Skip to main content
x

प्रधान, श्रीराम दत्तात्रेय

        श्रीराम दत्तात्रेय प्रधान यांचा जन्म मुंबईत दादर येथे झाला. त्यांचे घराणे मूळचे रोह्याचे. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे बालपण दिल्लीत गेले. १९४२ च्या सुमारास ते शिक्षणासाठी  पुण्यात आले. त्यांनी न्यू इंग्लीश स्कूल येथून शालेय शिक्षण घेतले आणि फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी संपादन केली. पदवीनंतर ते आय.ए.एस.ची स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण झाले व १९५२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झाले. तेव्हाच्या रीतीनुसार काही जिल्ह्यांतून प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रधान यांचा बाबासाहेब गडकरी यांची कन्या लोपामुद्रा यांच्याशी विवाह झाला.

         कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी तेथील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात लक्षणीय सुधारणा घडवून आणली. त्यानंतर ना. यशवंतराव चव्हाण यांनी आपले विश्‍वासू सहकारी म्हणून प्रधान यांना नियुक्त केले. त्यांच्याबरोबर प्रधान यांनी गृह, संरक्षण आणि अर्थखात्याच्या कारभाराचा अनुभव घेतला. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ‘युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट’च्या मुख्य सचिवांचे सल्लागार, डायरेक्टर ऑफ शिपिंग, महाराष्ट्र राज्याचे गृहसचिव, नंतर केंद्रीय गृहसचिव अशी शासकीय सेवेतील विविध मानाची पदे त्यांनी भूषविली. केंद्रीय गृहसचिव असताना त्यांनी आसाम करार पुरा केला ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणावी लागेल. या त्यांच्या कामगिरीमुळे ते पंतप्रधानांच्या अगदी विश्‍वासातील व्यक्ती बनले.

         यानंतर १९८७मध्ये प्रजासत्ताकदिनी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा बहुमानाचा किताब दिला. १फेब्रुवारी१९८९ पासून बिहार व अरुणाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून श्रीराम प्रधान यांची नियुक्ती झाली. त्यापूर्वी लोकनायक बापूजी अणे व आर.डी.भंडारे यांनीही काही काळ तो कार्यभार पाहिला होता. नंतर प्रधान बिहारचे राज्यपाल झाले. तेव्हा बिहार हे एक ‘समस्या राज्य’ झाले होते. एका बाजूला आर्थिक मागासलेपणा व दुसऱ्या बाजूला सामाजिक तणाव अशा कात्रीत बिहार सापडला होता. त्या परिस्थितीत राज्यातील राजकीयच नव्हे तर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी एका चांगल्या प्रशासकाची आवश्यकता होती. राम प्रधान यांच्या नियुक्तीने हे कार्य साधले गेले. त्यानंतर प्रधान यांना महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे नामनियुक्त सभासद म्हणून नेमणूक मिळाली.

          २६नोव्हेंबर२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी आघातानंतर चौकशीसाठी दोन सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. श्रीराम प्रधान यांचा त्यात समावेश होता. त्यांनी याची सखोल चौकशी केली व आपला अहवाल सादर केला. प्रधान यांनी आपल्या सामाजिक जबाबदाऱ्याही विविध मार्गांनी पूर्ण केल्या आहेत. निवृत्तीनंतरही श्रीराम प्रधान यांनी अनेक संस्था व संघटनातून आपले कार्य चालू ठेवले आहे.

         - सविता भावे

प्रधान, श्रीराम दत्तात्रेय