Skip to main content
x

पटवर्धन, गोविंदराव विठ्ठल

         हार्मोनिअम वादनाच्या संदर्भात दोन ‘गोविंदरावांचा’ उल्लेख आदराने केला जातो : पहिले गोविंदराव टेंबे व दुसरे गोविंदराव पटवर्धन. कितीही मुश्कील गायकी असली तरी टीपकागदाप्रमाणे ती उचलून आपल्या वादनात सहीसही उतरवणारे गोविंदराव पटवर्धन हे उत्तम एकल हार्मोनिअम वादक म्हणूनही प्रसिद्ध होते.

       आपल्या आजोळी, गुहागरजवळच्या अडूर या कोकणातल्या गावी गोविंदराव विठ्ठल पटवर्धन यांचा जन्म झाला. ते १९३० च्या सुमारास वडिलांबरोबर मुंबईस आले. व्हर्न्याक्युलर फायनलनंतर त्यांचे आर्यन एज्युकेशन स्कूलमध्ये शिक्षण झाले व १९४२ साली ते मॅट्रिक झाले. ते १९४७ साली पोलीस खात्यात नोकरीला लागले. उपजीविकेसाठी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली, मात्र त्यांची खरी निष्ठा संगीतावरच होती.

        त्यांना घरातूनच संगीताचा वारसा लाभला होता. त्यांचे काका शंकरराव पटवर्धन व मामा गोविंदराव कानिटकर हे चांगल्यापैकी गात असत. शंकररावांना पेटी शिकवायला हरिभाऊ पराडकर हे येत असत. ती शिकवणी झाली की बालगोविंदाही पेटी वाजवू लागे. गोविंद सहाव्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत होणार्‍या प्रभातफेर्‍यांत गाण्यांना साथ करू लागला. सूर-तालाची उपजत जाण घेऊन जन्मलेले गोविंदराव कुणाकडे रूढ शिक्षण न घेताच तेराव्या वर्षापासून हार्मोनिअम व तबला वाजवू लागले.

        त्यांनी काही काळ हरिभाऊ पराडकर व पुरुषोत्तम सोलापूरकर यांच्याकडे शिक्षण घेतले. पी. मधुकर, राईलकर, नन्हेबाबूंचे शिष्य नागपूरचे चौरीकर अशा वादकांचे एकलवादनही त्यांना प्रभावित करून गेले. गोविंदराव टेंबे, शंकरराव खातू व पी. मधुकर यांच्याही सहवासातून त्यांनी काही गोष्टी टिपून घेतल्या.

          गोविंदराव पटवर्धनांनी प्रथम पुरुषोत्तम सोळांकुरकर यांना हार्मोनिअमची साथ केली व त्यांचा हार्मोनिअम साथसंगतीचा अध्याय सुरू झाला.

           गोविंदरावांनी १९४२ पासून मुंबई मराठी साहित्य संघ, ललितकलादर्श व इतर अनेक नाट्यसंस्थांच्या संगीत नाटकांच्या हजारो प्रयोगांना ऑॅर्गनची साथ केली. त्यांची स्मरणशक्ती व अंगातील धमक जबरदस्त होती, त्यामुळे शेकडो संगीत नाटके त्यांना मुखोद्गत होती व त्यांचे तासन्तास चालणारे शेकडो प्रयोग त्यांनी लीलया वाजवले. नाटकात गायकाची पट्टी कोणतीही असो, ऑॅर्गनवर ते नेमकेपणाने सूर देऊन त्या पट्टीत सहजपणे साथ करत. आपल्या वादनातून नाट्यपदांतल्या शब्दांचाही प्रत्यय देणे हीसुद्धा त्यांची खासियत होती.

         नाट्यसंगीतासाठी बालगंधर्व, दीनानाथ, हिराबाई बडोदेकर, भालचंद्र पेंढारकर, राम मराठे, छोटा गंधर्व, सुरेश हळदणकर, वसंतराव देशपांडे, जयमाला शिलेदार, सुहासिनी मुळगावकर, प्रसाद सावकार, इ. अनेक कलाकारांना त्यांनी मनापासून साथ केली. जुन्या संगीत नाटकांबरोबरच ‘जय जय गौरीशंकर’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशी साठोत्तर संगीत नाटकेही त्यांनी वाजवली.

