Skip to main content
x

फाटक, हरिभाऊ

       हा काळ महाराष्ट्राच्या वैचारिक क्रांतीचा होता. या राष्ट्रीय जागृतीच्या काळात हरिभाऊंचे शालेय शिक्षण टिळक - आगरकरांच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण ना. गोखले यांच्या फर्गसन महाविद्यालयामध्ये झाले.हरिभाऊंच्या वडिलांचा मृत्यू १८९७ मध्ये झाला. मोठ्या कुटुंबपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांना सरकारी नोकरीकडे वळावे लागले. १८९७ मध्ये त्यांना अकोट (जि. अकोला) येथे शाळा खात्यात नोकरी मिळाली. १८९७ ते १९०४ हा त्यांचा काळ अकोटच्या विद्यालयामध्ये गेला. हरिभाऊंच्या मनात देशभक्ती असली तरी त्यावेळी त्यांच्यावरची भावंडांची जबाबदारी मोठी होती. त्यामुळे नोकरी ही महत्त्वाची होतीच.

       महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना गोखले हेच हरिभाऊंचे आराध्य दैवत होते. नंतर १९०४ मध्ये फाटक यवतमाळला शिक्षक होते. तेव्हा भिडे गुरुजींच्या द्वारे हरिभाऊंनी देशसेवेची शपथ घेतली. त्यावेळीही कुटुंब पोषणाच्या चिंतेने त्यांना ग्रासलेले होतेच. देशासाठी काही केले पाहिजे. आपण विद्यादान करतोच, ते एकनिष्ठेने करावे. विद्यार्थ्यांना देशभक्तीचे पाठ द्यावेत, शिवाजी महाराजांचे माहात्म्य शिकवावे. १९०५ मध्ये स्वदेशी व राष्ट्रीय शिक्षणाची लाट उसळली. तेव्हा हरिभाऊंची बदली वणीला करण्यात आली. तेव्हा तपस्वी बाबासाहेब परांजपे यांच्या आग्रहामुळे हरिभाऊ विद्यागृहाची (राष्ट्रीय शाळा) जबाबदारी घ्यायला तयार झाले. हरिभाऊंना देशकार्याची दिशा मिळाल्यावर देशसेवेचे व्रत सोडले नाही आणि त्यांनी आयुष्यभर तरुणांना देशकार्याकडे ओढण्याचेच कार्य केले. ही शाळा दोन वर्षांतच (१९०९) सरकारी दडपशाहीला बळी पडली. पण इथेच हरिभाऊ फाटक आणि दत्तोपंत आपटे या देशभक्तांची मैत्री जुळली. यवतमाळचे हे विद्यागृह बंद झाल्यावर ते दोघे पुण्याला परतले. त्यावेळी मुंबईत टिळक खटला सुरू होता. त्याच सुमारास दैनिक राष्ट्रमत या पत्राला नव्या संपादक - प्रकाशकाची गरज होती. मग ही जबाबदारी हरिभाऊ आणि आपटे यांनी स्वीकारली. त्याचबरोबर राष्ट्रमतात त्यागपूर्वक काम करणाऱ्या देशभक्तांसाठी चालणाऱ्या पाकशाळेचे काम त्यांनी मनापासून स्वीकारले. राष्ट्रमताचे काम सुरू झाले. पण राष्ट्रमताकडून ब्रिटिश सरकारने दोन हजारांची जामिनकी मागितल्यामुळे १९१० मध्ये राष्ट्रमत बंद केले गेले.

           १९१० मध्येच गोव्यात लोकसत्ताक राज्याची घोषणा झाली. लोकसत्ताक राज्यात क्रांतिकार्यास पोषक कार्य करणे सोपे जाईल या अपेक्षेने अमरावती - यवतमाळकडून कार्यकर्त्यांचा चमू गोव्याकडे सरकला. गोव्यात मराठी शिक्षण सुरू करण्यास मोकळीक मिळाल्याने बाबा परांजपे यांनी ती जबाबदारी स्वीकारली. फाटक-आपटे, देशपांडे, नारळे आदी यवतमाळचे शिक्षक व विद्यार्थीही गोव्यात पोचले. दोन ते तीन महिन्यातच १९११ मध्ये फोंडा येथे आत्मेद महाविद्यालय सुरू झाले. या शाळेचा प्रयोग यशस्वी झाला. माध्यम मराठी असल्यामुळे शाळेला भरपूर विद्यार्थी मिळाले. विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढली.

         टिळकांची सुटका झाल्यानंतर हरिभाऊ-आपटे पुन्हा पुण्यास परतले. त्यानंतर त्यांनी दोन-तीन वर्षे होमरुल लीगचे निरीक्षक म्हणूनही काम केले. ठिकठिकाणची होमरुल लीग-दप्तरे तपासणे, त्यांचे हिशेब पाहणे हीच कामे हरिभाऊंकडे होती. अंगावर घेतलेल्या कामात झोकून देणे हीच त्यांची खरी वृत्ती होती.

         टिळकांचे प्रभावी राजकारणच वेगळ्या मार्गाने व पद्धतीने गांधी पुढे नेत आहेत असे पटल्यानेच हरिभाऊ गांधींच्या मागे त्याच निष्ठेने गेले. हरिभाऊंनी गांधीजींच्या विधायक कार्यक्रमांपैकी खादीप्रमाणेच हातसडीचा तांदूळ, घाण्याचे गोडेतेल यांच्या प्रसारासाठी दीर्घकाळ खटाटोप केला. सहकाराशिवाय पर्याय नाही हे जाणवल्यामुळेच सहकार्याने चालवले जाणारे लहानसहान उद्योगधंदे तरुणांनी करावेत यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. कार्यकर्त्यांसाठी हरिभाऊंनी एक सहकारी पतपेढी-सोसायटी चालवली. त्यातून अडीअडचणीच्या वेळी कार्यकर्त्यांना कर्ज दिले जात असे. या सोसायटीचे सर्व काम करणाऱ्या स्त्री कार्यकर्त्याच होत्या.

          पुण्यातील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या कार्याची मूळ प्रेरणा आणि संघटनाही हरिभाऊंचीच होती. आज या संस्थेचे कार्य बरेच विस्तारलेले आहे. आज संस्थेची तीन वसतिगृहे आहेत. त्यातील एक मुलींचे असून उर्वरीत दोन मुलांसाठी आहेत. ही संस्था सध्या पाचशे गरीब व अभ्यासू विद्यार्थ्यांना दरमहा ४०० रुपयांत दोन्ही वेळेच भोजन देते. विद्यार्थ्यांना पुस्तके व अभ्यासाला व राहण्याला जागा मिळवून देणे, काही कामधंदा मिळवून देणे अशी अनेक कामे संस्थेकडून चालू असतात. याशिवाय सध्या संगणकाचे मुलभूत प्रशिक्षणही दिले जाते. विद्यार्थी केंद्रात व्याख्याने, योगासने यांचेही शिक्षण दिले जाते. त्याशिवाय कमवा शिका योजनेतूनही विद्यार्थी घडत आहेत. याही संस्थेत सहाय्यक म्हणून काम करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य स्त्रीयाच असून त्या कार्यक्षमतेने काम पाहतात.

            वयाच्या नव्वदाव्या वर्षी लोकनायक बापूजी अणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आले.

- वर्षा जोशी - आठवले

फाटक, हरिभाऊ