Skip to main content
x

प्रभुणे, रामकृष्ण गोविंद

     डॉ. रामकृष्ण गोविंद प्रभुणे ह्यांनी शिक्षण मंडळ, कराड या संस्थेच्या शाळांमधून उपशिक्षक, त्यानंतर पर्यवेक्षक म्हणून काम केले. कराडच्या टिळक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून नऊ वर्षे ते कार्यरत होते. या सर्व काळात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रभुणे यांंनी अनेक शैक्षणिक प्रयोग केले. सध्या ते शिक्षण मंडळ संस्थेचे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत.

     डॉ. प्रभुणे यांनी शाळेत विद्यार्थ्यांसाठी जे अभिनव प्रयोग राबविले त्यातील एक म्हणजे ‘दानकलश योजना’. आपल्या गरजू विद्यार्थ्यांना आपणच मदत करूया. या भावनेतून प्रत्येक विद्यार्थ्याने किमान १ रु. व शिक्षकाने १० रु.  कलशात जमा केले. गरजू विद्यार्थ्यांना गणवेष व शैक्षणिक साहित्य समारंभपूर्वक देण्यात आले. पालकांच्यावरही याचा परिणाम होऊन तेही या धर्मकलशात सामील झाले. गेली दहा वर्षे हा प्रयोग कार्यान्वित आहे व शेकडो गरजू विद्यार्थ्यांना लक्षावधी रुपयांचे साहाय्य देण्यात आले.

     असाच दुसरा उपक्रम म्हणजे ‘जडणघडण’. थोर पुरुषांचे जीवन अभ्यासण्याची संधी मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली. यशवंतराव चव्हाण, वि. स. पागे, उद्योगपती रावसाहेब गोगटे या सारख्या टिळक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना भेटून मुलांनी त्यांच्याकडूनच ते कसे घडले जे जाणून घेतले. विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा ‘जडण-घडण’ प्रकल्प ग्रंथरूपाने प्रकाशित केला. याशिवाय अर्धनिवासी गुरुकुलातील शिबिरात विविध क्षेत्रातल्या कर्तबगार व्यक्तींच्या मुलाखती यातून आपले व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे याचे शिक्षण दिले.

     स्थल भेटीतून गाव कसे समजावून घ्यावे हे शिकण्याची संधी मुलांना दिली. प्रभुणे शिक्षण क्षेत्रातील संशोधक आहेत. शिवाजी विद्यापीठातून ‘प. पू. साने गुरुजी यांच्या वाङ्मयाचा शैक्षणिक दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास’ हा प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली. या संशोधन प्रकल्पास शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट संशोधन प्रकल्पाचा पुरस्कार मिळाला आहे. या ग्रंथाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. संदर्भ ग्रंथ म्हणूनही तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘अभिनयातून आत्माविष्कार’ व ‘मातृभाषेच्या अध्यापकाची भूमिका’ या त्यांच्या दोन शोधनिबंधांना पुरस्कार मिळाले आहेत.

     निवृत्तीनंतरही ते शिक्षकाचा धर्म निभावत आहेत. संस्थेच्या गुरूकुलामध्ये ते अध्यापन करीत आहेत. शिक्षण पद्धतीच्या संदर्भात २००३ मध्ये कराड येथे शैक्षणिक चिंतन परिषदेचे आयोजन केले होते. शिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी केलेले लेखन मौलिक स्वरूपाचे आहे. १९८१ मध्ये शिव पार्वती प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा ‘श्यामची आई: संस्कारांचा अमृत कुंभ’ हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. १९८६ मध्ये ‘पेशवाईतील न्यायदेवता’ या त्यांच्या कादंबरीला मराठी साहित्य परिषदेचा ‘मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार’ मिळाला. ‘जडण घडण’, ‘लोकमानसातील यशवंतराव’, ‘अध्यापनाच्या नव्या वाटा’ हे त्यांचे शैक्षणिक प्रकल्पही प्रकाशित झाले आहेत.

     प्रभुणे यांचे सामाजिक संस्थांमधील योगदानही महत्त्वपूर्ण आहे. ते कराडच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक सदस्य, कार्यवाह आहेत. माहुलीच्या रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानचे कार्यवाह, पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान, अर्धनिवासी गुरुकुल, कराड या संस्थेचे संस्थापक म्हणून आजही ते काम पाहात आहेत. शिक्षण मंडळाचे कनिष्ठ महाविद्यालय व महिला महाविद्यालय काढण्यात व वाढविण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे.

     यशवंत व्यासपीठ व कै. दादासाहेब अळतेकर व्याख्यानमाला चालू करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. १९९९ मध्ये साने गुरुजी जन्मशताब्दीनिमित्त ‘श्यामची आई : संस्कारांचा अमृतकुंभ’ या पुस्तकावर तीनशे व्याख्याने दिली. महामानव विनोबा या विषयी पंचाहत्तर व्याख्यानांचा प्रकल्प पार पाडला.

     डॉ. रा. गो. प्रभुणे यांच्या ह्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल कराड व परिसरातील शैक्षणिक संस्थांच्या वतीने गुरुदेव कार्यकर्ता, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा मधुसंचय, पुण्याच्या महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन परिषदेचा ‘ना. गोपाळ कृष्ण गोखले महाराष्ट्र गौरव’, सांगलीच्या प्रतिष्ठा प्रतिष्ठानच्या वतीने ‘साने गुरुजी सेवा प्रतिष्ठा’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला.  शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च बहुमानाच्या ‘आदर्श शिक्षक’ राष्ट्रपती पुरस्काराचे १९८९ सालचे ते मानकरी आहेत. 

     यकृताच्या कर्करोगाने वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

-डॉ. व्ही. व्ही. घारपुरेप्रा. सुहासकुमार बोबडे

प्रभुणे, रामकृष्ण गोविंद