         कुमार गंधर्व, राम मराठे, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकरांच्या नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिकांतील गोविंदरावांची साथ आदर्शवत आहे. त्यांनी १९७६ साली गुहागरच्या गावकर्‍यांनी बसवलेल्या ‘संगीत सौभद्र’ या नाटकात अर्जुनाची भूमिकाही केली होती. अनेक नवोदित गायक-गायिकांना ते उत्साहाने नाट्यपदे बसवून देत असत.

          रागसंगीताच्या मैफलींत गोविंदराव १९४२ पासून कुमार गंधर्व, १९४४ पासून राम मराठे, १९६१ पासून माणिक वर्मा, १९६८ पासून वसंतराव देशपांडे यांना साथ करू लागले व त्यांनी शेकडो मैफली रंगवल्या. रामकृष्णबुवा वझे, विलायत हुसेनखाँ, लताफत हुसेनखाँ, मोगूबाई कुर्डीकर, सुरेशबाबू माने व हिराबाई बडोदेकर, बी.आर. देवधर, अंतूबुवा व गजाननबुवा जोशी, हरिभाऊ घांग्रेकर, कागलकरबुवा, निवृत्तीबुवा सरनाईक, मल्लिकार्जुन मन्सूर, वामनराव सडोलीकर, गिंडे-भट, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, छोटा गंधर्व, माणिक वर्मा, शोभा गुर्टू, तसेच नंतरच्या पिढीतील मालिनी राजूरकर, प्रभाकर कारेकर, उल्हास कशाळकर, अश्विनी भिडे, इ. कितीतरी घराण्यांच्या श्रेष्ठ कलाकारांना गोविंदरावांनी संगत केली.

        राम मराठे यांच्या मुश्कील गायकीला साथ करतेवेळी गोविंदराव ते सगळे गाणे हार्मोनिअमवर तंतोतंत वाजवत असत. त्यांच्या वादनातील सफाई, नेमकेपणा विलक्षण होता. ‘साथ करायला बसलो की गायक गुरू व आपण शिष्य’, ही गोविंदरावांची भावना असे. 

        गायक गाईल ते सर्व आपल्या वाद्यातून वाजवण्याची ईर्षा व क्षमता गोविंदरावांमध्ये होती; पण त्यामुळे साथ करताना त्यांनी कधी गायकावर कुरघोडी केली नाही. एका बाजूला राम मराठे यांची बिकट तनैयत ते जशीच्या तशी वाजवून ‘वाहवा’ घेत, मात्र दुसर्‍या बाजूला आलापचारी चालू असताना संयमही बाळगत असत. कुमार गंधर्वांबरोबर साथ करताना, सुरुवातीला स्वर-श्रुतींचे सूक्ष्म दर्जे दाखवणारी आलापचारी चालू असताना कित्येकदा गोविंदराव केवळ षड्ज-पंचम स्थिरपणे धरून त्याचा भरणा देत आणि तेही असे, की जणूकाही त्या षड्ज-पंचम स्वरांतून कुमारजींच्या श्रुतींशी त्यांचा मूकसंवाद चालू आहे! पुढे बंदिशी व तानेची कामगत चालू झाली की मग गोविंदरावांच्या हातांतून ते गाणे तेवढ्याच नेमकेपणाने उतरत असे. कुमारजींच्या रागसंगीताच्या अनेक ध्वनिमुद्रणांत, तसेच ‘त्रिवेणी’ या भजनांच्या ध्वनिमुद्रिकेत या नेमकेपणाचा प्रत्यय येतो.

