Skip to main content
x

पोहनेरकर, नरहर शेषराव

    नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म परळी-वैजनाथ येथे झाला. जुन्या काळच्या रीतीप्रमाणे बाराव्या वर्षीच त्यांचे लग्न झाले. दारिद्य्र साथीला असल्यामुळे शिक्षणाची वाटचाल त्यांना स्वतःची स्वतःच करावी लागली. हैद्राबाद येथील वास्तव्यात मॅट्रिकची परीक्षा अनेकदा देऊनही ते उत्तीर्ण झाले नाहीत. त्यांनी मराठी भाषेचा स्वतंत्र अभ्यास सुरू केला. पोहनेरकरांचा जीवनक्रम सरळ मार्गाने गेला नाही. नांदेड जिल्ह्यात मुखेड येथे त्यांनी पिठाची गिरणी चालविली. येथपासून त्यांनी अनेक खटपटी केल्या. मराठीचे स्वयंभू आणि स्वयंसिद्ध उपासक असलेल्या पोहनेरकरांना माणसे गोळा करणे, मराठीच्या उपासनेसाठी त्यांना प्रेरित करणे आणि मराठीच्या सर्व दालनांत सोयीनुसार खेळ मांडणे ह्याची अखंड हौस होती. स्वामी रामानंदांच्या हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेतही ते होते.

     निजामाच्या मुसलमानी राज्यातील राजधानी हैद्राबाद येथे राहून पोहनेरकर मराठी भाषेच्या परीक्षांची केंद्रे चालवीत असत. हैद्राबाद संस्थानातील ज्या भाड्याच्या जागेत ते राहत होते, तेथे  मित्र आणि विद्यार्थी ह्यांची अखंड वर्दळ असल्यामुळे त्या जागेला लोकांनीच ‘मराठवाडी’ नाव दिले. त्याचेच  व्यापक रूप म्हणजे आजची ‘मराठवाडा साहित्य परिषद’ होय. डावरे हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना पोहनेरकरांनी ‘प्रोफेसर’ नावाचे हस्तलिखित सुरू केले. चरितार्थासाठी एकीकडे विविध उद्योगांत त्यांनी हात घातला. गडकर्‍यांचे ‘राजसंन्यास’ नाटक पूर्ण करून त्याचे यशस्वी प्रयोग केले. हैद्राबादहून १९३०पासून ‘निजामविजय’ नावाचे एकमेव साप्ताहिक निघत असे. पोहनेरकरांनी त्यात लेख लिहिले. प्रा. नरहर कुरुंदकरांच्या शब्दांत, ‘पोहनेरकर प्रामुख्याने मराठी सारस्वताचे व अनुवंशाने सगळ्याच प्राचीन इतिहासाचे संशोधक आहेत. त्यात प्राचीन प्रकाशित साहित्याचे संपादन, संशोधन आहे. त्याप्रमाणे ताम्रपट, शिलालेखांचेही संशोधन, संपादन आहे.’ मराठवाडा गुलामगिरीतून मुक्त झाल्यावर शासनाने पोहनेरकरांची नियुक्ती विधानसभेचे ग्रंथपाल म्हणून झाली. १९५६ साली त्यांना औरंगाबादच्या पुरातत्त्व खात्यात नोकरी मिळाली.

     ‘दासोपंत पासोडीचे प्रकाशन आणि भावार्थ रामायणाच्या चिकित्सक प्रतीची सिद्धता’ ही त्यांची भरीव व महत्त्वपूर्ण कामगिरी होय. संशोधनाबरोबरच त्यांनी व्यक्तिरेखा, पोवाडे, कविता, निबंध, लघुकथा लिहिल्या. ‘कैलासाचा कलावंत’ या उतारवयात लिहिलेल्या कादंबरीत पोहनेरकरांनी इतिहास आणि स्वप्नरंजन यांच्या सीमेवर वावरणारी कथा आपल्या समृद्ध आणि सहज प्रासादिक भाषेत सादर केली आहे. ‘बागशाही’ हा त्यांचा कवितासंग्रह आहे. ‘विरलेल्या गारा’ या संग्रहातील व्यक्तिचित्रे त्या काळी गाजली.

     १९६१ मध्ये ज्या नवव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पोहनेरकरांना केले होते, त्यातली एक बाब इतकी खास होती की ती दुसर्‍या कोणत्याही संमेलनात घडली नाही. संमेलनाध्यक्ष पोहनेरकर उद्घाटन वेळेच्या पूर्ण दोन तास आधी मंडपात आले होते आणि सतरंज्या टाकण्यापासून कार्यक्रमपत्रिका तयार करेपर्यंत सारी कामे ते करीत होते. तत्पूर्वी १९५५ मध्ये परळी-वैजनाथ येथे भरलेल्या ग्रंथालय शाखा संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पुरातत्त्व खात्यात असताना ते संपूर्ण मराठवाडा पायी फिरले. त्यांनी ताम्रपट, शिलालेख, दानपत्रे, ऐतिहासिक कागदपत्रे, हकीकतनामे, संहिता मिळविल्या. इतरांना कटकटीचे व जिकिरीचे वाटणारे हे काम त्यांनी चिकाटीने, निष्ठेने व हौसेने केले हेच त्यांचे कौतुक!

     - वि. ग. जोशी

पोहनेरकर, नरहर शेषराव