. पंडितांनी हेच रंग रंगचित्र (पेंटिंग) पद्धतीने पारदर्शक-अपारदर्शक या दोन्ही रंगपद्धतींचा अवलंब करून वापरले व चित्रे रंगविली. त्यांच्या या रंगपद्धतीने दिनदर्शिकांच्या (कॅलेण्डर) क्षेत्रात फार मोठी क्रांती घडविली. पंडितांपासून स्फूर्ती घेऊन अनेक चित्रकार या क्षेत्रात काम करू लागले. त्यामुळेच एस.एम. पंडितांना भारतातील आधुनिक काळातील ‘सर्जनशील कॅलेंडर आर्टचे जनक’ असे म्हणू लागले.

         त्यानंतर दक्षिणेतील शिवकाशी प्रेसमध्ये त्यांची अनेक चित्रे छापली जाऊ लागली. त्यांच्या छापील चित्रांचे अनेक चित्रकारांनी अनुकरण केले. रामायण, महाभारत, तसेच कालिदासाच्या महाकाव्यावर आधारित अशा अनेक विषयांवर त्यांनी चित्रे काढली. त्यांच्या चित्रशैलीवर पाश्‍चिमात्य प्रभाव असला तरी ही चित्रे कुठल्या अन्य चित्रांची अनुकरणे नव्हती, तर पंडितांच्या विचारांतून आणि चिंतनातून ती स्वतंत्रपणे साकारलेली होती. ‘वनवासातील राम-सीता’ हे त्यांचे खूप गाजलेले चित्र. हे चित्र त्यांनी सर्व हक्कांसकट पार्ले कंपनीला दिले. कंपनीने या चित्रांच्या ६० हजार प्रती काढल्या आणि त्या विकून खूप पैसा मिळवला. हे कळल्यावर पंडितांना आपल्या कलेची व्यावसायिक किंमत कळली.   

         साधारणपणे १९६५-१९७० पर्यंत त्यांनी विविध विषयांवर काम केले. याच काळात त्यांनी सिनेक्षेत्रासाठी व प्रामुख्याने व्ही. शांताराम यांच्यासाठी शो कार्ड डिझाइनचे कामही केले. त्यांनी त्या काळात रंगविलेल्या चित्रांतील रंगांचा तजेलदारपणा आजही शाबूत दिसतो.

         सुटाबुटांत वावरणारे एस.एम.पंडित १९६५ नंतर एकाएकी बदलले. त्यांना कालीमातेचा दृष्टान्त झाल्याचे ते सांगत. ते कालीमातेचे भक्त होते. गुलबर्गा येथील कालीमातेच्या एका जुन्या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. आपल्या तोपर्यंतच्या मिळकतीचा फार मोठा भाग त्यांनी या मंदिराच्या पुनर्बांधणीत खर्ची घातला. पांढरीशुभ्र दाढी, मागे केसांचा बुचडा, भुवयांच्या मधोमध कुंकू लावलेले आणि धोतर नेसलेले, एस.एम.पंडित हे एखाद्या तपस्व्यासारखे भासत. चित्रकलेबरोबर ज्योतिष, हस्तसामुद्रिकशास्त्राचीही त्यांना विशेष आवड होती.

         कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकाकरिता एकनाथजी रानडे यांनी पंडित यांना स्वामी विवेकानंदांचे चित्र रंगविण्यास सांगितले. त्यांनी विवेकानंदांचे गुरू स्वामी रामकृष्ण परमहंसांचे आणि शारदामातेचे व्यक्तिचित्र प्रथम रंगविले. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, गुरू रामकृष्णांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने त्यांना विवेकानंद साकार करावयाचे होते.

         हे चित्र साकारताना पंडितांनी एकांतवास पत्करून वांद्रे येथे विवेकानंदांचे ५ x ८ फुटांचे भव्य चित्र रंगविले. स्वामी विवेकानंदांची हाताची घडी हे सर्वसाधारणपणे आढळणारे चित्र. परंतु पंडितांनी ती हाताची घडी सोडविली व ‘योद्धा संन्यासी’ ही स्वामी विवेकानंदांची त्यांनी रंगविलेली प्रतिमा कमालीची लोकप्रिय ठरली. याच चित्राचा आधार घेऊन शिल्पकार सोनावडेकर यांनी बनविलेले शिल्प आज कन्याकुमारी येथील स्मारकात आपण पाहतो.

