Skip to main content
x

परांजपे, वसंत वासुदेव

        भारताच्या चीनबरोबरच्या परराष्ट्रधोरणावर स्वातंत्र्यानंतर साधारणत: अडीच दशके महत्त्वपूर्ण ठसा उमटवणारे मराठी अधिकारी म्हणजे वसंत वासुदेव परांजपे. वसंत परांजपे यांचे शालेय शिक्षण पुणे येथे झाले. मॅट्रिकमध्ये त्यांना ‘जगन्नाथ शंकरशेठ’ शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. बी.ए.ला असताना त्यांना ‘भाऊ दाजी लाड’ शिष्यवृती मिळाली. व्याकरण या विषयात पुणे विद्यापीठातून एम.ए. करत असताना ते प्रथम श्रेणी मिळवून विद्यापीठात प्रथम आले.

       भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ व्हावेत या उद्देशाने पंडित नेहरू यांनी विद्यार्थी एक्स्चेंज कार्यक्रम तयार केला. या कार्यक्रमांतर्गत चीनमध्ये विविध विषयांचे शिक्षण घेण्यासाठी दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार होती. परांजपे यांना चीनमधील बौद्धधर्माचा अभ्यास करायचा होता. म्हणून ही शिष्यवृत्ती मिळवून ते १९४६ ते १९५० या कालावधीत चिनी भाषा अभ्यासण्यासाठी चीनला गेले. या कालावधीत त्यांनी चिनी भाषा, संस्कृती, बौद्ध धर्म या विषयांचा सखोल अभ्यास केला. भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन त्यांनी चीनची राजधानी पेकिंग येथे साजरा केला.

       १९५४ मध्ये इंडोनेशियामधील बांडुंग येथे झालेल्या आफ्रिकी आणि आशियायी देशांच्या बांडुंग परिषदेमध्ये पंडित नेहरू परांजपे यांना दुभाषी म्हणून घेऊन गेले. परांजपे यांचे चिनी भाषेवरील प्रभुत्व पाहून पंडित नेहरू प्रभावित झाले आणि त्यांनी परांजपे यांची भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये नियुक्ती केली. पंतप्रधान नेहरू आणि चिनी पंतप्रधान चाऊ एन लाय यांच्या अनेक चर्चांचे ते साक्षीदार होते.

       भारत-चीन संबंध अत्यंत कठीण प्रसंगातून जात असताना परांजपे चीनमध्ये राजदूत होते. चिनी, चिनी भाषा, संस्कृती यांवर त्यांचा अभ्यास होता. चीनबद्दल त्यांच्या मनात जिव्हाळा होता. त्यामुळेच त्यांनी राजदूत पदाच्या संपूर्ण कारकिर्दीत चीन-भारत संबंध सुधारावेत यासाठी कसोशीने प्रयत्न केले. पुढे भारत-चीन या दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडले तरीही परांजपे यांची त्यांच्या चीनमधील मित्रांशी असणारी मैत्री टिकून राहिली.

        त्यांच्या चिनी मित्रांमध्ये ते ‘बाई चून हुई’ या नावाने प्रसिद्ध होते, तर पंडित नेहरू आणि चिनी नेते त्यांना खासगीत ‘पाय’ असे संबोधत. १९५१ पासून परराष्ट्र सेवेमध्ये त्यांनी अंडर सेक्रेटरी, सहसचिव, उपसचिव अशा विविध पदांवर काम केले. कंबोडिया येथील इंटरनॅशनल कमिशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. १९७७ ते १९७८ या कालावधीत परांजपे इथिओपियामध्ये राजदूत होते, तर १९७८ ते १९८१ या कालावधीत ते दक्षिण कोरियातील पहिले भारतीय राजदूत होते.

        १९८८ मध्ये राजीव गांधी यांच्या चीन दौऱ्याच्या वेळी सेवानिवृत्त असतानाही परांजपे यांनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानादेखील ते त्यांचे दुभाषी म्हणून काम करत असत. १९८२ मध्ये ते परराष्ट्रसेवेतून निवृत्त झाले. त्यानंतरही त्यांचा चीनविषयीचा अभ्यास सुरूच राहिला.भारतात परतल्यावर ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

         निवृत्तीनंतर काही वर्षांनी ते पुणे येथे स्थायिक झाले. पुणे शहरातील वयोवृद्धांसाठी उभारण्यात आलेल्या ‘अथश्री’ प्रकल्पातील ते पहिले रहिवासी होते. भारत-चीन राजनैतिक संबंधांना २०१० मध्ये ६० वर्षे पूर्ण झाली, त्या वेळी दिल्ली येथील चिनी दूतावासाने त्यांना आवर्जून आमंत्रण दिले होते. प्रकृती ठीक नसूनदेखील या कार्यक्रमात ते उत्साहाने सहभागी झाले. पुणे येथे त्यांचे निधन झाले.

- संपादित

परांजपे, वसंत वासुदेव