प्रवर्तक, शंकर लक्ष्मण
शंकर लक्ष्मण प्रवर्तक यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात लोणी येथे कुलकर्णी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. लहानपणापासून शंकर प्रवर्तकांची विचारसरणी प्रखर व वृत्ती बाणेदार होती म्हणून त्यांनी आपले नाव कुलकर्णीऐवजी ‘प्रवर्तक’ ठेवले आणि त्याच नावाने ते ख्यातनाम झाले. बालपणापासून संगीताची आवड असल्याने त्यांनी संगीत क्षेत्रातच भरघोस कार्य करण्याच्या निश्चयाने घर सोडले.
शंकर प्रवर्तकांनी ग्वाल्हेरला ढोलीबाबांच्या मठात मुक्काम केला. अन्नछत्रात भोजन करून पं.विष्णूबुवा फलटणकर यांच्याकडे संगीताचा अभ्यास केला. आपल्या सुरेल गायनाने अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली. वयाच्या बाविसाव्या वर्षी ते बनारसला जाऊन पं. गोपाळशास्त्री नेने व पं. भालचंद्र शास्त्री तेलंग यांच्याकडे संस्कृतचा अभ्यास आणि धृपद गायकी शिकू लागले. ते १९१५ साली अमरावतीला आले व तेथून नांदगावला गेले. त्यांनी १९१७ पर्यंत पुण्याला अब्दुल करीम खाँसाहेबांकडे अध्ययन केले. त्याच अवधीत त्यांनी पं. भास्करबुवा बखले यांचेही मार्गदर्शन घेतले.
शंकर प्रवर्तक १९१९ मध्ये ग्वाल्हेरला गेले आणि त्यांनी पं. भातखंडे यांनी स्थापन केलेल्या ‘माधव संगीत विद्यालया’त साधना केली. भातखंडे यांची प्रवर्तकांवर अतिशय मर्जी बसली. त्यांच्या सुरेल आवाजाने, पद्धतशीर गायकीने, हुकमी रंगतीने बैठकी खूप गाजल्या व त्यांना चौफेर लोकप्रियताही लाभली. परंतु कुणीतरी त्यांना द्वेषभावाने विड्यातून शेंदूर दिल्याने त्यांचा सुरेल आवाज कायमचा लुप्त झाला व आवाज घोगरा, जाडाभरडा झाला. तरी हताश न होता त्यांनी संगीत शिक्षक होऊन संगीताचाच प्रचार-प्रसार करण्याचे दृढ व्रत घेतले.
यानंतर १९२४ साली प्रवर्तक काहीसे विरक्त होऊन नागपूरजवळ पाटसावगी येथे राहिले. मात्र नंतर पुन्हा नागपूर येथे परतले व शहराच्या महाल विभागात त्यांनी ‘चतुर संगीत महाविद्यालया’ची व ‘अभिनव संगीत विद्यालया’ची १९२५ साली स्थापना केली. पुढच्याच वर्षी ‘हिंदुस्थानी संगीत शिक्षण प्रसारक मंडळ’ स्थापन करून त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र मिळवून दिले.
प्रवर्तकांनी १९४० मध्ये धंतोली भागात ‘म्युझिक कॉलेज’ स्थापन केले. बरीच वर्षे प्रवर्तक या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांनी १९४५ मध्ये ‘संगीत शिक्षक महासभा’ स्थापन केली. त्यांनी स्थापन केलेले ‘चतुर संगीत महाविद्यालय’ आणि ‘भातखंडे म्युझिक कॉलेज’ अजूनही कार्यरत आहेत.
त्यांच्या शिष्यांपैकी प्रभाकर जोशी व यादव जोशी ही जोडी खूप गाजली. यांशिवाय प्रभाकर खर्डेनवीस, देवीदास देवघरे, दत्तोपंत वझलवार, डॉ. उषा नंदनपवार, प्रभा वसू (राज्यमंत्री प्रभा राव), वसंत मांडे वगैरे अनेक जण नावारूपास आले.
त्यांनी चिजांचे मराठीकरण करून ‘महाराष्ट्र गीतांजली’ नावाचे पुस्तक लिहून प्रकाशित केले. तसेच मराठी चिजा विद्यार्थ्यांना शिकविल्या. उतारवयात प्रवर्तकांनी भातखंडे महाविद्यालयाचा सर्व कारभार शिष्य प्रभाकर खर्डेनवीस यांच्या हाती दिला. ते टापटीप व शिस्तप्रिय असल्याने त्यांनी संस्थेचे बोधचिन्ह, प्रमाणपत्रे, नोंदणीबुके व्यवस्थित ठेवली.
आजन्म ब्रह्मचर्य पत्करून, शास्त्रीय संगीताला योग्य व मानाचे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय चार संगीत- संस्थांचे संस्थापक, ‘प्रवर्तक’ शंकर प्रवर्तक यांना आहे. त्यांचे नागपूर येथे निधन झाले.