         त्यांना १९८६ नंतर दृष्टिदोषामुळे जलरंगातले अधिक बारकावे दाखविणारी चित्रे रंगविणे कठीण वाटू लागले. त्यानंतर त्यांनी मोठ्या आकारात, कॅन्व्हसवर तैलरंगात काम करण्यावर भर दिला.

         पंडितांनी चित्रांतील मनुष्याकृतीं-करिता प्रतिकृतींचा (मॉडेल्स) वापर कधी केला नाही असे ते म्हणत. पाश्‍चात्त्य चित्रकार-शिल्पकार मायकेल अँजेलो, पीटर पॉल रूबेन्स हे त्यांचे आदर्श होते. त्यांच्या चित्रांतील मनुष्याकृतींच्या शरीरसौष्ठवतेचा पंडितांच्या चित्रांवर प्रभाव दिसून येतो. विश्‍वामित्र, शंकर, राम, कृष्ण आदी  देवादिकांच्या मनुष्याकृती पीळदार देहयष्टीच्या असल्या तरी त्यांत रोमन शिल्पकलेतील शरीरप्रमाण-बद्धता न दिसता भारतीयता सहजरूपाने आढळते हे विशेष.

         धार्मिक विषयांवर आधारित चित्रांप्रमाणेच पंडितांचे व्यक्तिचित्रणावरही विशेष प्रभुत्व होते. जरी बहुतांश व्यक्तिचित्रे  त्यांनी उपलब्ध छायाचित्रांच्या आधारे रंगविली, तरी त्यांत छायाचित्रांचे केवळ अनुकरण नसे, तर ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर असल्याप्रमाणे ते व्यक्तिमत्त्व साकार करीत. मुंबईच्या न्यू काउन्सिल हॉलमधील महात्मा गांधींचे व्यक्तिचित्र, पुण्याच्या आगाखान पॅलेसमधील भगवान बुद्ध, महात्मा गांधी आणि कस्तुरबांचे तैलचित्र ही विशेष उल्लेखनीय होत. याशिवाय स्वा. सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, गायत्री, अॅन्थनी मस्कारेन्हास, मार्गारेट थॅचर, श्रीमती इंदिरा गांधी, अशीही अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी रंगविली आहेत.

         लंडनमधील फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या वेळी पंडित यांनी १९८२ मध्ये स्वराज पॉल यांच्या सांगण्यावरून  श्रीमती इंदिरा गांधी आणि मार्गारेट थॅचर यांची व्यक्तिचित्रे  रंगविली. ती विशेष गाजली. ती दोन्ही चित्रे लंडनमधील भारतीय वकिलातीत आणि कॉमनवेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये लावली आहेत. लंडन येथे १९७८ मध्ये त्यांचे पहिले चित्रप्रदर्शन झाले. त्या वेळी लंडनमधील ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट’चे ‘फेलो’ म्हणून पंडित  यांंचा गौरव करण्यात आला.

         सोलापूर येथे १९८१ मध्ये भरलेल्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. एस.एम.पंडितांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनातील एका दालनात त्यांची २७ रंगचित्रे (पेन्टिंग्ज) आणि ४० रेखाचित्रे (ड्रॉइंग्ज) मांडली होती. या चित्रप्रदर्शनाला सोलापूरसारख्या शहरात माणसांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीतही त्यांच्या चित्रांना १९९१ मध्ये असाच प्रचंड प्रतिसाद मिळाला.

         कर्नाटक ललित कला अकादमीने १९८३ मध्ये त्यांचा सत्कार केला. ‘कर्नाटक राज्य उत्सव प्रशस्ती’ देऊन १९८४ मध्ये त्यांचा विशेष सन्मान केला गेला. गुलबर्गा विद्यापीठाने त्यांना १९८६ मध्ये ‘डी. लिट.’ ही पदवी बहाल केली.