          कलाकाराला आपल्या वादनातून खुलवणे हेही त्यांचे वैशिष्ट्य होते. वयाने त्यांच्यापेक्षा लहान असणार्‍या मालिनी राजूरकरांना साथ करताना त्यांचे ख्याल व टप्पा-गायन चालू असताना सूचक व पोषक स्वरसंगतीतून ते प्रोत्साहन देत असतच, शिवाय महाराष्ट्राबाहेर लहानपण गेलेल्या मालिनीताईंना नाट्यसंगीत गाण्यासंबंधी त्यांनी मार्गदर्शनही केले.

         गोविंदरावांचे हात अतिशय चपळ, तयार, चुरचुरीत होते. नजाकतीपेक्षा तयारी व तानक्रियेवर त्यांचा भर होता. अगदी अवघड अशी कामगतही ते सफाईने, सहजतेने वाजवत असत. हरकती, खटके, मुरकी, कणस्वर, लहान-लहान स्वराकृती त्यांच्या हातांतून कोणत्याही लयीत अगदी अलगदपणे व साफ वाजत.

          पूर्वसुरींप्रमाणेच गोविंदरावांचे एकलवादन म्हणजे एखाद्या रागातील झपताल, रूपक तालातील मध्यलयीची चीज व द्रुत बंदिश, नंतर रसिकप्रिय अशी अनेक नाट्यगीते अशा साच्याचे होते. मधुवंती, मारवा, पूरियाकल्याण, तिलककामोद, बागेश्रीकंस, चंद्रकंस, बसंत, सोहनी असे राग, तर ‘दे हाता शरणागता’, ‘युवती मना’, ‘प्रभू अजि गमला’, इ. नाट्यपदे त्यांची अगदी आवडती होती.

         विलंबित ख्याल वा गतकारी त्यांनी फारशी वाजवली नाही किंवा हे एक स्वतंत्र वाद्य म्हणून त्याचा काही वेगळा विचार व्हावा असे त्यांना वाटले नाही; केवळ ‘गाणे’ वाजवणे अशीच त्यांची एकल वादनाबद्दलची भूमिका होती. अर्थात ते वाद्यवादनातील लयकारीचे पलटे, अतिद्रुत लयीतील झाला वाजवत असत. गोविंदराव पटवर्धन अनेक गायकांची ‘शिष्यभावने’ने उत्तम साथ करत आणि त्या-त्या गायकीतले बारकावे वेचून आपले एकलवादनही सादर करत. त्यांच्या एकलवादनात पं. राम मराठ्यांच्या गायकीची सुंदर छाप दिसत असे. एकलवादनाच्या त्यांच्या ध्वनिफितीही प्रसिद्ध झाल्या होत्या.

        कोकणात जन्मलेला व वृत्तीनेही कोकणी असणारा हा साधासुधा माणूस शेवटपर्यंत व्यवहाराच्या बाबतीत अगदी अलिप्त, तरीही समाधानी राहिला. आपल्या चौरस संसाराचा त्यांनी नेटका पट मांडला. गोविंदरावांनी कन्या वासंती व कालिंदी यांना अनुक्रमे व्हायोलिन व हार्मोनिअममध्ये तयार केले; पण कलाक्षेत्रात राहण्याची सक्ती केली नाही. मात्र आपले शिष्य विश्वनाथ कान्हेरे, डॉ. विद्याधर ओक, मकरंद कुंडले इत्यादींना           मुक्तहस्ताने शिकवले.

        रूढार्थाने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांपासून ते वंचित राहिले. पण त्यांच्या वादनाला मिळणारी गवैयांची व रसिकांची दाद हा पुरस्कार-शिरोमणी त्यांच्या मुकुटात नेहमीच होता. गोविंदरावांना मुंबईतील राहत्या घरी पहाटे  हृदयविकाराचा सौम्य झटका आला व त्यांनी शांतपणे या जगाचा निरोप घेतला. जन्मभर हार्मोनिअम या वाद्याशी सान्निध्य असल्याने कुणी कोटीबहाद्दराने त्यांना गोविंदराव पटवर्धनऐेवजी ‘पेटीवर्धन’ म्हटले, ते सार्थच होय!

चैतन्य कुंटे

पटवर्धन, गोविंदराव विठ्ठल