प्रभू, वसंत कृष्णराव
अवघ्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक मधुर भावगीते आणि चित्रपटगीते देणारे संगीतकार म्हणून वसंत कृष्णराव प्रभू विख्यात होते.
वसंत प्रभू यांचा जन्म मुंबई येथील लालबागच्या कामगार वसाहतीत झाला. घरची गरिबी असल्यामुळे त्यांचे शिक्षण यथातथाच पार पडले. पण बालपणापासूनच त्यांना संगीताचे वेड होते. त्यामुळे गाण्याच्या बर्याच कार्यक्रमांना ते हजेरी लावत असत. गाणे ऐकून ऐकूनच त्यांचे कान तयार झाले होते. मग कुठूनतरी हार्मोनियम मिळवून त्यांनी त्यावर सराव सुरू केला. हळूहळू ते नृत्यही करायला शिकले. वयाच्या दहाव्या वर्षी भरत सेना मेळ्यामध्ये ते नृत्य करताना स्वत:च गाणे म्हणत असत.
हार्मोनियमवर सराव करत असतानाच एखाद्या लोकप्रिय गीताला सर्जनशील कलावंत म्हणून वसंत प्रभू आपली स्वत:ची चाल लावत. १९४७ साली त्यांनी ‘अगं पाटलाच्या पोरी.. जरा जपून जपून..’ या गाण्याला चाल लावली आणि एच.एम.व्ही. कंपनीने ते ध्वनिमुद्रित केले. या पहिल्याच गाण्याने वसंत प्रभूंना चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. १९४९ साली त्यांनी पी. सावळाराम यांचे एक गीत ध्वनिमुद्रित केले. लता मंगेशकर यांनी ते गीत गायले होते. या ध्वनिमुद्रिकेची चांगली विक्री झाल्याने एच.एम.व्ही.ला महिनाभरातच ध्वनिमुद्रिकेची दुसरी आवृत्ती काढावी लागली. ते गीत होते ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?’ आणि नंतर एच.एम.व्ही., लता मंगेशकर आणि वसंत प्रभू असे समीकरणच तयार झाले आणि नंतरच्या काळात ‘हसले गं बाई हसले अन् कायमची मी फसले’, ‘कृष्णा मिळाली कोयनेला’, ‘श्री रामा घनश्यामा’, ‘ते दूध तुझ्या त्या घटातले’, ‘निजल्या तान्ह्यावरी माउली’, ‘डोळे पाण्याने भरले’, ‘प्रेमस्वरूप आई’, ‘विठ्ठल तो आला आला’, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’, ‘चाफा बोलेना’ अशी अनेक भावगीते वसंत प्रभूंनी संगीतबद्ध केली आणि या गीतांनी वसंत प्रभूंना अमाप लोकप्रियता मिळाली.
ताजी, सुटसुटीत आणि लोकांना पटकन आवडेल अशी संगीतरचना अगदी मोजक्या वाद्यमेळाच्या साहाय्याने ते बनवत. त्यांनी १९४८ साली चित्रपटांना संगीत देण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘घरबार’. वसंत प्रभूंनी संगीत दिलेला हा एकमेव हिंदी चित्रपट होता. १९५० साली दिनकर पाटील यांच्या ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटातल्या काही लावण्यांना त्यांनी संगीत दिले व नृत्य दिग्दर्शनही केले होते. त्यानंतर दिनकर पाटील यांच्याच ‘पाटलाचं पोर’ (१९५१) या चित्रपटालाही त्यांनीच संगीत दिले. ‘पाटलाचं पोर’पासून दिनकर पाटील, वसंत प्रभू आणि पी. सावळाराम या त्रयीने मराठी रसिकांना उत्तम संगीत ऐकवून तृप्त केले. ‘वादळ’, ‘मूठभर चणे’, ‘तीन मुले’ या चित्रपटांनाही वसंत प्रभू यांनी संगीत दिले. साधी, सोपी स्वररचना, गेयता आणि मोजका वाद्यवृंद ही वसंत प्रभूंच्या संगीताची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे त्यांनी बनवलेली गाणी सुरेल आणि अविस्मरणीय ठरली.
मुंबईत वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.