         पंडितांच्या प्रथम पत्नीचे नाव नलिनी व द्वितीय पत्नीचे नाव राजलक्ष्मी होते. शेवटची पाच-सहा वर्षे पंडितांचा शारीरिक आजार बळावत गेला तरी त्यांची कलासाधना अविरत चालू होती. याच काळात त्यांनी महाभारतातील कर्णार्जुन युद्धाचे ६ x ८.५ फुटांचे चित्र रंगविले होते. ‘विश्‍वामित्र-मेनका’ या विषयावरील त्यांची तैलचित्रे इतकी गाजली, की पंडितांनी जणू त्यांच्या या चित्रांमधून ‘अप्सरा’ ही संकल्पनाच जनमानसात रुजवली.

         ‘दिनदर्शिका आणि देवादिकांची आकर्षक चित्रे रंगविणारे चित्रकार’ म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली. आधुनिक चित्रकलेच्या प्रवाहात एस.एम.पंडितांची गणना होत नसली तरी नवकलेतील प्रयोग ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत. मात्र, ‘‘जग बदलते आहे म्हणून माझी चित्रे मी बदलावीत असं मला वाटत नाही. दुसर्‍याला आनंद देणं, त्यांना त्यांची दुःखं विसरायला लावणं हे कलेचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि मला वाटतं, माझी चित्रं लोकांना आनंद देतात, ते उद्दिष्ट साध्य करतात,’’ असे पंडित म्हणत.

         त्यांच्याकडे येणाऱ्या नवोदित कलाविद्यार्थ्यांंना ते रेखांकनावर विशेष भर द्यायला सांगत. पंडितांना एकदा ‘मॉडेल्स’चा वापर करता का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘मी मॉडेल्सच वापरत नाही. मी कालीमातेचा उपासक आहे. चित्र काढण्यापूर्वी मी ध्यानस्थ बसतो; मनन, चिंतन करतो... मौन धारण करतो. मला ज्याचं चित्र काढायचं असतं, ती मूर्ती मला डोळ्यांसमोर दिसते. मी ती मूर्ती मनात साठवून ठेवतो आणि मगच कॅनव्हासला ब्रश लावतो...’’

         यातला आध्यात्मिक भाग बाजूला ठेवला तरी एक गोष्ट नक्की, की एस.एम. पंडित यांची चित्रे त्यांच्या चिंतनातूनच साकार झाली. कलाकाराने सतत चिंतन करत राहावे. त्यातूनच त्याची सर्जनशक्ती आणि कलानिर्मिती वृद्धिंगत होते हे त्यांनी दाखवून दिले.

         २५ मार्च १९९३ चा एस.एम. पंडितांचा सत्त्याहत्तरावा वाढदिवस रुग्णालयामध्येच साजरा झाला. त्या वेळीदेखील त्यांनी श्रद्धेने देवीचे चित्र रेखाटले. ही त्यांची अखेरची कलाकृती असावी.

- वासुदेव कामत

संदर्भ
संदर्भः १. सडवलेकर, बाबूराव; ‘महाराष्ट्रातील कलावंत’. २. परांजपे, रवी; ‘चित्रसरोवरातील राजहंस’; दैनिक ‘सकाळ’; ८ एप्रिल १९९३. ३. सडवेलकर, बाबूराव; ‘तपस्वी पंडित’; ‘आज दिनांक’, पंचम; १० एप्रिल १९९३. ४. ‘ईश्‍वरी लेणे लाभलेले कलामहर्षी एस.एम. पंडित’; दैनिक ‘सामना’; ३० मार्च १९९७. ५. पंडित, एस.एम. (१९१६-१९९३); कॅटलॉग. ६. डॉ. एस.एम. पंडित यांचे सुपुत्र श्री. कृष्णराज पंडित यांच्याशी बातचीत.
पंडित, साबानंद मोनप्पा