Skip to main content
x

फाटक, अरूण धोंडोपंत

रुण धोंडोपंत फाटक यांचा जन्म कर्नाटक राज्यातील धारवाड येथे झाला. अलिबागला शालेय शिक्षण झाल्यानंतर अहमदनगरला बी. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वडील पाटबंधारे विभागात कारकून होते. घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने हरहुन्नरी अरुण लहानपणापासूनच अर्थ प्राप्ती करीत होता. बालपणी अलिबागच्या  समुद्रकिनाऱ्यावरील शंखशिंपले गोळा करून त्याच्या आकर्षक कलात्मक वस्तू, शुभेच्छापत्रे, बाहुल्या आदी तयार करून विक्री करायचा, पूजा सांगण्यासाठीही जात असे. पुढे तो अहमदनगरला गेल्यावर देखील पतंग, कोंबड्यांच्या पंखांचे वॉलपीस, रुखवत असे सहज करण्यासारखे कमी भांडवली उद्योग करायला लागला.

बी. ए. ची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांचे कुटुंब रत्नागिरीस राहण्यास आले. घरच्यांची इच्छा होती की कुठेतरी कारकून म्हणून अरुणने काम करावे. परंतु अरुणचे कलाकार मन कारकुनी करायला तयार होईना. म्हणून मग घर सोडून कलासाधना करीत अनेक ठिकाणी भ्रमंती केली आणि मूर्तिकला, चित्रकला, शिल्पकला यासारख्या कला अवगत केल्या.

पेणला एके ठिकाणी काम करीत असताना या गुणी कलाकाराला पुण्याच्या गोखले बाईंनी हेरले आणि पुण्यातील सुहृद मंडळ या मूकबधिर मुलांच्या शाळेत मुलांना शिकविण्याची विनंती केली. मूकबधिर मुलांना कलात्मक वस्तूंचे शिक्षण देताना कला शिक्षकाला आवश्यक असणारे प्रमाणपत्र नसल्याने सुरुवातीला शिपाई म्हणून काम केले होते.

अर्चना या मूळच्या रत्नागिरीच्या एम.ए. बी.एड. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मालतीबाई जोशी यांच्या एका व्याख्यानातील मूकबधिर मुलांच्या शिक्षणासाठी काम करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत जीवनाची दिशा ठरवली आणि पुण्याच्या सुहृद मंडळमध्ये डेफ एज्युकेशनचा डिप्लोमा करण्यासाठी गेल्या. त्याच दरम्यान रत्नागिरीच्या ‘दि न्यु एज्युकेशन सोसायटी’ने मूकबधिर मुलांसाठी शाळा काढण्याचे ठरविले होते.

२ जुलै १९८१ रोजी जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली मूकबधिर मुलांची शाळा सुरू करण्यात आली. तोपर्यंत रत्नागिरीकरांना मूकबधिर मुले शिकू शकतात हे माहीतच नव्हते. या शाळेच्या स्थापनेपासूनच अर्चना व अरुण फाटकांनी या शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली. आवश्यक प्रमाणपत्र मिळवून कला शिक्षक म्हणून कामास सुरुवात करत असतानाच फाटकांना अर्चना यांनी त्यांना डेफ एज्युकेशनचा डिप्लोमा करण्याचे सुचविले आणि भाषा शिक्षक होण्यासाठी प्रोत्साहन दिले. पुढे १ जून १९८२ साली या दोघांचा विवाह झाला.

अर्चनाबाईंकडे सुरुवातीला अनेक वर्षे शाळेची व्यवस्थापकीय जबाबदारी होती. फाटक आज शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहातात. एका छोट्याशा खोलीत परिसरातल्या १२ मूकबधिर मुलांना घेऊन ही शाळा सुरू करण्यात आली. शाळेमध्ये या मुलांना पुस्तकी शिक्षणाच्या जोडीने व्यवसाय शिक्षणाची गरज असते, कारण त्यांच्या या दुर्दैवी न्यूनतेला सामान्य माणसांच्या उद्योग आणि व्यवसायाची दारें उघडी नसतात.

