Skip to main content
x

पुरोहित, वामन श्रीधर

वामन श्रीधर पुरोहित यांचा जन्म चाळीसगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नाशिक विद्यालयामध्ये झाले. नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयामधून मराठी व इंग्रजी विषय घेऊन ते एम. ए. झाले. त्यापूर्वीच त्यांनी एस. टी. सी. केले होते.

१९६० मध्ये महाराष्ट्रातील पहिले शालेय नाट्यशिबीर घेणाऱ्या वामनरावांनी सातत्याने मुलांमधील नाट्यगुणांचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्याचे प्रयत्न केले. १९६२ पर्यंत म्हणजे बेचाळीस वर्षे त्यांनी संस्थेच्या विविध शाळांत शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून अध्यापन व नेतृत्व केले.

नाशिक रोड येथील पुरुषोत्तम स्कूलला आपल्याच प्राथमिक शाळेत शिकलेली मुले मिळावीत म्हणून नाशिक रोड येथे वामनरावांनी नवीन मराठी शाळाही प्राथमिक शाळा मोठ्या दूरदृष्टीने सुरू केली. त्यांच्या कारकिर्दीत पुरुषोत्तम इंग्लिश विद्यालयाची विद्यार्थी संख्या वाढत गेली. जागा अपुरी पडू लागली. नंतर सुसज्ज, मोठी इमारत उभी केली गेली. शाळेचा शैक्षणिक दर्जाही उंचावत गेला.

मराठी भाषेच्या अध्यापनासाठी शिक्षकांना लेखन करता यावे, त्यांचा व्यासंग वाढावा, रसग्रहणक्षमता निर्माण व्हावी म्हणून मराठी अध्यापन कार्यशाळा ते घेत असत. १९३९ मध्ये नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु. स. रुंग्टा विद्यालयामध्ये त्यांनी शिक्षक म्हणून व्यवसायास सुरुवात केली. इंग्रजी व मराठी या भाषांवर त्यांचे मोठे प्रभुत्व होते. 

१९४२ मध्ये नाशिक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. गोवर्धन मठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्य यांनी श्री योगेश्वरानंदतीर्थ स्वामी यांच्या वतीने साहित्य वाचस्पतीही पदवी प्रदान केली होती. काळाराम मंदिरामध्ये उत्तम प्रवचनकार म्हणून १९५५ मध्ये त्यांना ही पदवी मिळाली.

 त्यांनी शिक्षणविषयक प्रश्‍नांवर नाशिकरोड पोलिस ठाण्यामध्ये गणेशोत्सवात अभिनव न्यायसभाआयोजित केली होती, तर ग्रामीण भागातील दहा शाळांमध्ये एकाच दिवशी लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. नगरपालिकेच्या मदतीने शाळेसाठी खुले नाट्यगृह उभे केले. तालीम बांधली व कुस्तीसाठी हौद, मल्लखांब इत्यादींची सुविधा मुलांसाठी निर्माण केली.

मुलांना मराठीतील साहित्यिक, कवी, विविध क्षेत्रांतील दिग्गजांना पाहण्याची, त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी शाळेच्या स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून या सर्वांना निमंत्रित केले होते. नांदगावच्या व्ही. जे. विद्यालयामध्ये मुख्याध्यापक असताना वामनरावांनी व्याख्यानमाला सप्ताहाचे आयोजन केले होते व विद्यार्थ्यांबरोबरच नांदगावकरांना महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांसारख्या व्याख्यात्यांचे विचार ऐकावयास मिळाले होते. एक अगदी वेगळा प्रयोग त्यांनी केला होता. शाळेची अनपेक्षित शैक्षणिक तपासणी करण्यासाठी पुरोहित अन्य शाळांतील शिक्षकांना, मुख्याध्यापकांना निमंत्रित करीत. त्यातून शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन मिळत असे.

नाशिकमधील व परगावातील अनेक सांस्कृतिक संस्थांमध्ये अध्यक्ष, सदस्य म्हणून त्यांनी काम केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे ते कार्यवाह होतेच. लोकहितवादी मंडळाचेही ते संस्थापक सदस्य होते. सार्वजनिक वाचनालय, महाराष्ट्र नाट्यमंडळ, वसंत व्याख्यानमाला इत्यादी संस्थांचे अध्यक्ष, कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले. पाच नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिनसंपन्न व्हावा ह्या विचाराचे ते उद्गाते, प्रचारक होते. मराठी रंगभूमी शतसांवत्सरिक, महोत्सवात नाशिक व मुंबई येथे सदस्य, कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले.

त्यांनी नाट्यविषयक व शिक्षणविषयक विपुल लेखन केले. मनोरथ, खुणेचे पान ह्या कादंबऱ्या, सांस्कृतिक सुविचार लेखन (शालेय फलक लेखनविषयक), मराठी नाटके ः माझा छंद ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. मराठी नाटक मंडळींचा इतिहास ही लेखनमाला आलमगीरसाप्ताहिकातून क्रमश: प्रसिद्ध झाली. मराठी व्याकरण सोपानहे व्याकरणावरील स्वतंत्र पुस्तक त्यांनी लिहिले.

- प्रा. सुहासिनी पटेल

पुरोहित, वामन श्रीधर