Skip to main content
x

परचुरे, मनोहर श्रीराम

      नोहर श्रीराम परचुरे यांचा जन्म अमरावती येथे झाला व प्राथमिक शिक्षणही तेथेच झाले. माध्यमिक शिक्षण नागपूरमध्ये विनायकराव देशमुख हायस्कूलमध्ये झाले व १९४९मध्ये ते शाळेतून पहिल्या क्रमांकाने माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले.ते १९५३मध्ये सायन्स कॉलेज नागपूरमधून बी.एस्सी. झाले व घरच्या गरीब परिस्थितीमुळे ग्लॅक्सो कंपनीत औषध प्रतिनिधी म्हणून काम करू लागले. हे काम त्यांनी १६ वर्षे केले. १९६९मध्ये त्यांनी ही नोकरी सोडून सोयाबीनवर प्रक्रिया करून खाद्यपदार्थ तयार करण्याचा कारखाना काढला. या उद्योगात त्यांना अपयश आले त्यामुळे मोठे नुकसान झाले व १९७४मध्ये कारखाना बंद करून त्यांनी वृत्तपत्रात नोकरी पत्करली. त्यांनी बहिःस्थ अभ्यासक्रमाद्वारे एलएल.बी. परीक्षा देऊन नोकरी सोडली. १९७९-८९ या काळात त्यांनी नागपूर येथे वकिली सुरू केली.

      परचुरे यांच्या घरी शेती नव्हती, पण १९६० साली त्यांनी नागपूरजवळ ९.५ एकर जमीन विकत घेतली. ती मुरमाड होती, म्हणून तेथे कोंबड्या, डुकरे व ४-५ म्हशींची डेअरी सुरू केली. मात्र आर्थिक यश मिळाले नाही. पुढे १९९० साली त्यांनी वर्धा जिल्ह्यात अंभोरा येथे ४० एकर जमीन विकत घेऊन दिवाणजी नेमून शेती सुरू केली, पण एका वर्षात रु. ५५,०००चा तोटा आला. त्यानंतर त्यांनी वकिली बंद करून शेतात घर बांधून तेथे राहून शेती सुरू केली. शेतीविषयक वाचन, चिंतन सुरू केले. त्याच्या अभ्यासातून त्यांनी शेती उद्योगाच्या अवनतीची कारणे समजली व ‘शेती करा व श्रीमंत व्हा’ हे पुस्तक लिहिले. १९९७मध्ये त्यांचे गुरू फुकुओका यांनी त्यांच्या अम्भोऱ्याच्या शेताला भेट दिली व त्यांच्या आदेशावरून प्रथम महाराष्ट्रात व नंतर मध्य प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओरिसा या राज्यांत फिरून शेतकऱ्यांना १०००हून अधिक सभांमधून शेतीतून समृद्धी कशी मिळवावी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी ११ कृषी विद्यापीठांना भेटी देऊन शेतीविषयक आपले सिद्धांत मांडला तो खालीलप्रमाणे :

      प्रत्येक जीवमात्राच्या पोषणाची व्यवस्था निसर्गाने केलेली असते. अशा वनस्पतीला  जागेवरच सर्व अन्नद्रव्ये मिळतात. त्याच्या वाढीसाठी बाहेरून काही आणावे लागत नाही. सूर्यप्रकाश, हवा, ओलावा आणि जिवंत जमीन पिकांना मिळाली की, उत्पादन मिळवता येते व त्यासाठी फक्त ज्ञान व श्रम यांची गरज असते. प्रत्येक जीवाला ‘असेल त्यातून हवे ते’ मिळवता येते. जिवंत जमिनीत अनेक प्रकारच्या जिवाणूंच्या सहकार्याने पिके व वनस्पती सर्व अन्नद्रव्ये मिळवतात. शेतीतील सर्व खर्च कमी करता येतात व शेतीवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही, असे त्यांचे मत आहे. रसायनमुक्त शेतीची सर्व उत्पादने बाजारात जास्त भावाने विकता येतात व त्यामुळे शेतकरी स्वावलंबी होऊ शकतो, असे ते प्रतिपादन करतात. विज्ञानाधारित व निसर्गाशी हातमिळवणी करणारी सेंद्रिय शेती भारतीय शेतकऱ्यास शाश्‍वत समृद्धीकडे नेईल, असा त्यांना विश्‍वास आहे. त्याचा प्रचार व प्रसार ते कायम करत आहेत. अशा शेतीमुळे उत्पन्नात वाढ होते व शेतकरी स्वावलंबी होतो व ग्राहकांना ‘विषमुक्त’ अन्न पुरवू शकतो असा संदेश देणारी १२ इंग्लिश, मराठी व हिंदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या सेंद्रिय शेती समितीवर नियुक्त करून शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतली. महाराष्ट्र सरकारने २००३ मध्ये त्यांना शेतिमित्र पुरस्कार दिला. 

      - डॉ. श्रीपाद यशवंत दफ्तरदार

परचुरे, मनोहर श्रीराम