पंडित, शिवाजी अंकुश
शिवाजी अंकुश पंडित यांचा जन्म बीड जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गेवराई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अंकुश रंभाजी पंडित होते तर आईचे नाव कृष्णादेवी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण औरंगाबादमधील मराठा विद्यालयात झाले. तर माध्यमिक शिक्षण गेवराईमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्यांनी औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी बी.ए.ची पदवी मिळविल्यानंतर औरंगाबाद विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला परंतु पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर घरच्या जबाबदारीमुळे शिक्षण अर्धवट सोडून शेती व्यवसायास प्रारंभ केला करावा लागला.
पंडित यांचा विवाह 10 मे 1961 रोजी शारदाबाईंशी झाला. त्याकाळी गेवराई तालुका हा मागासलेला होता. त्याचा विकास घडवून आणण्यासाठी पंडित यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रोत्साहनाने जायकवाडीच्या उजव्या कालव्याचे पाणी आपल्या गावात आणले व ऊस उत्पादनात वाढ केली. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथे जयभवानी सहकारी साखर कारखाना मर्या.ची स्थापना 1978 मध्ये केली. गेवराई तालुका हा कापूस उत्पादनात अग्रेसर असल्यामुळे तेथेच कापसावर प्रक्रिया व्हावी या उद्देशाने त्यांनी 1992 मध्ये माऊली सहकारी सूतगिरणी कोल्हेरेची स्थापना केली. कापूस उत्पादक प्रक्रियेमध्ये गेवराई तालुका अग्रेसर होता. या सूतगिरणीत एकूण 38 जिनिंग-प्रेसिंग यंत्रे आहेत. शेतकर्यांची उत्पादन घेताना होणारी आर्थिक अडचण लक्षात घेऊन कर्ज वितरण करण्याासठी पंडित यांनी 1995 मध्ये भवानी अर्बन को-ऑप. बँक मर्या. ची स्थापना गेवराई येथे केली. त्यामुळे तेथील उद्योग विकासाला चालना मिळाली. तर शेतकर्यांची व्यापार्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी त्यांनी गेवराई येथील कृषी उत्पादन बाजार समितीला मार्गदर्शन केले.
शेतकर्यांना उत्पादन घेण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, हे जाणून पंडित यांनी भेंड येथे जयभवानी उपसा जलसिंचन मर्या. या संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे कालव्याच्या माध्यमातून त्यांनी पाईप लाईनद्वारे गावात पाणी आणले व शेतकर्यांची पाण्याची अडचण दूर केली. तसेच गोदावरी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार स्थापन करून माफक दरात शेतकर्यांना खते व बी-बियाणे उपलब्ध करून दिले. त्यासाठी त्यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर इफ्कोशी करार केला.
गेवराई तालुक्यातील विद्यार्थ्याची गैरसोय टाळण्यासाठी पंडित यांनी गेवराई तालुक्यात 18 विद्यालये, 3 वरिष्ठ महाविद्यालये व 1 कृषी विद्यालय स्थापन केले. तसेच शिवशारदा ही इंग्रजी माध्यमाची शाळा वसतिगृहातसह उभारली. पंडित यांची 1962 मध्ये गेवराई तालुका पंचायत समितीच्या सभापती निवड करण्यात आली. त्यांनी 1972 मध्ये सभापती पदावरून पायउतार झाल्यानंतर बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले. दहा वर्षे पंचायत समितीचे व पुढे आठ वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी तालुका व जिल्हा यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न केले.
पंडित यांचा रघुनाथदास भगवानदास अटल महाविद्यालयाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांनी सदर महाविद्यालयाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. तसेच त्यांनी जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यातही पुढाकार घेतला होता. या संस्थेमार्फत गळी, मालेगाव व गेवराई येथे शाळा चालवल्या जात आहेत. पंडित मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य होते. या संस्थेमार्फत गेवराई विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय स्थापन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी 1974 मध्ये गौरीपुराच्या परिसरात जय भवानी सहकारी साखर कारखाना उभारला. ते या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांची फेब्रुवारी 1978 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवड झाली तर मार्च 1991 मध्ये त्यांची फेरनिवड झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्च 1991 मध्ये झालेल्या निवडणुकीत पंडित यांची संचालक व अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
पंडित यांना अमरसिंह, जयसिंह व विजयसिंह असे तीन सुपुत्र असून अमरसिंह हे सध्या जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
- अमृत डावकर