हे वास्तव लक्षात घेऊनच अर्चना व अरुण फाटकांनी मूकबधिर मुलांना शाळेत व्यावसायिक कौशल्य प्राप्त होईल असे शिक्षण देण्याचे ठरविले. त्या दृष्टीने राख्या, भेटकार्ड, कागदी फुले, नाग, मूर्ती, शोभेच्या वस्तू व इतर कलात्मक वस्तूबरोबरच शिवणकाम, भरतकाम, सुतारकाम, स्क्रीन प्रिटिंग असे व्यावसायिक शिक्षण दिले. मूकबधिर मुले टाकाऊ, दुर्लक्षित किंवा दुबळी न ठरता ती समाजातील उपयुक्त, उत्पादक आणि स्वावलंबी बनवीत यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी शिक्षणानंतर त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी मदत व प्रोत्साहन दिले. एवढेच नाहीतर त्यांचे वैवाहिक पुनर्वसन व्हावे यासाठी फाटक दांपत्याने वेळोवेळी पुढाकार घेतला.

मूकबधिर मुलांच्या शिक्षणाबद्दल समाजात जागृती करण्यासाठी फाटक दांपत्य सहकाऱ्यांबरोबर अनेक शाळा, वाड्या, वस्त्यांबरोबरच अनेक गावात जाऊन त्यासंबंधी माहिती देऊन, सर्वेक्षण करून त्या मुलांच्या पालकांची समजूत काढून मूकबधिर मुलांना शाळेत आणण्याचे काम करतात.

हे करत असताना अनेक अडचणी, अज्ञान, अंधश्रद्धा यामुळे निर्माण होतात. मूकबधिर मुलांच्या मनातील न्यूनगंड दूर व्हावा तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण व्हावा, समाजात मिसळण्याची सवय व्हावी यासाठीही ते विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पालक सभा इत्यादी उपक्रम राबवित असतात. त्याचबरोबर मूकबधिर मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे व समाजात अपंगांविषयी जागृती व्हावी या हेतूने दीपावलीपूर्वी हस्तकला प्रदर्शन भरविण्यात येते.

फाटक हरहुन्नरी कलाकार आहेत. चित्रकला, मूर्तिकला, काचेची चित्रे, रांगोळ्या, शंख-शिंपल्यांच्या कलात्मक वस्तू तयार करणे याबरोबरच अभिनय, नृृत्य, नाट्यलेखन, दिग्दर्शन या आपल्या कलागुणांचा वापर करून ते मूकबधिर मुलांचा सर्वांगीण विकास साधतात. त्यांनी अभ्यासक्रमातील ‘गोष्ट तुमची आमची’ या अपंगांसाठीच्या नाट्यीकरणात गीतलेखन, नेपथ्य, वेशभूषा व अभिनय केला आहे  इयत्ता ३ री व ४ थीच्या भूगोलावर आधारित ‘महाराष्ट्र आमुचा’ या नाट्यासाठी गीतलेखन केले आहे. त्याचे ५० प्रयोग आजपर्यंत झाले आहेत.

त्याचबरोबर विविध संस्थांना विविध कलाविषयक मार्गदर्शन, विविध अभ्यासविषय शिकविण्यासाठी मूकबधिरांना उच्चार शिक्षण देण्यासाठी विशेष प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली आहे. त्यामुळेच आज शाळेने सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले असून मूकबधिर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्यप्रयोगास राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. या बरोबरची श्री. व सौ.फाटक आकाशवाणी, वृत्तपत्रे अशा विविध माध्यमातून अपंगांच्या समस्या, शिक्षणाचे महत्त्व आणि त्यांची उपयुक्तता याबद्दल समाजात जागृती करण्याचे काम करीत असतात.

शाळेच्या सुरुवातीला वसतिगृह नसल्याने स्वतःच्या घरी मूकबधिर मुलांना राहण्याची सोय करून दिली. आजही अनेक गरजू, गरीब, हुशार विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन व मदत हे दोघेही करीत असतात. या कामासाठी फाटकांचा ‘शारदा पुरस्कार’ व ‘सु. ल. गद्रे पुरस्कार’ देऊन गौरव कऱण्यात आला व सौ. फाटक यांचा महाराष्ट्र शासनातर्फे ‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला आहे.

     - विवेक वि. कुलकर्णी

 

फाटक, अरूण धोंडोपंत