Skip to main content
x

पुरोहित, जगन्नाथ जनार्दनपंत

गुनिदास (गुणिदास)

पंडित जगन्नाथबुवा जनार्दनपंत पुरोहितांचा जन्म दक्षिण हैद्राबादेत, एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील भिक्षुकी करीत. बुवा अगदी लहान असताना त्यांची आई १९१० साली स्वर्गवासी झाली. त्या काळात मुसलमानी अमलात राजाश्रय असलेल्या ललितकलांच्या परंपरांना संस्थानांतून पुन्हा ऊर्जितावस्था येऊ लागली होती. निजामाच्या दरबारात, पाच-पंचवीस बडे गवई असत. जुम्म्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत अनेक मुसलमान गवयांच्या बैठकी होत. त्याशिवाय, गावात भजने, कीर्तने चालूच असत. एकूणच गाणे बजावण्याने गजबजलेल्या वातावरणात जगन्नाथबुवांचे बालपण गेल्यामुळे त्यांना शास्त्रीय संगीताची विलक्षण गोडी  लागली होती.
वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी, म्हणजे १९१५ साली वडील वारल्याने जगन्नाथबुवांनी शाळेला कायमचा रामराम ठोकला. मित्रमंडळींसमवेत गाण्या-बजावण्यात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या कष्टाळू स्वभावामुळेच मुहम्मद अल्ली खाँपासून विलायत हुसेन खाँपर्यंत एकापेक्षा एक नामवंत घरंदाज गवयांकडून वर्षानुवर्षे तालीम घेऊन प्रत्येकाच्या गायकीची वैशिष्ट्ये त्यांनी आत्मसात केलीच, शिवाय सर्वांकडून चिजांचा बहुमोल खजिना संपादन केला आणि तबल्याचेही उत्तम शिक्षण प्राप्त करून घेतले.
मुसलमानांच्या सान्निध्यात बराच काळ व्यतीत केल्यामुळे त्यांना ‘जगन्नाथ खाँ’ किंवा ‘जगन खाँ’ असे संबोधत. खुश झालेल्या याच सर्व हैद्राबादी ‘खाँ’ मंडळींनी त्यांना, ‘तू खरा गुणांचा दास’, ‘गुनिदास’ आहेस अशी पदवी बहाल केली. पुढे जगन्नाथबुवांनी चिजा बांधताना ‘गुनिदास’ (गुणिदास) हे नाव त्यांत गुंफून अजरामर केले. जगन्नाथबुवा संगीतात विलायत हुसेन खाँ यांचे, तर तबल्यात मेहबूब खाँ आणि थिरकवा खाँ साहेबांचे गंडाबद्ध शागीर्द होते. त्यांनी १९३९ साली म्हैसूरच्या युवराजांबरोबर  संगीताच्या सेवेसाठी युरोप दौरा केला आणि नंतर ते कोल्हापूरहून मुंबईत कायम वास्तव्यास आले. संगीतात त्यांनी बहुसंख्य शिष्यवर्ग निर्माण केलाच, शिवाय तबल्यातही उत्तम शिष्य घडवले.                                                                                                                        तबल्यातील भाई गायतोंडे, नाना मुळे, कलंदर हे काही नामवंत शिष्य, तर गायनात पं. राम मराठे, पं. सी.आर. व्यास, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. यशवंतबुवा जोशी, विदुषी माणिक वर्मा असे ख्यातनाम गवई त्यांचे शिष्य होते. मिळालेल्या चिजांचे मनन, चिंतन व अभ्यास हाच बुवांचा ध्यास होता. म्हणूनच त्यांनी अनेक जुन्या रागांत नवीन बंदिशी बांधल्या व आकर्षक नवराग निर्मितीही केली. ‘जोगकंस’ ‘जौनभैरव’, ‘स्वानंदी’, ‘मारूवसंत’, हे त्यांचे सर्व राग, मान्यवर गायकांच्या मैफली रंगविण्यात हुकमी एक्के बनले आहेत. पं.जगन्नाथबुवांच्या काळात, कोल्हापूर-मुंबईमध्ये घराण्यांच्या भिंतींमुळे संगीतकला बंदिस्त झाली होती.                    जगन्नाथबुवांनी या वातावरणात निखळ, नितळ आणि स्वच्छ वातावरण निर्मितीच्या कार्याची सुरुवात केली. प्रत्येक घराण्यात जे-जे सुंदर दिसेल, त्याचा आदराने स्वीकार केला. त्यामुळे त्यांची गायकी विविध अंगांनी नटलेली होती. आपल्या जवळील विद्येचे मुक्तहस्ते फक्त शिष्यांनाच नव्हे, तर जो मागेल त्याला त्यांनी दान केले. बुवांची गुरुभक्ती आणि गुरुप्रेम अतिशय उदात्त आणि लोकविलक्षण होते. आदर्श गुरू व आदर्श शिष्य परंपरेचा उच्चादर्श बुवांनी घालून दिला.
माहीम येथील ले. दिलीप गुप्ते मार्गापासून ते जमशेटजी मार्गापर्यंतच्या त्यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्याचे नाव (कै. पं. जगन्नाथबुवा पुरोहित ऊर्फ गुणिदास यांच्या स्मरणार्थ) मंगळवार, १२ मार्च १९७४ रोजी ‘पं. गुणिदास मार्ग’ असे ठेवून महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला. संगीताचे चालते-बोलते विद्यापीठ असलेल्या पं. जगन्नाथबुवांचे निधन, आकस्मिकपणे डोंबिवली मुक्कामी, त्यांच्या मानसकन्या लीला करंबेळकर यांच्या घरी झाले. त्यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेले ‘पं. गुनिदास प्रतिष्ठान’ मुंबई येथे कार्यरत आहे.

डॉ. मंगला आपटे

पुरोहित, जगन्नाथ जनार्दनपंत